Thursday, November 19, 2020

यापुढील काळात रोबोट जगात धुमाकूळ घालणार


जगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे रोजगारामध्येही एक मोठे संकट उभे राहिले आहे.  तंत्रज्ञानाच्या विकास आणि यांत्रिकीकरणामुळे जग बदलले आहे, यात शंका नाही, परंतु त्याची इतर चिंताजनक बाब म्हणजे लोकांची कार्यक्षमतादेखील यांत्रिक विकासामुळे घसरली आहे.  आणि आज आपण रोबोट युगात आहोत.  रोबोटच्या वाढत्या वापरामुळे ही चिंता आणखीनच तीव्र झाली आहे.त्यामुळे येत्या काही वर्षांत माणूस उत्पादन क्षेत्रात कोणत्याही स्वरूपात सहभागी होणार नाही. सगळी कामे यंत्रेच म्हणजेच रोबोट्स करतील. भविष्यातील रोजगाराच्या परिस्थितीविषयी नुकत्याच प्रकाशित झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) अहवालानुसार 2025 पर्यंत जगातील जवळपास साडे आठ कोटी रोजगार मानवाकडून मशीनकडे जाऊ शकतात.  या अहवालात असेही म्हटले आहे की, अशा परिस्थितीत  सुमारे नऊ कोटी सत्तर लाख नव्या स्वरूपाच्या नोकऱ्यादेखील विकसित होणार आहेत, ज्यात माणूस आणि यंत्रे या दोघांच्याही महत्त्वाच्या भूमिका राहणार आहेत. दोघांची सांगड घालून यापुढे रोजगार उपलब्ध होतील.  याचा अर्थ माणसाला नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. रोबोट्सच्या वाढत्या वापरामुळे पुढील पाच-दहा वर्षांत जगभरात पारंपारिक नोकर्‍या कमी व्हायला लागतील.  कोविड -19 ने जगभरात डिजिटल अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढवले ​​आहे. यामुळे रोजगार क्षेत्रातही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.  यावेळी जगातील ग्राहकांच्या प्राधान्याचा विचार केला तर रोबोटचे महत्त्व सातत्याने वाढत आहे.  जपानसारख्या देशात तर रोबोटचा घरगुती कामातदेखील वापर केला जात आहेत.  अशा परिस्थितीत कोविड-19 नंतर रोबोट जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग बनेल यात शंकाच नाही.  ज्या देशात क्रियाशील तरुणांची कमतरता आहे, अशा देशांत रोबोट अधिक फायदेशीर ठरणार आहे.  परंतु भारतासारख्या अधिक संख्या असलेल्या आणि क्रियाशील तरुणांच्या देशामध्ये, रोबोटच्या वाढीमुळे या तरुणांच्या रोजगाराचा आणि नोकरीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत रोबोटचे महत्त्व किती वाढले आहे, याचा अंदाज बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप ऑफ अमेरिकेच्या अहवालातून लावला जाऊ शकतो.  या अहवालानुसार रोबोटची जागतिक बाजारपेठ सातत्याने वाढत आहे.  सन 2010 मध्ये जगातील रोबोट मार्केटची किंमत सुमारे पंधरा अब्ज डॉलर्स होती, जी यावर्षी 2020 मध्ये सुमारे त्रेचाळीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.  असा अंदाज आहे की, 2025 पर्यंत ते सदुसष्ट अब्ज डॉलर्स होईल.  सध्या जगातील चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जर्मनी या देशांमध्ये सर्वाधिक रोबोट कार्यरत आहेत.

जगात वेगवेगळ्या प्रकारच्या रोबोटची संख्या झपाट्याने वाढत आहे.  सामान्यत: रोबोट दोन प्रकारचे असतात - औद्योगिक रोबोट आणि सेवा रोबोट.  औद्योगिक रोबोट उद्योगधंदे आणि व्यावसायिक घटकांमध्ये काम करतात, तर सर्व्हिस (सेवा) रोबोट घरगुती वापरासह विविध सेवा संबंधित क्षेत्रात कार्य करतात.  कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी रोबोटचा या क्षेत्रात चांगला वापर झाला आहे. या मशिनी नवीन युगाचे संकेत आहेत. जगातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोबोटची संख्या 2018 मध्ये सुमारे चोवीस लाख होती, जी 2022 मध्ये वाढून चाळीस लाख होण्याची शक्यता आहे.  चीनमध्ये औद्योगिक रोबोटची संख्या सर्वाधिक आहे. सन 2018 मध्ये चीनमध्ये सुमारे साडेसहा लाख औद्योगिक रोबोट होते.  चीनमधील प्रत्येक दहा हजार कर्मचार्‍यांमागे सातशे बत्तीस रोबोट कार्यरत आहेत.  तर भारतातल्या  कारखान्यांमध्ये  2018 मध्ये सुमारे तेवीस हजार रोबोट कार्यरत होते.  जगभरात औद्योगिक रोबोटच्या वापराबाबत भारताचा अकरावा क्रमांक आहे.  भारतातील औद्योगिक क्षेत्रात दर दहा हजार कर्मचार्‍यांमागे चार रोबोट कार्यरत आहेत.

जगातील औद्योगिक रोबोटच्या तुलनेत व्यावसायिक आणि घरगुती कामात मदत करणार्‍या रोबोटची संख्या वेगाने वाढत आहे.  वर्ल्ड रोबोटिक्स -2019 च्या अहवालानुसार सन 2018 मध्ये 2.71 लाख व्यावसायिक सेवा देणारे रोबोट विकले गेले आहेत आणि सन 2022 पर्यंत ही संख्या दहा लाखांच्या पुढे जाऊ शकते.  त्याचप्रमाणे सन 2018 मध्ये एक कोटी साडेतीन लाख रोबोट देशांतर्गत वापरासाठी विकले गेले होते.  2022 पर्यंत त्यांची विक्री सहा कोटींपेक्षा जास्त वाढू शकते, असा अंदाज आहे.  त्याचप्रमाणे 2018 मध्ये मनोरंजन उपकरणे असलेले 41 लाख रोबोट विकले गेले.  2022 मध्ये त्यांची संख्या साठ लाखांपर्यंत वाढू शकते, असा विश्वास आहे.  सन 2018 मध्ये पाच हजार शंभर रोबोट वैद्यकीय वापरासाठी विकले गेले होते, सन 2022 पर्यंत ही संख्या वीस हजाराहून अधिक असू शकते. रोबोटच्या वाढत्या वापरामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताच्या रोजगार बाजारावर अधिक परिणाम होणार आहे. अशा परिस्थिती देशाच्या विकासाचे धोरण आखताना रोबोटाच्या भूमिकेवरदेखील विशेष विचार- विमर्श करण्याची आवश्यकता आहे., देशातील उत्पादन क्षेत्राची स्पर्धा वैश्विक उत्पादन क्षेत्राशी आहे. त्यामुळे एक मात्र नक्की की, जग रोबोटच्या वापराच्या दिशेने जात असताना  भारतातील उत्पादन क्षेत्रेदेखील यापासून अधिक काळ लांब राहू शकत नाहीत. आयटीसारख्या क्षेत्रात तर रोबोटचे महत्त्व नाकारले जाऊच शकत नाही.

अशा परिस्थितीत एकीकडे देशात आवश्यक त्या क्षेत्रात उपयुक्त संख्येने रोबोटचा वापर केला जात आहे तर दुसरीकडे सरकारला रोबोटाच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या चिंतेकडे लक्ष देत देशातील नव्या पिढीला रोबोटसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चे उच्च कौशल्याच्या प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असणार आहे.उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासावर योग्य लक्ष ठेवून रोजगाराच्या आव्हानांदरम्यान रोजगाराच्या नव्या शक्यता साकारू शकतात.

 जागतिक बँकेच्या रोजगाररहीत विकास नावाच्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील तरुणांची वाढती संख्या लक्षात घेता दरवर्षी 81 लाख नवीन रोजगार आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज आहे.  इतक्या रोजगाराच्या संधी व नोकऱ्या मिळवण्यासाठी शैक्षणिक- प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याची आणि सार्वजनिक, खाजगी गुंतवणूकीत मोठी वाढ करावी लागेल.  जागतिक बँक म्हणते की, जगातील बहुतेक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वाढीच्या दरात झपाट्याने घट झाल्यामुळे क्रियाशील लोकसंख्या कमी झाली आहे.  भारताची पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तीस वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, म्हणूनच ही तरुण लोकसंख्या जगासाठी उपयुक्त ठरू शकते आणि भारतासाठी आर्थिक कमाईचे प्रभावी साधन सिद्ध होऊ शकते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment