Friday, November 27, 2020

'भूतकाळ' आवडे सर्वांना


भूतकाळात रमायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या,ज्येष्ठ माणसांच्या गोष्टी आठवा. ते म्हणत की,आमच्या काळात तर  तूप चार आण्याला शेर मिळायचे आणि ताक तर दूध-दहीवाले फुकटात द्यायचे.  फक्त वयस्करच का, आपणही आपल्या शाळेतल्या दिवसांची आठवण काढतोच आणि एकादा वर्गमित्र भेटला तर मग बोलायलाच नको. शाळेतल्या आवडत्या शिक्षकांच्या गोष्टी,शाळेला दांडी मारून बघितलेला सिनेमा, शाळेबाहेर विकायला बसलेल्या मावशीकडून विकत घेतलेल्या नळ्या-पापड्या, बोरं-चिंचा आणि झाडावर चढून तोडलेले पेरू, कैऱ्या यांची आठवण काढताना आपण अजिबात थकत नाही. 

एका पिढीचा नायक सहगल, मोतीलाल आणि त्यानंतर देव-दिलीप-राज या तिघांनी लोकांच्या मनावर राज्य केले. पुढे लोकं राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे वेडे होते. मी लहान असताना अमिताभ,जितेंद्र यांचे चित्रपट पाहिले. नववी-दहावीला असताना मला मिथुन चक्रवर्ती आवडायचा. पण  नंतरच्या पिढीने शाहरुख, अमीर आणि सलमान या खान तिकडीला हृदयात स्थान दिले.  नव्या पिढीचे त्यांचे त्यांचे नायक आहेत आणि सिनेमा हॉलच्या मोठ्या पडद्याऐवजी आता नवीन पिढीला इंटरनेटवर वेब सिरीजच्या रूपात रममाण व्हायला आवडते.  आपल्या एक गोष्ट लक्षात येते का पहा-  प्रत्येक पिढी त्यांच्या काळातील नायक आणि नायिका यांची आठवण ठेवते आणि असे म्हणते की आमच्या काळात असे उत्कृष्ट चित्रपट बनले होते.

येणाऱ्या पिढीसाठी इंटरनेटदेखील कदाचित जुने असू शकते, कारण तंत्रज्ञान दरवर्षी किंवा दोन वर्षात काहीतरी नवीन आणते.  तथापि, तंत्रज्ञान किती वेगवान प्रगती करेल, कितीही स्मार्ट कॉम्प्युटर असतील, कितीही वेगवान लॅपटॉप आले तरीसुद्धा, आमच्यासारख्या संगणकाचा पहिल्यांदा वापर केलेल्या 1.2 एमबी आणि 1.44 एमबी फ्लॉपीचे कौतुक करणारच!  आजच्या पिढीतील बर्‍याच तरुणांनी फ्लॉपीबद्दल ऐकलेही नसेल. तसं तर आम्ही त्या पिढीचे आहोत, ज्यावेळी पाच-दहा पैसे किंवा वीस पैसे आणि पंचवीस-पन्नास पैसे वापरले जायचे.  रुपया आणि दोन रुपये म्हणजे आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. मी लहान असताना दहा-वीस पैशांत मूठभर पिवळे वाटाणे मिळायचे. रूपयाच्या आतील चार आणे, आठ आणे आता विस्मृतीत गेले आहेत. रुपयाला तर काहीच किंमत राहिली नाही. आपला रुपया अर्थकारणात पार कोसळला आहे. चहादेखील कुठे पाच रुपये तर कुठे दहा रुपये कप (ग्लास) मिळतो आहे. आता चहा गुळाचा, दुधाचा, कोरा असा मिळू लागला आहे. कोऱ्या चहात लिंबू पिळून मिळतो आहे. अर्थात चहा आता कटिंगमध्येच मिळतो.   अशा परिस्थितीत गायक चंचलचं महागाईवरचं गायलेलं ते गाणं आठवतं, ‘पहले मुट्ठी में पैसे लेकर थैला भर शक्कर लाते थे… अब थैले में पैसे जाते हैं और मुट्ठी में शक्कर आती है’. आज महागाईची मिजास वाढली आहे. आणि एके काळी तर कांद्याच्या दरावरून सरकारही पाडले गेले होते. बघा... दहा-वीस पैशांचा विषय निघाल्यावर मी आणि तुम्ही शेवटी भूतकाळात रमून गेलोच.

 गृहिणीदेखील आपापसात चर्चा करतात, तेव्हा भाजी-आमटीचा विषय निघतोच.  मग गोष्टी निघतात-पूर्वी कोबी,प्लॉवरची भाजी किती स्वादिष्ट लागायची.आम्ही तर कच्चीच खात असू.पण आता काय कुणासठाऊक कसलं रसायन ,कसलं खत टाकलं जातं,त्यामुळं प्लॉवरची फुलं मोठी मोठी आणि पांढरीशुभ्र!पण चव तर लागतच नाही. आमच्यावेळी शाळेतून आल्यावर लोणच्यासोबत भाकरी खाताना ती किती चिविष्ट लागायची.मात्र आजची मुलं नूडल्स, पिझ्झा, पास्ताशिवाय काही खातच नाहीत.त्याशिवाय त्यांचं काही चालतच नाही.

बोलायचं म्हटलं तर मग गोष्टी शाळेच्या असो, सिनेमाच्या असो किंवा तंत्रज्ञानाच्या. घरातल्या भाजी-भाकरीची असो वा कोणतीही ,जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी निघतातच. अशाच एका घरात म्हातारी सासू खाटेवर पडल्या पडल्या खोकत होती.मध्यम वयाची एक महिला मुला-मुलींच्या लग्नावरून चिंतीत होती आणि आपल्या म्हाताऱ्या सासूला दोष देत होती. यांच्या काळात सोनं स्वस्त होतं. दोन-चारशे रुपयाला तोळा असेल, पण यांच्याकडून दहा-पाच तोळा सोनं घेऊन ठेवायचं झालं नाही. आज माझ्या मुलीच्या लग्नाला उपयोगाला तर आलं असतं. सासू खोकत होती आणि टोमणे ऐकत होती. कदाचित तिला राहावलं नाही. ती खोकत खोकतच बोलली- सूनबाई,आमच्याकडून तर चूक झालीच, आम्हाला स्वस्त सोनं खरिदता आलं नाही.पण तू ही चूक करू नकोस. आता सोनं चाळीस-पन्नास हजार तोळा आहे. तू आठ-दहा तोळे खरेदी करून ठेव, नाहीतर तूही म्हातारी होशील तेव्हा कदाचित सोनं लाख-दोन लाख होऊन जाईल... तेव्हा तुझी सूनदेखील हेच ऐकवेल की, इतकं स्वस्त होतं सोनं तुमच्या जमान्यात तर खरेदी का केलं नाहीस. खरं तर प्रत्येक युगात, प्रत्येक काळात, प्रत्येक जमान्यात मानव जातीसमोर नवनवीन आव्हानं, नवनव्या अडचणी आल्या आहेत आणि त्याच्याशी दोन हात करावे लागतात. पण एक आव्हान पार केल्यानंतर दुसरं आव्हान मोठं कठीण वाटतं. पहिलं आव्हान सोपं वाटू लागतं. हे असंच घडत असतं. खरं तर पैशापुढं फक्त शून्य वाढली आहेत. बाकी जिथल्या तिथे आहे. आमच्या काळात, आमच्या जमान्यात असं होतं, किंवा असं होत नाही, आपण म्हणतोय. पण काही का असेना, प्रत्येकाला भूतकाळात रमायला खरोखरचं आवडतं.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment