आजची युवा पिढी नव्या तंत्रज्ञानातील मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जात असून त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होत चालली आहे. याचा मोठा परिणाम युवकांच्या शिक्षणावर होत आहे.आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या आणि मोबाईलद्वारा ऑनलाईन शिक्षण सुरू असळव तरी किती मुलं ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहेत, याची कल्पना साऱ्यांनाच माहीत आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार 60 टक्के पालकांनी ऑनलाइन शिक्षण नको असल्याचे म्हटले आहे. शिवाय मोबाईलवर मुलं काय पाहतात आणि काय नाही, हे बघायला कुणालाच वेळ नाही. उलट आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणात विविध सोशल मीडियावर सक्रिय असताना दिसत आहे.त्यातल्या त्यात राजकारणावर आपली अक्कल पाजळताना दिसतात. ग्रामीण भागात तर मोठे विदारक चित्र आहे. युवापिढी नशेसारख्या व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्या भविष्याबाबत त्यांनाच स्वतःची चिंता राहिलेली नाही. मोबाईलमध्ये बॅलन्स, डेटा आणि वर खायला-प्यायला झालं की यांना कशाची आवश्यकता भासत नाही. कुठल्या तरी पुढाऱ्याच्या मागे लागून सारा दिवस दंगा-मस्तीत घालवताना दिसतात. स्वतः च्या भवितव्याविषयी त्यांची इतकी बेफिकीरी वाढली आहे की, ते देशाचे भविष्य काय उज्ज्वल करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे देशाच्या राज्यकारभाराच्या विविध घटकांवर निवडून जाणार्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे २१ वय वर्षे पूर्ण असलेल्या युवापिढीलाच द्यायला हवे, असे आता दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. आणि खरोखरच यावर अधिक अन व्यापक विचार व्हायला हवा आहे. अन्यथा देशाचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे नक्की समजावे.
ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी १८ वय वर्षे पूर्ण असलेल्या युवकास मतदानाचा अधिकार बहाल करून आता दहा वर्षे उलटली आहेत. पण यातून काय साध्य झाले कळायला मार्ग नाही. सुरुवातीला काही प्रमाणात मतदान वाढले,पण आता पुन्हा हेच मतदान पूर्वपदावर आले आहे. 50 ते 60 टक्के दरम्यान होणारे मतदान सुरुवातीला 70 ते 75 टक्क्यांपर्यंत गेले होते. पण मागच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मतदान कमी झाले. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीतून आपल्या लक्षात ही बाब लक्षात येईल. मुळात केवळ बारावी उत्तीर्ण झालेले युवक स्वतःच्या भवितव्याविषयी स्वतः च संभ्रात पडलेले असतो. स्वतः ची निर्णयक्षमता त्याच्यापाशी नसते. कमवायची तर अजिबात अक्कल नसते.अशा वेळेला त्याच्याजवळ " ओंजळीने पाणी पिण्याशिवाय" गत्यंतर नसते. मग अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देऊन काय साध्य झाले ? आपले करिअर समोर पडले असताना या वयात राजकारणासारख्या गोष्टी कशाला हव्यात? युवा पिढी बरबाद करण्याचा हा एक मार्गच आहे. आजकाल पक्ष, नेते युवापिढीला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्यांना आकर्षित करण्यात त्यांचा त्यात स्वार्थ आहे. पण याहीपेक्षा दादागिरी, चैनी करायला मिळते म्हणून ही युवा पिढी अशा लोकांच्या दावणीला स्वतः हून बांधली जात आहे.
राजकीय पक्ष, नेत्यांना अशाच युवकांची गरज आहे. त्यांच्या चैनी- मौजेच्या बाजू सांभाळल्या की लाचार झालेल्या माणसाची जशी विचारशक्ती मारली जाते, तशी अवस्था युवकांची झाली आहे. त्यांच्या मेंदूला धार येण्यापूर्वीच गंज चढत चालला आहे. टांग्याला जुंपलेल्या घोड्यासारखी त्यांची लत झाली आहे. युवकांची "कमजोरी" हेरल्यावर त्यांच्यावर अंमल करायला मोकळे झालेले राजकीय पक्ष, नेते मंडळी त्यांच्याकडून वाट्टेल ते करून घ्यायला मोकळे होतात. युवकही ही एक बाजू सोडली आणि आपल्याला गॉडफादर मिळाला तर आपल्या मर्जीने वागायला मोकळे होतात. पण त्यांनी स्वतःचा आणि आपल्या भवितव्याचा विचार केलेला असतो का, हा प्रश्न आहे. पुढे आयुष्य पडलेले असते. पण त्यांना शॉर्टकटने ग्रासून टाकल्याने झटके पट हाती हवे आहे, या मनोवृत्तीमुळे मती काम देत नाही. शॉर्टकटचा शेवटसुद्धा लवकर होतो, याचे भान ठेवायला नको का?
हे वयच असं असतं की मौजमजा करावी, घुमावं-फिरावं , दादागिरी करावी, मस्ती करावी असे वाटत राहते. परंतु, त्यालासुद्धा मर्यादा आहेत. दुसर्याला त्रास देऊन मौजमस्ती करण्याला सार्यांचाच विरोध असणार आहे. ही मजा लुटत असताना आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे सुजाण नागरिक बनण्याची. दुसरी जबाबदारी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि कुटुंबाचा भार पेलण्याची. वयाच्या 18 वर्षांनंतर घटनेने दिलेली महत्त्वाची जबाबदारी दिली आहे, म्हणजे चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची. पण बहुधा या जबाबदाररीची भान असायला हवे ना! कानाला मोबाईल, सतत नेटशी चाळा या नव्या तंत्रज्ञानात आखंड बुडालेल्या युवापिढीचा " शॉर्ट्कट" हा नवा फार्म्युला झाला आहे. त्यांनी आपल्या समृद्ध अशा भाषेला 'शॉर्ट्कट' करून त्याची चिरफाड चालवली आहे. लांबलचक , गहन्-गंभीर शब्दांना शॉर्टरुप देऊन त्याची अवस्था फार वाईट करून टाकली आहे. इंटरनेट, मोबाईलवर अशा शॉर्टकट शब्दांचा सर्रास वापर सुरू झाल्याने त्यांची शब्दसंपतीही घटत चालली आहे. भाषेची तर पुरती वाट लावली जात आहे.धड मराठी बोलता येत नाही, ना लिहिता येत नाही. या युवकांनी केवळ भाषेतच शॉर्ट़कटपणा आणला नाही, तर प्रत्येक गोष्टीत त्यांना शॉर्टकट हवा असतो. शिवाय त्यांना आजूबाजूला आपल्या मनासासारखे घडायला हवे आहे. यात त्यांना तडजोड नको आहे. सगळ्या गोष्टी स्वतः च्या मर्जीने तोडायला, मोडायला निघालेल्या या पिढीला भविष्याची मात्र भ्रांत नाही. त्यांची विचारशक्ती कुंठीत झाली आहे. संयम नाही. सहनशीलता नाही. मनाविरुद्ध घडले की अंगावर धावून जाणारे हे युवक समोर बाप किंवा आजोबांच्या वयाची माणसे आहेत का,याचाही विचार करताना दिसत नाहीत. ही पिढी काय देशाचं हित पाहणार आहे?
देशाचा,राज्याचा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पाहणारा चांगला लोकप्रतिनिधी शोधणार्या युवकामध्येसुद्धा समजूतदारपणा हवा. आपले ते खरे न मानता चार-चौघांच्या मतांचा आदर करणारा, चार अधिक उन्हाळे-पावसाळे अधिक खाल्लेल्या लोकांचा सल्ला जाणून घेणारा हवा. १८-२० वय वर्षाचा काळ 'स्ट्रगल्"चा नाही. हा शिकण्या-सवरण्याचा काळ आहे. १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवकाला पुढे काय करायचे , याचीच दिशा नसते. त्यामुळे त्याला देशाचे प्रश्न, देशाचा विकास आणि चांगला -वाईट काय ,हे कळणार कसे? याबाबत अधिक गांभिर्याने कळण्याचे हे वय नव्हे. 'बापकमाई' वर चाललेल्या या वयात ध्येयच त्यांच्यासमोर असायला हवे. आज त्यांच्या हातात मतदानाचा अधिकार दिला हे, तो ' माकडाच्या हातात कोलीत' दिल्यासारखा प्रकार आहे. शिक्षण, ध्येय बाजूला सोडून राजकारणासारख्या अगम्य क्षेत्रात त्यांचा वावर त्यांचे आयुष्यच संपुष्टात आणणारा आहे.
आजच्या पिढीला फार लहान वयात व्यसने जडली आहेत. नशापान आता शाळकरी मुलेही करू लागली आहेत. मुलांच्यात समज लवकर येत असली तरी त्यांना दिशा देण्याची मोठी गरज आहे. शॉर्टकटच्या मागे धावू लागलेल्या युवकांना दीर्घ काळानंतरचे यश दीर्घकाळ टिकते, याची महती सांगण्याची गरज आहे. सगळेच युवक बिघडले आहेत, असे म्हणण्याची चूक करणार नाही, पण समाजात दिसते ते दुसर्या बाजूचेच अधिक दिसते. विविध संघटनांनी केलेला सर्व्हेसुद्धा तेच सांगतो. मोबाईल, एसएमएस यांमुळे युवापिढीची शब्दसंपत्ती घट चालली असल्याचा एक सर्व्हे नुकताच जाहीर झाला आहे. हीसुद्धा धोकादायक बाब आहे. नव्या तंत्रज्ञानाने, व्यसनाने आणि मनासारखे घडण्याची अपेक्षा करण्याने बिघडत चाललेल्या युवकांना आधी चांगला नागरीक बनण्याच्या शुभेच्छा देऊया आणि त्याच्यावर टाकलेली एक मतदान अधिकाराची मोठी जबाबदारी माघारी घेऊया.त्याच्यावर फेरविचार करूया.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment