समाजाचा विकास हा विज्ञानाच्या विकासास समांतर आहे. या गोष्टीला आणखी विस्तार द्यायचा तर आनंद, समृद्धी आणि शांतता जगभरात विज्ञानातूनच आली आहे. म्हणूनच जगातील सर्व विकसित, प्रगत राष्ट्रांना विज्ञानाचे महत्त्व समजले आहे आणि म्हणूनच ते आघाडीवर आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पन्नासच्या दशकात रशियाने अवकाश विज्ञान आणि इतर क्षेत्रात मोठी झेप घेतली तेव्हा अमेरिकेत खळबळ उडाली. तेथे लगेच विज्ञान अध्यापन-अध्यापन आणि संशोधन यांना राष्ट्रीय प्राधान्य दिले गेले आणि दुसर्या महायुद्धानंतर त्या शीतयुद्धात अमेरिका विज्ञानाच्या जोरावर हळूहळू बाजी मारत गेला. दुसर्या महायुद्धाच्या काळापासून आइनस्टाइनसह अनेक जर्मन शास्त्रज्ञानी केवळ अमेरिकेतच प्रवेश केला नाही, तर तेव्हापासून जगातील सर्वच शास्त्रज्ञांची प्रथम प्राथमिकता अमेरिकाच राहिली आहे. भारतातील हरगोविंद खुराना, चंद्रशेखर, व्यंकटाराम कृष्णा इत्यादी अमेरिकन शिक्षणामुळेच जगात नाव कमाविण्यात यशस्वी झाले आहे.
आम्ही जवळजवळ तीस वर्षांपासून सतत ऐकत आलो आहोत की चिनी विद्यापीठे विज्ञानाच्या क्षेत्रात खूप मोठी वेगवान भरारी घेत आहेत. पेटंट्स आणि नवीन शोधांच्या मानकांद्वारे मोजले गेले तर आज चीनची विज्ञान क्षेत्रातील परिस्थिती अमेरिकेपेक्षा पुढे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लहानशा इस्त्राईलनेदेखील जगात आपला स्वतःचा एक दबदबा निर्माण केला आहे. जपान तर गेल्या जवळपास शंभर वर्षांपासून सर्वात मजबूतरित्या पुढे सरकला आहे. आपल्या शेजारी असलेल्या चीनबद्दल सांगायचे झाले तर त्याने त्यांच्या देशातील शालेय शिक्षणापासून ते विद्यापीठापर्यंत सारे चित्रच बदलून टाकले आहे. इथे विज्ञान हा एकमेव एक्का आहे. आणि म्हणूनच जगातील शीर्ष शंभर विद्यापीठापैकी पाहिली पाच विद्यापीठं चीनमधली आहेत आणि आम्हाला मात्र पहिल्या पाचशेमध्ये कसं तरी स्थान मिळतं.
स्वातंत्र्यानंतर घोषणा आपण जगात मोठी भरारी घेऊ, असं वाटत होतं, परंतु आपल्या इथे ना शिक्षणात ना समाजात कसलाच मूलभूत बदल झाला नाही. ठीक आहे, आपला देश एक मोठा देश आहे, येथे बरीच गुंतागुंत आहे, परंतु जर अंधार वाढत गेला तर प्रकाश आणण्याचा प्रयत्न आपल्यालाच करावा लागणार आहे ना! अशावेळी आपल्यालाच संपूर्ण धोरणाचा आढावा घेण्याची गरज आहे.
यापूर्वीची सरकारे शिक्षण आयोग आणि इंग्रजी शिकवण्याच्या आणि ते लादण्याच्या आग्रहामध्ये इतकी व्यस्त होती की, सरकारी शिक्षण खासगी शाळांकडे सरकले हे कळलेच नाही. यातून 'आऊट पुट' काहीच निघालं नाही. इंग्रजी दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत आम्ही जगातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मागे व पुढे होत गेलो आणि त्यातच अडकून पडलो. इंग्रजीच्या सहाय्याने विद्यापीठे ठीक करू शकतो या असल्या भ्रमातून आपण आता पहिल्यांदा बाहेर यायला हवे. कमीतकमी सध्याचे सरकार तरी या इंग्रजीबद्दल आग्रही नाही आणि विज्ञान योग्य प्रकारे समजून घेतले तर त्यांची तीव्र इच्छाशक्तीदेखील वाढीस लागेल आणि काही तरी सकारात्मक बदल दिसून येईल.पण हे कधी होणार हा प्रश्नच आहे.
आपण विज्ञान क्षेत्रात खूप मागे आहोत. त्याला बरीच कारणे आहेत. मुळात आपल्या देशातल्या प्रसारमाध्यमांमध्ये विज्ञानाची दिशा आणि दशा यावर फारच कमी बोलताना आणि चर्चा होताना दिसते. या माध्यमांचे संपूर्ण लक्ष राजकारण आणि राजकारण्यांच्या कुरघोड्या यांच्याभोवतीच फिरत असते. आरोप आणि प्रत्याराोपशिवाय दुसरं काही नसतंच! त्यामुळे आपल्या देशाची आर्थिक प्रगती आणि सामाजिक विकास निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विज्ञान आणि औद्योगिक विकासावर जितका भर द्यायला हवा होता, तेवढा दिला जात नाही.आणि दिला गेलाही नाही. लोकांनाही राजकारण,क्रिकेट याशिवाय दुसर्या कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट नसल्याने साहजिकच त्यांच्याकडूनही याबाबतची मागणी होताना दिसत नाही. काही निवडक क्षेत्र सोडले तर वैश्विक संदर्भात भारताच्या विज्ञान आणि औद्योगिक विकासाची आजची जी परिस्थिती आहे, ती सक्षम नाही. आज भारत या क्षेत्रात कुठल्या कुठे जायला हवा होता,पण याबाबत आपला देश पारच रसातळाला आहे. ही आपल्यादृष्टीने खरे तर खेदाची बाब म्हटली पाहिजे.
विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची, माणसांची प्रगती नाही. त्यामुळे यातल्या काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत जागतिक पातळीवर वैज्ञानिक स्पर्धेच्या दृष्टीने नेमका कुठे आहे? याचा धांडोळा घ्यायला हवा आहे. नोबेल पारितोषिक एक जागतिक स्तरावर प्रतीष्ठा आणि विश्वासार्हता मिळवून देणारा पुरस्कार आहे. याबाबतीत आपल्या देशातील चित्र स्पष्ट आहे. प्रकाश विकीर्णन (लाइट स्कॅटरिंग) संबंधी संशोधनासाठी भौतिकशास्त्राचे अभ्यासक सर सी.व्ही. रमन यांना 1930 मध्ये मिळालेल्या नोबेल पुरस्कारानंतर आज 90 वर्षे उलटून गेली आहेत, पण देशात वैज्ञानिक संशोधन करणारा एकदेखील भारतीय शास्त्रज्ञ हे यश मिळवण्याचा प्रयत्न करू शकला नाहीत.तिथंपर्यंतही जाऊ शकला नाही.
याबाबतीत ज्यावेळेला प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा देशातले जवळपास सर्वच नामांकित आणि नवोदित शास्त्रज्ञ एकच उत्तर देतात, देशात मूलभूत संशोधनासाठी ना उपयुक्त इंफ्रास्ट्रक्चर आहे, ना इच्छित योजना आहेत. ना पैसा! दुसरा एक अंदाज असा की, देशातल्या सर्व मोठ्या शास्त्रज्ञांनी देशातल्या संशोधनाचा पायाभूत ढाचा उभा करण्यावर आणि विज्ञान-टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेगाने समस्यांवर उपाय शोधण्याचा कामावर भर दिला. आपला वेळ खर्ची घातला. पण तसे बघायला गेले तर काही प्रमाणात या दोन्ही गोष्टी बरोबर होत्या. पण अनेकांना यात वेगळाच संशय येतो आहे. विज्ञान संशोधन क्षेत्रातील जी समस्या आहे त्याच्या सध्याच्या आजाराचे मूळ काही वेग़ळेच असल्याचे सांगितले जात आहे. देशाने सीव्ही रमन यांच्याव्यतिरिक्त आतापर्यंत फक्त दोघा अन्य शास्त्रज्ञांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शास्त्रज्ञ सीएन आर राव यांचे म्हणणे असे की, चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी देशात पन्नास टक्के शास्त्रज्ञ संशोधन विद्यापीठे होती. पण हळूहळू आमच्या विद्यापीठांमधील संशोधनासाठीचा पैसा कमी होत गेला.आणि संशोधनालाही अधोगती लागली.
खरे तर देशात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनावर विद्यापीठे अथवा खासगी आणि सरकारी क्षेत्रातल्या प्रयोग शाळांमधला संपूर्ण खर्च खूपच कमी झाला आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार जीडीपीच्या 0.69 टक्के एवढाच खर्च यासाठी होत आहे. शास्त्रज्ञांची मागणी कमीत कमी जीडीपीच्या दोन टक्के तरी खर्च यासाठी करायला हवा, अशी आहे. पण कोणत्याच सरकारने या दिशेने पावले उचलली नाहीत.
सरकारी शास्त्रज्ञ तर अधिक पैशांची मागणीसुद्धा करू शकत नाहीत. पण भारतीय विज्ञान काँग्रेससारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरदेखील याची चर्चा होताना दिसत नाही.त्यामुळे आपल्या देशाचे विज्ञान क्षेत्रातले योगदान फक्त दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. चीन आणि अमेरिका यांच्याकडून या क्षेत्रासाठी जीडीपीच्या 15 टक्के खर्च केला जातो. प्रा. राव म्हणतात की, फक्त पैशांच्या कमतरतेमुळे आपण मागे आहोत, असेही नाही. यासाठी सांस्कृतिक आणि सामाजिक हे मुद्देदेखील कारणीभूत आहेत. शिवाय आपले शास्त्रज्ञ जितकी मेहनत करायला हवे, तितके करताना दिसत नाही.
या सगळ्यांचा परिणाम आपल्या देशाच्या आर्थिक स्वायत्ततेवर पडत आहे. जवळपास प्रत्येक उद्योगासाठी आपल्याला विदेशी पेटेंटेड टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहावे लागत आहे. यात आपला पैसा मोठ्या प्रमाणात खर्ची पडत आहे. आपण दुसर्या देशांकडून वस्तू खरेदी करण्याच्याबाबतीत मात्र आघाडीवर आहोत. पण ग्लोबल इनोवेशन इंडेक्समध्ये भारत आठव्या स्थानी आहे. जर आपल्या देशाची प्राथमिकता आधारभूत विज्ञानापेक्षा अधिक सध्याच्या औद्योगिक गरजांवर केंद्रित असेल तर आपल्याला कमीत कमी त्या संशोधनावर तरी यशस्वी होऊन दाखवायला हवे. या क्षेत्रात यशाचे दुसरे टोक पेटेंट असते. निर्मितीच्याबाबतीत जर आम्ही प्रतिस्पर्धी चीनच्या तुलनेत कुठे आहोत, हे तपासून पाहायला हवे. आपण अजूनही पेटेंटकडे महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहात नाही, हे दुर्दैवच म्हणायला हवे.
2016 मध्ये देश आणि विदेशात कार्यरत असलेल्या भारतीय शास्त्रज्ञ किंवा त्यांच्या कंपन्यांनी पेटेंटसाठी फक्त 25 हजार अर्ज केले आहेत. या तुलनेत चीनने 12 लाखांपेक्षा अधिक (12,57,439) अर्ज केले आहेत. याचवर्षी देशात काम करणार्या शास्त्रज्ञांना 1115 आणि विदेशात काम करणार्या भारतीयांना 5551 पेटेंट मिळाले आहेत. या तुलनेत चीनमध्ये राहून संशोधन करणार्यांची संख्या 3,02,136 आहे आणि विदेशात राहणार्या 20, 348 चिनींना पेटेंट मिळाले आहे.
विदेशात पेटेंट मिळवण्यासाठी 152 देशांच्या दरम्यान पीसीटी-(पेटेंट कोऑपरेशन ट्रीटी) लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे एकाच मूळ अर्जाच्या आधारावर विविध देशांमध्ये पेटेंट मिळवणे सोपे झाले आहे. चिनी लोकांनी पीसीटीच्या माध्यमातून 2017 मध्ये 48,882 अर्ज केले आणि भारतीयांनी फक्त 163 अर्ज केले. पेटेंट शास्त्रज्ञ किंवा पेटेंटधारक कंपन्यांना विशिष्ट प्रकारची मालकी अधिकार देते. त्या अविष्कृत प्रक्रिया किंवा उत्पादनास एका निश्चित कालावधीपर्यंत अन्य कुणाला वापर करता येत नाही. नाही तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात. उदाहरणार्थ- जर कुठल्या भारतीय कंपनीजवळ आपले प्रॉडक्ट पेटेंट अथवा प्रोसेस पेटेंट असेल तर कोणत्याही अन्य कंपनीला ती प्रोसेस किंवा प्रॉडक्ट उत्पादन करू शकत नाही. एक प्रकारची ही एक आर्थिक स्वायत्तता आणि प्रतिस्पर्धेसाठी आवश्यक असते.
भारतातल्या शास्त्रज्ञांना आपले संशोधन लवकरात लवकर प्रकाशित व्हावे, यात मोठी रुची असते. यातून त्यांचे नाव व्हावे आणि नोकरीत बढती व्हावी, ही एवढीच माफक अपेक्षा असते. पण याचे दुरगामी नुकसान बहुतांश शास्त्रज्ञांच्या लक्षातच येत नाहीत. जर भारतातल्या संशोधकांनी पेटेंटची गरज समजून घेतली आणि संशोधन करतानाच पहिल्यांदाच पेटेंट मिळवण्याचा प्रयत्न केल्यास किंवा त्याकडे अधिक लक्ष दिल्यास आणि मग ते प्रकाशित करण्यावर भर दिल्यास त्याचा दुरगामी फायदा त्यांना होईल.
आपल्या देशात संशोधन करणार्या संस्थांची संख्या पाच हजार आहे. यात कॉलेज, विद्यापीठ, खासगी संशोधन संस्था आणि कंपन्यांच्या प्रयोगशाळांचा समावेश आहे. यांमध्ये जवळपास दोन लाख पेक्षा अधिक शास्त्रज्ञ संशोधनाचे काम करीत आहेत. राष्ट्रीय स्तरावर टाइफेक संस्थाअंतर्गत पेटेंट फॅसिलिटेशन सेंटर कार्यरत आहेत. विविध राज्यांमध्ये आणि संशोधन परिषदांमध्ये अशा प्रकारे पेटेंट फॅसिलिटेशन सेंटर आहेत. याशिवाय भारताचे पेटेंट कार्यालय जितके पेटेंट मंजूर करते, त्यातील फक्त सतरा टक्के भारतीयांची नावे आहेत. बाकी पेटेंट परदेशातल्या लोकांना मिळतात. शेवटी असे का होते, असा प्रश्न उपस्थित होतो. आपले संशोधक पेटेंटकडे का दुर्लक्ष करीत आहेत्, याची दखल घ्यायला हवी आणि त्यांना मार्गदर्शन करायला हवे. खरे तर राजकीय पक्ष, विचारवंत, आणि शिक्षण तज्ज्ञ यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
संशोधनात पुर्वीपासून पैसे कमी मिळतात, पण मानसन्मान खूप होता. जनमानसात प्राध्यापक, शिक्षक आणि संशोधक यांना आदराचे स्थान होते. आता कुठेतरी ते कमी झाल्यासारखे वाटते. सर्वच हुशार विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल असेलच असे नाही. संशोधनातल्या संधी, निधीची उपलब्धता हा प्रश्न आहेच. आता मोठ्या पॅकेजची नोकरी हीच विद्यार्थ्यांसह शिक्षणव्यवस्थेची आणि समाजाची भूमिका आहे. त्यामुळे सध्या संशोधनाचे गणित बिघडलंय, तरीही देशातील काही भागांमध्ये वैज्ञानिकांची परंपरा निर्माण होते, हे आशादायक चित्र आहे. संशोधनासाठी निधीचा कमतरता नेहमीच असते. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत आपण फार कमी खर्च संशोधनावर करतो. अमेरिका, चीनसारखे देश दोन टक्क्यांवर खर्च करतात. एखाद्या विषयाचा पुर्वी देशात एखादा दुसरा शास्त्रज्ञ असायचा, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण, नवकल्पना आणि परस्पर सहकार्य यांचा अभाव होता. अशा चर्चेतूनच विज्ञान पुढे जातंय. याबाबत अमेरिका आणि
ReplyDeleteयुरोपातील शास्त्रज्ञांप्रमाणे आपणही परस्पर सहकार्य आणि चर्चेतून संशोधन पुढे न्यायला हवे.
डॉ. सी. व्ही. रमण यांच्या रूपाने देशातच काम केलेल्या पहिल्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाले. त्यानंतर
अजूनही भारतात राहून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल मिळालेले नाही. त्या दिशेने प्रवास सुरू आहे. परंतु पुरेसे प्रोत्साहन हवे आहे. प्रयोगांसाठी निधीपासून शिक्षणातील मूलभूत बदलांपर्यंत आपल्याला काम करावे लागेल. मूलभूत विज्ञानाचा नवनीतम संशोधनाशी संबंध विद्यार्थ्यांना स्पष्ट केला पाहिजे. संशोधनासाठी निधी हवाच पण विज्ञानाला
लोकसन्मानही पाहिजे. विज्ञानात रुची निर्माण करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा पाया रचावा लागेल. संशोधकांनीही 'कटिंग एज' म्हणजे नवीनतम संशोधनात स्वतःला गुंतवावे. तेव्हा कुठे आपण नोबेलविजेत्या संशोधनाकडे वाटचाल करू.