"दादा, चल की रे लवकर. कधीपासूनची सांगतेय तुला. तू तर ऐकूनच घ्यायलाच तयार नाहीस." बाजारात जायला तयार होऊन बसलेली सारिका सागरदादाला अगदी काकुळतीला येऊन म्हणाली. शेवटी एकदाचा सागरदादा तिच्यासोबत निघाला. आज दिवाळी होती. सारिका चांगलीच खूश होती. आईने कपडे,फटाके खरेदीसाठी पैसे दिले होते. बाजारात गेल्यावर दादाने तिला एका कापडाच्या दुकानात नेले. तिथे तिने बरीच उलथापालथ करून आकाशी रंगाचा फ्रॉक पसंद केला. नंतर ते दोघे एका फटाक्यांच्या दुकानात गेले. सारिकाने तिला काय काय हवं , ते दादाला सांगितलं. पण सागरने त्यातल्या तिच्या कित्येक फर्माइशीला कात्री लावत नऊशे रुपयांचे फटाके खरेदी केले.
आता ती लक्ष्मी पूजनाची वाट पाहू लागली. पूजा झाल्यावरच तिला फटाके उडवायला मिळणार होते. शेवटी संध्याकाळ झाली. लक्ष्मीचे पूजन झाले आणि सारिकाने लगेच फटकांचा बॉक्स आपल्या ताब्यात घेतला. मेणबत्ती, अगरबत्ती आणि काडेपेटी घेऊन ती बाहेर रस्त्यावर आली. सागरने तिला फटाके उडवताना काळजी घ्यायला सांगितले. "फटाके लांबून उडव. फुलबाज्या कपड्यांपासून लांब ठेव. बाण उडवताना तोंड समोर नेऊ नकोस", असं बरंच काही सांगत होता. "दाद्या, मला माहित आहे रे सगळं", असं म्हणत सारिकाने त्याचे बोलणे एका कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले.
बाहेर गल्लीतली मुलंही फटाके उडवत होती. थोड्या वेळातच तिने बरेचसे फटाके उडवले. तेवढ्यात शेजारचा बजरंग एक मडके घेऊन आला. सारिकाला म्हणाला," बघ आता! मी कसा बॉम्ब फोडतो ते! कानठिळ्या बसतील, असा आवाज येतो की नाही बघ."
ती बजरंगला म्हणाली,"बजरंग,मडके मला दे ना.
"बघ, माझ्याकडे खूप मोठा आवाज करणारा बॉम्ब आहे." असे म्हणत तिने बॉक्समधून मोठा आवाज करणारा ऑटम बॉम्ब बाहेर काढला. तो रस्त्याच्या मधोमध ठेवला. त्याची थोडी वात काढली. आणि त्यावर मडके ठेवले. वात पेटवली आणि ती लांब जाऊन थांबली. तेवढ्यात सागर घरातून बाहेर रस्त्यावर आला. तो बाहेर कुठे तरी निघाला होता. त्याला अंधारात मडके दिसले नाही. सारिकाने त्याला पाहिले. आणि मोठ्याने ओरडून त्याला सांगू लागली. "अरे दादा, त्या मडक्याखाली बॉम्ब आहे. तिथून जाऊ नको." पण कसचं काय! बॉम्ब धडामकन फुटला. आवाजाचा मोठा धमाका झाला. त्याबरोबर मडके फुटले आणि त्याचे छोटे छोटे तुकडे होऊन आकाशात उडाले. त्यातला एक तुकडा सागरच्या कपाळाला लागला.
सागर कपाळ धरून तडफडू लागला. सारिका धावतच सागरजवळ गेली. "काय झालं रे दादा?" म्हणत तिने त्याचा कपाळावरचा हात काढला. हात काढताच डाव्या बाजूच्या भुवयाच्यावरून भळाभळा रक्त येऊ लागले. रक्त पाहून सारिका जोरात किंचाळली. तिचा ओरडा ऐकून शेजारची मुलं धावत तिच्याजवळ आली. कुणीतरी जाऊन सारिकाच्या आईला सांगितले.
आईने त्याला जवळच असलेल्या कुलकर्णी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी जखम पुसून काढली. तिथे चांगली खोच पडली होती. दोन टाके बसवून डॉक्टरांनी पट्टी केली. डॉक्टर म्हणाले,"नशीब चांगलं, नाही तर डोळा गेला असता."
घरी आल्यावर आईने टाके बसल्याचे सारिकाला सांगितले. सारिकाला रडूच कोसळले. ती सागरदादाजवळ गेली आणि हुंदके आवरत म्हणाली,"दादा,मला माफ कर."
सागर तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला,"तुला तुझी चूक लक्षात आली ना! म्हणजे आता शिक्षा तुला मिळालीच आहे. आपल्या चुकीचे प्रायश्चित्त घेणे म्हणजेच शिक्षा घेणे. एक लक्षात ठेव. चूक करणारी व्यक्ती स्वतःला दोष देत असते. ही चूक तुझ्यासाठी मोठी शिकवण आहे. तुझ्या आता पक्के लक्षात राहील की फटाके उडवताना कोणती काळजी घ्यावी."
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment