Sunday, November 15, 2020

खरी पणती पेटवणारा तरुण : पी. नवीन कुमार


एसएमएम अभियांत्रिकी महाविद्यालय, नामक्कल येथे तिसऱ्या वर्षाला शिकणारा एक विद्यार्थी कित्येकदा रात्रीच्या वेळी उपाशीच झोपायला जात असे.  एखाद्या मित्राने एकत्र जेवायला बोलावले तर  तो काही तरी कारण सांगून त्यांना टाळत असे. खरं तर, रात्री जेवणासाठी जवळ असलेले 15-20 रुपये, तो कुठल्यातरी भिकाऱ्याच्या तळहातावर ठेवून येत असे.  त्यावेळेला तो फक्त 19 वर्षांचा होता. वास्तविक वाढतं वय असल्यानं त्याला चांगल्या खुराकाची गरज होती.आणि डोकं काम द्यायचं असेल तर मन तृप्तही असायला हवं, पण हा किशोरवयीन मुलगा अशा संघर्षमय वातावरणात वाढला होता की, भुकेने व्याकूळ असलेल्या एकाद्याचा विवश आवाज ऐकला की, याच्या मनात कालवाकालव व्हायची. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं त्याला व्हायचंच नाही.

तिरुचिराप्पल्लीच्या मुसीरी येथे जन्मलेल्या पी. नवीन कुमारला लहानपणापासूनच आजाराने सतत अंथरुणाला खिळून असलेली आई आणि अपंग वडिलांच्या विवश परिस्थितीमुळे संवेदनशील बनवले होते. कदाचित नियतीनेच त्याला तसे बनवले होते,त्यामुळेच तो त्या दिशेने ओढला जात होता. त्याच्यात कमालीचा संयम होता.  नवीनकुमार अभ्यासात हुशार होता, त्यामुळे गरिबी त्याच्या शिक्षणाच्या आड येऊ शकली नाही.  तामिळनाडूमधील सरकारी सुविधेचं त्याला पाठबळ मिळत राहिलं आणि तो त्याच्या  स्वप्नांच्या मार्गावर चालत राहिला.  2010 मध्ये नवीन एसएसएम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा 'टॉप'चा विद्यार्थी होता. किशोरावस्थेतून तरुणावस्थेकडे वाटचाल करणारी त्याच्या आयुष्यातील या पुढची महत्त्वाची वर्षं होती.

नवीन कुमार तसा धार्मिक वृत्तीचा होता. कॉलेज सुटल्यावर तो नेहमी मंदिरात जात असे. मात्र मंदिरासमोरचे दृश्य पाहून तो अस्वस्थ होई.  शहरात कुठल्याही भागात कामानिमित्तानं गेल्यावर तिथे त्याला भीक मागणारे भिकारी दिसत. अनेक भिकार्‍यांची अमानुष अवस्था पाहून त्याचं हृदय पार हादरून जायचं. सतत त्याच्या मनात यायचं की, हे लोक माझ्याच कुटुंबातील असते तर मी काय केलं असतं?  या प्रश्नाची वेदना त्याला भयंकर त्रास द्यायची. भिकाऱ्यांना मदत करण्याचा त्यानं निश्चय केला.

नवीनने आपला हा निश्चय सर्वात अगोदर त्याच्या काही वर्गमित्राना आणि शिक्षकांना सांगितला. परंतु त्या बहुतेकांनी त्याला तू  स्वतः च गरीब आहेस, तिथे त्यांना तू काय मदत करणार आहे, असे बोलून त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला.  सगळ्यांनी त्याला स्वतःच्या कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तसाच कौटुंबिक दबावही वाढत होता. अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगितलं जाई.  पण तरीही नवीन निराश झाला नाही.  त्याचा हा निश्चय एका 60 वर्षांच्या भिकाऱ्याने- राजशेखरने आणखी दृढ केला.

 2014 मधील ही गोष्ट आहे. राजशेखर सालेममध्ये भीक मागत होता.  नवीनकुमारने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण राजशेखर तोंड उघडायलाच तयार नव्हता.  खरे तर तो गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होता, त्यामुळे त्याचा स्वभावदेखील चिडचिडा बनला होता.  राजशेखर नवीनला चिडून काहीही बोलायचा आणि हाकलून लावायचा. पण करुण स्वभावाच्या या तरुणाने हार मानली नाही. जवळपास 22 दिवसांच्या प्रयत्नांनंतर राजशेखर त्याच्याशी संवाद साधायला तयार झाला. बोलताना सतत खोकत सांगितलेली त्याची कहानी अत्यंत वेदनादायक होती.  अपघातात पत्नी व मुलगा गमावलेल्या राजशेखरची सर्व ती ओळखही गमावली होती.  तो कामाच्या शोधात सालेमला आला होता,परंतु त्याला ओळखपत्राशिवाय कोणीही काम द्यायला तयार नव्हतं. त्याला जो कोणी भेटायचा,तो त्याला चार-दोन रुपये द्यायचा. हताश  राजशेखरला दारूचे व्यसन लागले. आता तो कोणापुढेही हात पसरत असे आणि लोक त्याला थोडीफार मदत करत. स्वाभिमान हळूहळू गळून पडला. त्या दिवशी नवीनने राजशेखरसोबत संध्याकाळचे तीन तास घालवले. त्याच्या भिकेच्या पैशांतून राजशेखरने चहा मागवला. त्या चहात मिसळलेल्या आपलेपणाने नविनला जीवनातील नवी दृष्टी मिळाली. 

खूप प्रयत्न केल्यावर त्याने राजशेखरसाठी एका मुलांच्या संस्थेत वाचमेनची नोकरी मिळवून दिली. या यशाने नवीनच्या मनसुब्याला नवी भरारी मिळाली.  ही वेळ त्याच्या कॉलेजला निरोप देण्याची होती.  म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं.  अंतिम वर्षाचा 'सर्वोत्कृष्ट विद्यार्थी' म्हणून त्याची निवड झाली. यापूर्वीच त्याने महाविद्यालयाचे प्राचार्य आणि  व्यवस्थापन अध्यक्षांचा विश्वास जिंकला होता. अखेरच्या दिवसांत व्यवस्थापनाच्या परवानगीने  कॉलेजच्या प्रत्येक वर्गात फिरून त्याने भिकाऱ्यांना आर्थिक व अन्य मदत करण्याचे आवाहन केले. निधीचा यथायोग्य विनियोग व्हावा, यासाठी त्याने त्याच्या सात मित्रांची मिळून एक समिती बनवली. मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार मार्च 2014 मध्ये नवीनने ‘अच्यम ट्रस्ट’ ची स्थापना केली.  अर्थात, उदात्त कार्यात सहभाग नोंदवणाऱ्यांची कसलीच कमतरता भासत नाही, असे म्हणतात ते खरंच आहे.

 बघता बघता कित्येक विद्यार्थी आणि व्यावसायिक तरुण नवीनला येऊन मिळाले.  सुरुवातीला, ज्या तरुणाला, वर्गमित्राला 'भिकारी' संबोधून त्याला आपल्या घरातही प्रवेश न देणारे आता त्याचेच नाव सांगून त्याचा अभिमान बाळगताना दिसतात. आज नवीन जेकेके नटराज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा सहायक प्राध्यापक आहे. त्याच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत तामिळनाडू राज्यातल्या विविध शहरांमधील 5 हजाराहून अधिक भिकार्‍यांची सुटका केली आहे आणि त्यांना सन्मानाचे आयुष्य दिले आहे. याशिवाय यातील 572 लोकांना छोट्या छोट्या नोकर्‍या देऊन पुन्हा जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.  फक्त 26 वय वर्षे असलेल्या या नवीनला आतापर्यंत 40 हून अधिक पुरस्कारांनी गौरवले गेले आहे.  यात राष्ट्रीय युवा पुरस्काराचाही समावेश आहे.  आपणही दररोज संध्याकाळी दिवे लावताना एक विचार करूया की, खरा प्रकाश उजळवण्याने काय घडू शकतं! -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


  

No comments:

Post a Comment