गेल्या कित्येक दशकांपासून उपासमारीची वाढती समस्या जगासमोर एक मोठे आव्हान म्हणून उभे राहवले आहे. दरवेळच्या जागतिक भुखमरी निर्देशांक अहवालावरून सूचित होते की, या संकटावर मात करण्याचे उपाय आतापर्यंत समाधानकारक नव्हते. यापूर्वीही ही समस्या आधीच गंभीर होती, परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे यावर्षी मार्च महिन्यापासून पूर्ण टाळेबंदी केल्यानंतर ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची आणि बिकट बनली आहे. आता तर वर्ल्ड फूड प्रोग्रामकडून मोठी चिंता व्यक्त करण्यात आल्याने, याचा वेळेवर विचार केला गेला नाही आणि जगातील सक्षम देशांनी मदतीची सक्रियता दाखविली नाही तर येत्या काही वर्षांत विशेषत: गरीब देशातील कमकुवत नागरिकांना भयानक परिस्थितींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या प्रमुखांनी सांगितले आहे की, पुढील वर्षी या वर्षापेक्षा वाईट परिस्थिती ओढवेल आणि या देशांना कोट्यवधी डॉलर्सची मदत न मिळाल्यास 2021 मध्ये उपासमारीच्या घटना बऱ्याच वाढतील. जागतिक महामारीमुळे संकट उद्भवलेले असतानाही, जगातील बहुतेक सक्षम देश आणि त्यांच्या नेत्यांनी यावर्षी आर्थिक मदत आणि वेगवेगळ्या वस्तूंमध्ये मदत पॅकेजेस दिली. परंतु जसे 2020 मध्ये दिसले तसे पुढील वर्षी दिसेल का, याबाबत शंका व्यक्त होत आहे.
यामुळेच जागतिक अन्न कार्यक्रम आणि त्याचे प्रमुख याविषयी जगातील प्रमुख देशांच्या नेत्यांशी सातत्याने चर्चा करीत आहेत आणि निधीच्या अभावाच्या परिस्थितीत भूकमारीचा आणखी वाढण्यच्या धोक्याचा इशारा संपूर्ण जगाला देत आहेत. ही एजन्सी जगाच्या विविध भागात पोटासाठी संघर्ष करत असलेल्या किंवा आपत्ती दरम्यान कसं तरी आयुष्य जगणाऱ्या अथवा निर्वासित छावण्यांमध्ये राहणार्या लोकांना मदत करते. त्याचे कर्मचारी लाखो भुकेल्या लोकांना अन्न आणि पेय पुरवण्यासाठी विविध प्रकारच्या जोखमीच्या परिस्थितीतही काम करतात.
भूकमारीचा सामना करण्यात या संस्थेचे प्रयत्न पाहूनच या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. साधारण सहा महिन्यांपुर्वी पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघानेदेखील कोरोना महामारीमुळे पुढच्या काळात उपासमार होण्याचा धोका मोठा असल्याचा इशारा दिला होता. मुळात दारिद्र्य आणि इतर कारणांमुळे, या समस्येच्या गंभीर परिस्थितीत एकीकडे गरजू लोकांची उपासमार चालली आहे, तर दुसरीकडे तेथील गोदामांमध्ये पडून असलेले धान्य सडून वाया जात आहे. सरकारच्या यंत्रणेतील दुर्लक्ष आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे उपासमारीची समस्या आणखी तीव्रपणे वाढली आहे.
यात अजिबात शंका नाही की,अनेक देश त्यांच्या पातळीवर जागतिक उपासमारीविरुद्ध लढा देण्यासाठी संबंधित संस्थांना मदत पुरवत आहेत. परंतु आता हे देखील खरे की, गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जगभरातील बिकट परिस्थिती कायम असल्याने कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करताना बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे आणि कदाचित त्यांच्याकडून पूर्वीसारखी मदतीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.
बऱ्याच देशांना त्यांची उध्वस्त अर्थव्यवस्था हाताळण्यात असहाय्यता जाणवू लागली आहे. परंतु या परिस्थितीत मदतीच्या अभावामुळे वाढत्या उपासमारीविरुद्धच्या लढाईवर आणखी तीव्र परिणाम होऊन मोठे संकट निर्माण होण्याची भीती आहे. आधीच जगाच्या बर्याच विकसनशील आणि गरीब देशांमध्ये धान्य नसल्यामुळे, मोठ्या लोकसंख्येसमोर जीवन मरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. आता, निधीच्या अभावामुळे उपासमारीवर विजय मिळविण्याच्या मोहिमांमध्ये व्यत्यय येणार आहे, त्यामुळे पुढील काळातील जगासमोरील उपासमारीचे संकट योग्य प्रकारे हाताळण्यासाठी जगातल्या मोठ्या देशांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment