Tuesday, November 3, 2020

प्रचलित शिक्षण पद्धतीला पर्याय ऑनलाईन शिक्षण शक्य आहे का?


सध्याच्या परिस्थितीत शाळा-कॉलेजेस बंद राहिल्याने जगातल्या तमाम देशांना आपल्या जीडीपीच्या एका मोठ्या भागावर पाणी सोडावे लागणार आहे. अशा महामारीच्या  कोरोना संकट काळात शिक्षण क्षेत्र ठप्प झाल्याने अब्जावधी रुपयांच्या वैश्विक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे,याचा सर्वाधिक परिणाम दक्षिण आशियाई देशांवर झाला आहे. सध्याचे संकट ओढवण्यापूर्वीपर्यंत या देशांमधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर दरवर्षी चाळीस अब्ज डॉलर खर्च केले जात होते, पण आता शाळा बंद झाल्याने जे आर्थिक नुकसान होणार आहे ते याहीपेक्षा अधिक असणार आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार शाळा बंद राहिल्याने दक्षिण आशियाई क्षेत्रात 62 अब्ज 20 कोटी अमेरिकी डॉलरच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. या अहवालात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, जर परिस्थिती अशीच काही काळ राहिली तर हे नुकसान अठ्ठ्याऐंशी अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचू शकते. शाळा बंद राहिल्याने दक्षिण आशियाई क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक  फटका भारताला बसणार आहे आणि तो चाळीस अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक असू शकतो.

सध्याच्या परिस्थितीत जगभरातील जवळपास दीडशे कोटीपेक्षा अधिक मुलांची शाळा बंद आहे, त्यातील सत्तर कोटी मुले भारत आणि बांगलादेशसारख्या दक्षिण आशियाई देशांतील आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीत जगभरातील 55 लाख मुलं शिक्षणापासून दुरावू शकतात. यामुळे शिक्षण आणि अर्थव्यवस्था या दोन्हींचेही मोठे नुकसान होईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी काही पावले उचलण्यात आली आहेत. यात ऑनलाइन शिक्षणाचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र या माध्यमातून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागतिक बँकेच्या अहवालातदेखील ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली असून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देताना मोठ्या समस्या उद्भवत आहेत. मुळात ऑनलाईन यंत्रणा सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नसल्याने ही शिक्षण प्रणाली अजूनही बहुतांश विद्यार्थ्यांपासून बरीच दूर आहे. दुसरं म्हणजे या  शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये ताळमेळ बसवणं बहुतांश विद्यार्थ्यांना कठीण जात आहे.ऑनलाईन शिक्षण प्रणालीतील तंत्रज्ञानाशी संबंधितदेखील काही समस्या आहेत. यातून पार होणं कठीण आहे. याशिवाय या शिक्षण प्रणालीला घरचे वातावरण देखील प्रभावित करते. त्यामुळे जाणकारांनी ऑनलाईन शिक्षण शाळांना किंवा वर्गांना मर्यादित ठेवण्याबाबत सांगितलं आहे. वास्तविक विद्यार्थ्याचा जो शारीरिक आणि मानसिक विकास शाळांच्या प्रांगणात किंवा वर्गातच होऊ शकतो.हा विकास घरातल्या एका बंद खोलीत मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटर समोर बसून होऊ शकत नाही.

भारतासंदर्भात आणखी एक प्रश्न उपस्थित होतो,तो म्हणजे साधन, संसाधन आणि व्यापकतेच्यादृष्टीने ऑनलाईन शिक्षणासाठी देश वास्तवात तयार आहे का याचा! या वास्तवापासून तोंड फिरवून चालणार नाही. कारण देशातील एक मोठी लोकसंख्या अजूनही इंटरनेट सेवेपासून दूर आहे. अशा लोकांच्या मुलांची एक मोठी संख्या आहे, ज्यांच्याजवळ ना टीव्ही आहे, ना स्मार्टफोन. बहुतांश क्षेत्रात ऑनलाईन सुविधा नाही. देशात सध्याच्या घडीला 31 टक्के म्हणजे जवळपास 45 कोटी लोकांपर्यंत इंटरनेट पोहचले आहे. या संख्येत वाढ जरी झाली तरी 2021 पर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर कोटीच्या आसपास ही संख्या जाईल. परंतु, ही संख्यादेखील देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी आहे.वर्तमान काळात देशात स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास एकोणतीस कोटी आहे. जर यात वाढ होत राहिली तर 2021 पर्यंत सत्तेचाळीस कोटीच्या आसपास जाईल. एका अभ्यासानुसार विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त साडे बारा टक्के विद्यार्थ्याच्या घरात इंटरनेट सुविधा आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या एकूण ग्रामीण विद्यार्थ्यांपैकी केवळ अठ्ठावीस टक्के घरांमध्ये इंटरनेट आहे. देशाच्या विविध राज्यांमध्येही इंटरनेटची परिस्थिती पोषक नाही. पश्चिम बंगाल आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये तर सात ते आठ टक्के ग्रामीण घरांमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे. या सगळ्या परिस्थितीवरून देशात ऑनलाईन शिक्षणाची अवस्था काय आहे, हे समजून घेता येते. 

शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेले विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा योग्य वापर करू शकत नाहीत. असे विद्यार्थी ना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा योग्य प्रकारे आणि समयबद्ध संचालन करू शकतात, ना आपल्या शिक्षकांशी ऑनलाईन संवाद स्थापित करू शकतात.

अनेकदा त्यांना कळतदेखील नाही, ऑनलाईन वर्गात नेमकं काय चाललं आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना बाह्य स्रोतांची मदत घ्यावी लागेल आणि यासाठी वैयक्तिरीत्या अध्ययन-अध्यापन व्यवस्था करावी लागेल. मूक-बधिर  विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण आणखीनच कठीण आहे,कारण त्यांना सांकेतिक भाषेसाठी दुभाषाकाची आवश्यकता असते. आणि दुभाषक सेवा उपलब्ध होणं तितकं सोपं नाही.यासाठी भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा लागेल. अशाच प्रकारे अन्य दृष्टीने शारीरिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षणासंबंधी समस्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर कृत्रिम अवयवांचा वापर करत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासंबंधीची उपकरणे प्रभावीपणे वापरता येत नाहीत. भारतात अगोदरच शिक्षणाबाबतीत अनेक समस्या आणि उदासीनता आहेत. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचे ओझे आहे. अनेक कारणांनी वर्षभरातल्या संपूर्ण शैक्षणिक सत्रांमध्ये वर्गांचा अभ्यासक्रमदेखील शिक्षक पूर्ण करू शकत नाहीत.यावरून ऑनलाईन शिक्षणाची अवस्था काय असणार आहे,याची कल्पना यायला हरकत नाही.  ही परिस्थिती शाळा-कॉलेज सर्वत्र एकसारखी आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये परीक्षा, विशेषतः वार्षिक परीक्षा घेणे हीदेखील मोठी समस्याच आहे. यावर्षी याचा अनुभव घेतला आहे.अजून अनेक विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा झालेल्या नाहीत. तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यापीठाना परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. यामुळे प्रचंड गदारोळ उडाला आहे. अनेक संस्था, राज्ये ऑनलाईन परीक्षांच्या विरोधात आहेत.

ऑनलाईन शिक्षण प्रणाली व्यावहारिक नसताना आणि शिक्षणाची गरज पूर्ण करत नसतानाही आज या ऑनलाईन शिक्षणाचा  बाजार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. भारतात 2016 ते 2020 दरम्यान ऑनलाईन शिक्षणाचा व्यवसाय आठपट वाढला आहे. 2016 मध्ये हा बाजार 25 कोटी डॉलर होता आता तो 2020 मध्ये जवळपास दोन अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे. सध्याचे ऑनलाइन शिक्षणाचे उत्पन्न वाढले त्याला फार दिवस झाले नाहीत, त्यामुळे या पुढच्या काळात आणखी किती ऑनलाईन शिक्षणाची दुकाने उघडली जातील, सांगता येत नाही. मुलांना आज ऑनलाईन शिक्षण गरजेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकप्रकारची स्पर्धाच लागली आहे. जर संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच ऑनलाईन झाली तर शिक्षण आणि विद्यार्थ्यांना कोणत्या दिशेला घेऊन जाईल, हा मोठा चिंतेचा प्रश्न आहे. सध्या देशात आभासी अनुशिक्षण केंद्र बनवण्याच्या स्पर्धाच लागल्या आहेत. अल्पावधीतच असे शिक्षणाचे 'अड्डे' मोठ्या प्रमाणात बनले आहेत. अजूनही सुरूच आहेत. देशात असे वातावरण बनवण्यात आले आहे की, यापुढे शिक्षण विद्यालय आणि वर्गाबाहेर असणार असून ते अधिक प्रमाणात ऑनलाईन अनुशिक्षण संस्थांमध्ये आणि ऑनलाईन वर्गांमध्येच असणार आहे. त्यामुळे शाळांचे, शिक्षकांचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या तरी शिक्षण सामान्य पातळीवर आणणं खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शिक्षण व्यावहारिक बनवण्यासाठी अजून बराच पल्ला गाठावा लागणार आहे. सध्याच्या घडीला यथोचित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून हा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय होऊ शकत नाही.अशा वेळेला एक समन्वयकारी  आणि सर्वसमावेशक रचना स्थापित करण्याची आवश्यकता आहे, ज्यात ऑनलाईन शिक्षण प्रणाली पारंपरिक शिक्षण पद्धतीला फक्त  आवश्यकता पूर्ण करण्यास सहाय्यभूत ठरेल. पारंपरिक शिक्षण पद्धतीला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणाकडे पाहिले जाऊ नये. शिक्षण आणि यावर आधारित अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजेत, अशी शिक्षण व्यवस्था उभी राहिली पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment