Monday, November 2, 2020

मुलींना दत्तक घेण्याचा वाढला ओढा


'मुलगा वंशाचा दिवा’ या म्हणीप्रमाणे पूर्वी मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते, परंतु सध्या हा समज मागे पडत चालला असून निपुत्रिक दाम्पत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुलग्यांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे अलीकडच्या काही वर्षांच्या प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीकडे दिसून येत आहे. याकडे आपल्याकडील बदलत्या कुटुंबव्यवस्थेचे निदर्शक म्हणून पाहता येईल. 2019-20 या वर्षात देशभरात एकूण तीन हजार 531 मुले दत्तक घेतली गेली आणि त्यांमध्ये मुलींचे प्रमाण 60 टक्के (दोन हजार 61) होते. चाइल्ड अॅडॉप्शन रिसोर्स ऑथरिटीने (सीएआरए) 2012-13 या वर्षापासूनची याबाबतची राष्ट्रीय आकडेवारी जारी केली आहे. एकूण मुले दत्तक घेण्याच्या प्रमाणात गेल्या पाच वर्षांत घट झाल्याचे यात दिसत असले, तरी मुलींच्या बाबतीत हे प्रमाण कायम आहे. याबाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असून, त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि ओरिसा ही राज्ये आघाडीवर आहेत. 

दत्तक घेण्याचा प्रकार शेकडो वर्षांंपासून सुरू आहे. यात प्रामुख्याने मुलांचाच समावेश अधिक राहायचा. संपत्ती आहे, परंतु वारस नाही. त्यामुळे आपला वारसा चालत राहावा, हा यामागे हेतू होता. समाजात एका बाजूने निपुत्रिक दाम्पत्यांची संख्या वाढत असतानाच गरिबीमुळे किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ सोडून देण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अशी बेवारस मुले मग बाल समितीच्या माध्यमातून अनाथालयात जातात. दत्तक घेण्याच्या प्रवृत्तीतही बदल घडून येत आहे. एक मूल असताना दुसरे मूल दत्तक घेतले जात आहे. मुलगा असेल तर मुलगी आणि मुलगी असेल तर मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढत आहेत, परंतु निपुत्रिकांना मुले दत्तक देण्यास अनाथालय प्राधान्य देतात. मुलं दत्तक घेण्यात 0 ते 5 या वयोगटातील तब्बल तीन हजार 120 इतकी संख्या आहे. तर 5 ते 18 या वयोगटातील 411मुलं दत्तक घेतली गेली आहेत. यातील महाराष्ट्रात सर्वाधिक 615 मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. यानंतर कर्नाटक- 272, तामिळनाडू- 271, उत्तर प्रदेश- 261 आणि ओरिसामध्ये 251 मुलं दत्तक गेली आहेत. साहजिकच मुलांना दत्तक घेण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे, हे दिसून येते. अर्थात याला पुरोगामीपणा असं काही लगेच लेबल लावणं योग्य नाही. शिवाय लोकसंख्या अधिक आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र अव्वल आहे असं ही नव्हे. मुळात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात  मूल दत्तक घेण्यासाठीच्या संस्था सर्वाधिक (साठ) आहेत. आणि देशभरात अशा संस्थांची संख्या सरासरी वीस आहे. या संस्थांमुळे मूल दत्तक घेण्याबाबत जागरूकता वाढते, त्यांमध्ये दाखल होणाऱ्या मुलांची संख्याही वाढते आणि त्यामुळे मूल दत्तक जाण्याचे प्रमाणही वाढते. मुलग्यांपेक्षा मुलींना वाढविणे सोपे असते, असा समज असल्याने मुली अधिक प्रमाणात दत्तक जात असाव्यात, असा निष्कर्ष 'सीएआरए'ने काढला आहे. अर्थात तो अगदीच चुकीचा नाही. त्याचबरोबर मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचा कल पुन्हा एकदा चौकोनी कुटुंबाकडे झुकतो आहे. पहिला मुलगा असेल, तर दुसरे मूल होऊ देण्यापेक्षा एखादी मुलगी दत्तक घ्यावी, असा विचार या वर्गांतील जोडपे करीत असल्याचे निरीक्षण आहे. यामुळे मुलीला वाढविण्याचा आनंद मिळतो आणि एखाद्या अनाथ मुलीचे जीवन फुलविल्याचे समाधानही मिळते. शिवाय, मुलीला शिक्षण देऊन, स्थिरस्थावर करून लग्न केल्यास तिच्या जबाबदारीतून मुक्तही होता येते. यामुळे बहुतेक जोडपे मुलींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करीत असतात.
पहिली मुलगी असेल, तर मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, ही बाबही लक्षात घेण्याजोगी असून, पुरुषकेंद्रित व्यवस्था भक्कम असल्याचे सूचित करणारी आहे. मूल दत्तक घेण्याबाबत जागरूकता वाढली असली, तरी चार वर्षांपेक्षा अधिक वयाची मुले दत्तक घेतली जात नसल्याने त्या मुलांचा प्रश्न कायम असल्याचे वास्तवही चिंताजनक आहे. काहीही असले तरी मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे, हेही खरेच आहे. आज सर्वच बाबतीत मुली आघाडीवर आहेत. त्यामुळे मुलगी आणि मुलगा, असा भेदही कमी झाला आहे.
मुलं दत्तक देण्याची प्रक्रिया-
दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याला मान्यताप्राप्त संस्थेत नोंदणी करावी लागते. शिवाय, मालमत्ता, नातेवाईक व इतर माहिती द्यावी लागते, तसेच बाळाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी असल्याचे पत्र व इतर अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिले मूल असताना दुसरे मूल दत्तक घ्यायचे असल्यास त्याची कारणेही विशद करावी लागतात. या प्रक्रियेला जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. संस्थेतर्फे बाळ स्वाधीन करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रथम दाम्पत्याच्या घरी भेट देऊन संपूर्ण माहिती गोळा केली जाते. त्यानंतर न्यायालयात अर्ज सादर करून न्यायालयाच्या निर्देशानुसार बाळाला दाम्पत्याच्या ताब्यात दिले जाते. दोन महिन्यानंतर दाम्पत्याच्या घराला पुन्हा भेट देऊन अहवाल तयार करण्यात येतो. हा अहवाल छाननी समितीकडे पाठवला जातो. समितीकडून ना-हरकत येताच अंतिम आदेशासाठी न्यायालयात पाठवला जातो. न्यायालयाने अंतिम आदेश देताच दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजले जाते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment