Friday, November 27, 2020

चांगुलपणा जपू या, वाढवू या


जगभरातील सर्व धर्म हे चांगल्याच गोष्टींची शिकवण देतात. मात्र तरीही जगात दुर्मीळ ठरला आहे तो चांगुलपणाच! सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडलं की, वाटतं-जगाला जणू काही आगच लागली आहे, खून,चोऱ्या, हाणामाऱ्या,फसवेबाजी अशा बातम्यांना ऊतच आलेला असतो. पण यातही एकाद-दोन बातम्या चांगुलपणाच्या असतात. अपघातांदरम्यान माणुसकी पाहायला मिळते. हरवलेल्या गोष्टी अचानक कुणीतरी आणून देतं. खरोखरच माणूसपणाची आणि चांगुलपणाची काही प्रकाशमान बेटं याच समाजात प्रत्ययाला येतात. विविध निवडणुकांच्या धामधुमीमध्ये अगदी केसानं गळा कापणारेही दिसतील, सापडतील.. अशा घटना तर अनेकदा घडतात की, माणुसकीवरच्या विश्वासालाच तडा जावा.  पण चांगुलपणा हरवला नाही, हे मात्र जाणवतं, फक्त तो क्षीण झाला आहे.   बघा कुणाला हा अनुभव आला आहे का? चांगुलपणा दाखविणारी व्यक्ती अपरिचित असते. ही सर्वस्वी अपरिचित व्यक्ती आपल्याला काहीच संबंध नसतानाही चांगुलपणा दाखवते तेव्हा तो बिनचेहऱ्याचा चांगुलपणा केवळ निव्र्याज आणि निरपेक्ष असा असतो. चांगुलपणामध्ये कमी-अधिक असे मोल करताच येत नाही. पण तरीही परिचितांनी दाखविलेल्या चांगुलपणामागे इतरही काही गोष्टी असू शकतात. पण शेवटी आपली वेळ निभावून नेलेली असते. त्यामुळे  तो चांगुलपणा अनमोल ठरतो!  चांगुलपणाचा हा धर्म जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे अधोरेखित करणारेही अनुभव काहींना आले असतील. तसेच शालेय क्रमिक पुस्तकामध्ये दिलेल्या देशाच्या प्रतिज्ञेतील ओळी ‘‘सारे देशवासीय माझे बांधव आहेत’’ असाही अनुभव काहींनी घेतला असेल.

खरं तर माणसाला मिळालेलं जीवन  खूप सुंदर आहे. उगवत्या दिवसाचं सौंदर्य,  पक्ष्यांचा चिवचिवाट, टवटवीत फुलं, आजूबाजूला असलेली आपली मायेची माणसं, आपलं कार्यकर्तृत्व, अशा अनेकविध गोष्टी मनाला आनंद देत असतात. फक्त त्यासाठी लागतो सकारात्मक दृष्टिकोन. त्यासाठी चांगुलपणा कायम जागृत ठेवायला हवा. चांगुलपणा म्हणजे चांगले विचार. त्यातून चांगली कृती घडते. गरीबी, विषमता, भ्रष्टाचार, कुपोषण हे समाजाचे शत्रू आहेत आणि त्यांना आळा घालण्यासाठी स्वच्छता, शिस्त, परिश्रम या गोष्टी अंगीकारायला पाहिजेत. 

 दैनंदिन जीवनात अनेकदा आपल्याला चांगुलपणा आढळून येतो. एखादी व्यक्ती अगदी देवासारखी धावून आली, असं आपण सहज म्हणतो. त्याचा आशय हाच असतो. त्यामुळं माणसातला देव ओळखणं आणि आपल्यातलं देवत्व जागृत ठेवणं, हे  महत्त्वाचं! हे खरं आहे, की समाजात काही वाईट प्रवृत्तीही आहेत. ही वाईट प्रवृत्ती कदाचित विषमतेतून, असुरक्षिततेतून, अपयशातून वाढीस लागते, असं आपण घटकाभर मानूया. पण, या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी चांगुलपणाची  ताकद वाढवली पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येकांनी स्वतः हून प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचे संस्कार आहेत. घरातून, लहानपणापासून चांगले संस्कार वाढीस लावले पाहिजेत. छंद जोपासले पाहिजेत.यातून सर्जनशीलता वाढीस लागते. आपण एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला पाहिजे. काही वेळ आपण त्यात रममाण झालं पाहिजे. गरजूंना मदत करताना त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे. त्याच्यात कष्ट वाढीस लागले पाहिजे,असे प्रयत्न झाले पाहिजेत.

हा चांगुलपणा समाजात वाढवा म्हणून काही माणसं झटत आहेत. काहींनी चळवळी उभ्या केल्या आहेत.  राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून 'चांगुलपणाची चळवळ' उभी राहिली आहे. या चळवळीतून विविध उपक्रम राबवले जात आहेत. शेवटी चांगुलपणाची चळवळ म्हणजे तर काय?  वाईटाचा धिक्कार, वाईट गोष्टींचा नायनाट करणं हेच ना! खरोखरीच चांगुलपणाच्या चळवळीची आज गरज आहे.  चांगुलपणा हा आपल्या आत्म्याचा आवाज  असला, तरी तो सध्याच्या घडीला थोडा  क्षीण झाला आहे. तो आपण पुन्हा बुलंद करू शकतो. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.  'ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन'च्या वतीनं कोल्हापूर  जिल्ह्यातील निलेवाडी आणि बस्तवाड ही दोन  गावं दत्तक घेतली आहेत आणि त्यांना सर्व  स्तरांवर सक्षम करण्याचा प्रयत्न चालू आहे.  कोविडच्या प्रतिकूल परिस्थितीत अब्दुललाट  या छोट्याशा गावात कोविड सेंटर उभारलं आहे.  मास्क वाटप, पी. पी. ई. किट वाटप, अन्नधान्य  वाटप, कोविडच्या सुरुवातीच्या काळात गरजूंना  आश्रय देणं, शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला प्रोत्साहन करणं, अशी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. आपणही स्वतंत्रपणे, मित्रांच्या साहाय्याने असे उपक्रम राबवून समाजात चांगुलपणा वाढवला पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ देऊया. शेवटी चांगुलपणा म्हणजे तर काय?  माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे! पण आता तोच दुर्मीळ होत चालला आहे. म्हणून तर माणूस माणसासारखे वागला तरी त्याचे कौतुक करण्याची वेळ आपल्या पिढीवर आली आहे. आणि त्याची आज गरज आहे. चांगुलपणाचे कौतुक करूया आणि  चांगुलपणा वाढवूया, विस्तारुया!  चला चांगुलपणाची शेती करू या!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment