Sunday, November 1, 2020

आनंद आणि प्रकाशाच्या उत्सवाला संयमाची जोड द्या


दिवाळीचा सण दरवर्षी येतो आणि प्रत्येकजण आपापल्यापरीने आनंदाने, उत्साहाने साजरी करतो.तसं पाहायला गेलं तर आपण भारतीय माणसं उत्सवप्रिय आहोत. पण यंदाची दिवाळी नेहमीपेक्षा निराळी आहे. कोरोना संसर्गाच्या सावटाखाली आपण दिवाळी साजरी करत आहोत. सध्या आपल्या देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट येत आहे, ही बाब समाधानाची असली तरी परदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उचल खाल्ली आहे. काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा लागला आहे. दुसरी लाट भयंकर सु शकेल, असे शास्त्रज्ञ, जाणकार सांगत आहेत, त्यामुळे कोरोना संपला नाही,याची जाणीव ठेवून वागलं पाहिजे. कोरोना कमी झाला म्हणून पुन्हा संयम सोडून चालणार नाही. जोपर्यंत या रोगाचा नायनाट होत नाही,तोपर्यंत आपल्याला सावधपणे वावरलं पाहिजे. कोरोनावरची लस कधी येईल, याचा अद्याप ठावठिकाणा नाही. लस निर्मितीला कालावधी हा लागतोच, कारण त्यात घाई करून चालत नाही. सध्या विविध देशांमध्ये किमान दहा लसींवर काम चालू आहे. कदाचित मार्च 2021 च्या पुढे या लसी बाजारात येण्याची शक्यता आहे. देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी शाळांमधील मुलांना जून-जुलै 2021 मध्ये लस देण्याचे मागे जाहीर केले आहे. यात कदाचित मागे-पुढे होऊ शकते. तोपर्यंत आपल्याला तीन गोष्टी कायम ठेवाव्या लागणार आहे. घराबाहेर पडले की, मास्कचा वापर करायला हवा. सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावा आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य ठेवावा. स्वच्छता राखली पाहिजे. आता थोडाक्यासाठी घाईगडबड करून चालणार नाही. 

या कोरोनामुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसला आहेच,पण अनेकांना रोजगार, नोकरी गमवावी लागली आहे. टाळेबंदीमुळे आपली अर्थव्यवस्था आणखी मागे गेली आहे. ती उभी राहायला वेळ लागणार आहे. इतके नुकसान झाले असताना पुन्हा त्याच तोंडी गेल्यास आपल्याला आणखी मोठा फटका बसणार आहे. शाळा-कॉलेजेस बंद असल्याने अब्जावधीचा दणका आपल्या देशाला बसला आहे. या टाळेबंदीमुळे मानसिक आजाराने आपल्या देशात डोके वर काढले आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना डोळ्यांचे विकार जडले आहेत. आपण यापूर्वी मुलांच्या हातात मोबाईल द्यायला नको म्हणत होतो,पण या काळात नाईलाजास्तव त्यांच्या हातात मोबाईल दिला. नाहीतर मुलांचे शिक्षण थांबणार होते. असे असले तरी मोबाईल, इंटरनेट, वीज अशा अनेक कारणांच्या आभावामुळे जवळपास40 टक्के मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. ऑफलाईन शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली असली तरी ती जुजबी आहे, हे कळून चुकले आहे,पण यालाही पर्याय नाही. ऑनलाईन शिक्षण काही प्रचलित शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही. सांगायचा मुद्दा असा की,कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडल्या आहेत. या जगात माणुसकीच नाही, असे प्रसंग कित्येकांना अनुभवायला मिळाले आहेत. काटकसर करून जगण्याचा अनुभव आपल्याला मिळाला आहे. यातून चांगल्या माणुसकीचेही दर्शन घडलं आहे. मात्र या काळाने आपल्याला उतू नका, मातू नका याची शिकवण दिली आहे. वास्तविक या काळात आलेल्या अनुभवाचा आधार घेऊन यापुढे माणूस जगत राहिला तर सुखा-शांतीने जगता येईल.
एकीकडे हा नवा अनुभव जग किंवा आपला देश घेत असताना हाथरससारख्या घटना घडतात तेव्हा पुन्हा आपण त्याच मार्गाने जात आहोत, याचे वाईट वाटते. याला मिळालेला राजकीय रंग तर क्लेशदायक आहे. सण-उत्सव यानिमित्ताने आपण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचे वचन घेतले पाहिजे. उत्सव साजरा करताना आपण मूल्यांची जपणूक करायला शिकलं पाहिजे. त्यात आता भर संयमाची घालावी लागणार आहे. उत्सवप्रिय असणं, यात काही गैर नाही.पण त्याला सामाजिक बांधिकलकीची जोड असायला हवी.
       दिवाळीपुरता विचार करायचा म्हटले तर या सणाच्या निमित्ताने किती लोकांना व त्यांच्या मुलांना नवे कपडे परिधान करायला मिळतात. किती लोकांच्या घरी गोडधोड, फराळाचे पदार्थ बनवले जातात. किती लोकांच्या घरी दिव्यांची रोषणाई असते.याचा कधी आपण विचार केला आहे का? सारा देश बाहेर उत्सव साजरा करित असतो, पण आपल्या मुलांना नवे कपडे लेवू, गोडधोड खाऊ घालू शकत नाही, म्हणून डोळ्यांतून दु:खाश्रू वाहवत बसलेल्या आई-वडिलांना मदत नाही ते नाहीच पण आपण धीर देण्याचं काम तरी केलं आहे का? ते दु:खाश्रू पुसण्याचं कार्य म्हणजेच सर्वात मोठा दीपोत्सव आहे. हे काम महत्त्वाचं आहे. आपल्या पाठीशी समाज आहे, ही जाणिव त्यांच्यात निर्माण करून देण्याचं काम आपण करायला हवं.
वीटभट्ट्यांवर, ऊसाच्या फडात रात्रंदिवस खपणारी, पोटासाठी पडेल ते काम करणारी, प्रसंगी मागून खाणारी माणसं इथे कमी नाहीत. त्यांच्याही डोळ्यांत प्रकाश उजळायला हवा. यानिमित्तानं दुसर्‍याचाही विचार करायला शिकलं पाहिजे. त्यांनाही या आनंद सोहळ्यात आपापल्या परीनं सामावून घ्यायला हवं. आपण मोठ्या आनंदानं, उत्साहानं सण साजरा करत असतो. या नादात आपला दुसर्‍याला त्रास होतो का, याचाही विचार केला पाहिजे. आपण आपल्याच मस्तीत राहून चालत नाही. पण आजच्या जमान्यात फारच थोडी माणसं विचार करताना दिसतात. त्यांना आपल्या आनंदात सामावून घेताना दिसतात. इतरांची दु:खे दूर करून आनंद साजरा करण्यात फार मोठा आनंद आहे.
काही माणसं सगळ्याच गोष्टीकडे उदासिनदृष्टीने पाहात असतात. सतत डोक्यावर मोठं ओझं घेऊन वावरत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, समस्या, अडचणी असतात.प्रत्येकाला कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक प्रॉब्लेम असतात. म्हणून काय ती डोक्यावर घेऊन वाहायची असतात का? सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे, असे म्हटले जात असले तरी ते आपण मानण्यावर अवलंबून आहे. दु:ख करत बसल्याने सुख आयते येत नाही.दु:खालाच सुख मानून आनंदाने जगायचे असते. आणि तसं जगलं पाहिजे. नाही तर विरस जगण्याला अर्थ तरी काय आहे? सण आपल्यात उत्साह आणतात. त्यात मोठ्या आनंदानं सामिल व्हावं.
आजकाल आजूबाजूला बर्‍याच काही आपल्याला नको असलेल्या गोष्टी घडत असतात. आपल्या देशात भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. दिवसाढवळ्या आपल्या माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी मुडदे पडत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज कोणावर ना कोणावर अन्याय घडत आहे. या गोष्टी थांबवता येणं शक्य नाही, पण कमी जरूर करता येतील. त्यासाठी एका विचाराच्या माणसांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे. यावर निव्वळ भाषणे देऊन चालणार नाहीत. संयमाने या समस्यांच्या मुळाशी जायला हवे. हे करताना आपल्या स्वत:लाही बदलायला हवे. आपल्या आवडी-निवडींना, स्वभावाला मुरड घालावी लागणार आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, असा विचार करून समाजासाठी काही केले पाहिजे,ही बांधिलकी जोपासली पाहिजे. मन संवेदनशील असलं पाहिजे. सहिष्णु असलं पाहिजे.
समाज अनेक कारणांनी प्रदुषित होत आहे. तसं माणसाच्या कृपेनं निसर्गदेखील प्रदूषित होत आहे. जल, हवा,ध्वनी प्रदूषणाने माणूस माणसाचंच जिणं हराम करत आहे. सांडपाणी,रसायन मिश्रित कारखाण्याची मळी नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यातल्या पाण्याच्या सेवनानं आरोग्य बिघडत चाललं आहे. जमिनीत रासायनिक खताचा बेसुमार वापर करून तिला नापिक करत आहोत. कारखान्यांच्या धुरंड्यांमधून, वाहनांमधून निघणारा विषारी वायू माणसाचंच आयुष्य कमी करत आहे. त्यातच करू नये ते माणूस करू लागल्याने स्वत:च स्वत:च्या शरीराची नासाडी करून घेत आहे. दारू, मावा-गुटखा, बिडी-सिगरेट याची लत माणूस हकनाक लावून घेत आहे. सरळ जीवन जगण्याचा मंत्र आपल्या साधू-संतांनी दिला असताना माणूस वाकड्यात शिरत आहे. यावर समुहाने आवर घालता येईल. 'गाव करी तिथे राव काय करील...' अशी एक म्हण आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून वाईटाचा नाश करण्याचा चंग बांधला तर सर्व काही शक्य आहे. सध्या आपण दिवाळी साजरी करतो आहे. प्रदूषण करणार्‍या फटाक्यांचा जपून वापर कराच, पण त्याचा अतिरेकही होऊ देऊ नका.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

No comments:

Post a Comment