Tuesday, November 24, 2020

लठ्ठपणा धोकादायक वळणावर...


येत्या 30 वर्षांत म्हणजे 2050 सालापर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या 'ओव्हरवेट' म्हणजेच ज्यादा वजनाची असेल. अनहेल्दी म्हणजेच पौष्टिकता नसलेला आहार हाच लठ्ठपणाला कारणीभूत ठरेल. जगातील सुमारे 150 कोटी लोक अशा खाण्यामुळे लठ्ठपणाशी झुंज देतील, अशी धक्कादायक माहिती जर्मनीच्या संशोधकांच्या अभ्यासातून समोर आली आहे. जर्मनीच्या वैज्ञानिकांनी लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरून हे अनुमान काढले आहेत. पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च या संस्थेने याबाबतचे संशोधन केले आहे. सध्या लोक ज्या पद्धतीचा आहार घेत आहेत, तसाच आहार पुढे चालू राहिला तर येत्या 30 वर्षांत

लोकांच्या शरीरात पोषक घटकांची तीव्र कमतरता दिसून येईल. दुसरीकडे 30 वर्षांनंतर 50 कोटी लोकांचे वजन हे सरासरीपेक्षा कमी असेल. हे लोक भूक आणि काम या गोष्टीसाठी लढताना दिसतील, असे संशोधकांचा अभ्यास सांगतो. या दोन्ही गोष्टी जगाला संकटात टाकणाऱ्या आहेत. एकीकडे माणसे लठ्ठपणा मुळे विविध आजाराने ग्रासलेली असतील तर दुसरीकडे काम नसल्याने आणि दुसरीकडे सकस आहार मिळत नसल्याने लोक भूकबळीला बळी पडतील. कोरोना महामारीच्या संकटामुळे पुढील वर्ष गरीब देशासह अन्य  लोकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या प्रमुखांनी म्हटले आहे. जगाने या दोन्ही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

भारत, अमेरिका, ब्रिटनमधील परिस्थिती?

भारतात 13.5 कोटी लोक लठ्ठपणाशी झगडत आहेत. तसेच इतर आजारांशीही लढा देत आहेत. भारतातील 7.2 कोटी लोक मधुमेह आणि 8 कोटी लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. सीडीसी या अमेरिकेतील सर्वात मोठ्या आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की,2009  आणि 2010 या काळात अमेरिकेतील 35.7 टक्के लोक आधीच लठ्ठपणाने ग्रस्त होते. 2018 पर्यंत ही आकडेवारी 42.4 टक्क्यांपर्यंत वाढली होती. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या संख्येत अमेरीका आघाडीवर आहे. ही संख्या का वाढली असेल,याचा अंदाज यायला हरकत नाही. ब्रिटनमधील 28 टक्के लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत. जर्मन शास्त्रज्ञांच्या मते, जगभरात लठ्ठपणाने हृदयरोग आणि मधुमेहांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल. त्यामुळे कोरोनासारख्या साथ रोगात मृत्यूचा धोकाही वाढतो.

पौष्टिक आहाराचा अभाव

शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जेव्हा सेवन करण्यात येते तेव्हा त्याचे रूपांतर चरबीत होते. सुरुवातीला चरबीच्या पेशी आकाराने वाढतात. जेव्हा आकाराची मर्यादा संपते, त्यानंतर दुस-या पेशी तयार होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे चरबीच्या पेशी वाढत जातात व स्थूलपणा येतो. जेव्हा वजन कमी होते. त्या वेळेस चरबीच्या पेशींचा आकार कमी होतो. पण संख्या कमी  होत नाही.आहार. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात उच्च उष्मांकयुक्त (हाय कॅलरी फूड) सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक घटक मिळत नाहीत. मात्र, यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढू लागते. या बाबतीत लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतेय. हल्ली लहान मुले टीव्ही आणि मोबाइल या गोष्टींमध्ये फार वेळ घालवतात. मैदानवर जाण्याचे आणि शारीरिक क्रिया करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आहे. याशिवाय लठ्ठपणाचे सर्वांत दुर्लक्षित कारण म्हणजे, हॉर्मोनल समस्या. शरीरात संप्रेरकांमुळे शरीरातील कार्याचे नियमन होते. त्यापैकी एक संप्रेरक म्हणजे ‘थायरॉइड हॉर्मोन’. हे संप्रेरक अतिरिक्त स्रवल्याने लठ्ठपणा आणि शरीरावर अनैसर्गिक सूज दिसू शकते.

अनहेल्दी आहाराचा ट्रेंड कसा सुरू झाला?

1965 सालापासून जगभरात खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाला. लोकांच्या अन्नात प्रोसेस्ड फूड, उच्च प्रथिनांचे मासांहार, जास्त साखर असणारे पदार्थ आणि कार्बोहायड्रेट समाविष्ट झाले. हळूहळू प्रक्रिया केलेले अन्न तयार होऊ लागले. असे अन्न स्वस्त दरांत उपलब्ध होते आणि ते तयार करताना मशीनरीचा वापर होत असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे शक्य होते. प्रोसेस्ड फूडमध्ये पोषक मूल्ये कमी असतात. अशा अन्नात अनेक रसायनांचा वापर केला जातो. या सर्व गोष्टींमुळे 2010 पर्यंत जगातील 29 टक्के लोकांचे वजन ओव्हरवेट झाले होते. 9 टक्के लोक लठ्ठपणाला तोंड देत होते.

लठ्ठपणाची मुख्य कारणे  

 शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती कॅलरीजपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठवून राहतात व लठ्ठपणास सुरुवात होते. बैठे काम करणा-या लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त आढळून येतो. आनुवंशिकता हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.थॉयरॉइडच्या आजारामुळे, विशेषत: हायपोथॉयरॉडिझममुळे वजन वाढतेय.इन्सुलिनोमा ज्या रुग्णामधील रक्तातील साखरेचे प्रमाण नेहमी कमी होते (हायपोग्लायसेमिया) अशा रुग्णांना वारंवार खावे लागते त्यामुळेही वजन वाढते. मानसिक आजार  विशेषत: डिप्रेशन असणा-या रुग्णांना वारंवार जेवण्याची सवय असते. त्यामुळेही वजन वाढते. स्त्रियांमध्ये गरोदरपणात व नंतर 8 ते 10 किलो वजन वाढते व ते नंतर कंट्रोल न केल्यास तसेच राहते.


 लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास दुष्परिणाम 

 ब्लड प्रेशर (रक्तदाबाचा त्रास), डायबेटीस (मधुमेह) जसे आयुष्यभर राहतात तसेच लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास तोही आयुष्यभराचा सोबती होऊन बसतो. यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. थकवा लवकर येणे. दिवसभर सुस्तपणा, कामात उत्साह न वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घोरणे, डायबेटीस, हायपरटेन्शन, गुडघ्यावर अतिरिक्त भारामुळे गुडघेदुखी, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, वंध्यत्व येणे,  तळहात तळपायाची आग होणे व मुंग्या येणे आदी दुष्परिणाम जाणवतात.


लठ्ठपणातील आहार  असावा 

लठ्ठपणा नियंत्रणात राहण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. ज्यांनी चांगला फायदा होतो. एकाच वेळी पोटभर जेवणे टाळावे. रात्रीचे जेवण थोडे हलके घ्यावे. जेवणानंतर एक तास आडवे पडू नये. तेलकट, तुपकट, शिळे जेवण, बटाटा, भात, दुधाचे पदार्थ (पनीर, बटर, चीज) नॉन व्हेज आदी पदार्थ  टाळावेत तर सलाड (काकडी, टोमॅटो, बीट, मुळा) कडधान्ये (मूग, मटकी, चवळी) भाज्यांचे सूप या पदार्थांचे सेवन वाढवावे.


व्यायाम काय काय करावा 

लठ्ठपणा नियंत्रणात राहण्यासाठी सर्वात सोपा परवडणारा आणि अतिशय परिणामकारक व्यायाम म्हणजे (ब्रिस्क वॉकिंग) म्हणजे वेगाने चालणे, चालताना  घाम आला पाहिजे. रोज कमीत कमी 40 मिनिटे ब्रिस्क वॉक घेतला पाहिजे. घाम येणे म्हणजे शरीरातील चरबी (फॅट) जळणे. जितका जास्त घाम येईल तितके चांगले. व्यायामात नियमितता असावी व व्यावसायिक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. लठ्ठपणा हा ऐकण्यास जितका साधा सरळ वाटतो तितकाच तापदायक. वेळीच उपाय न केल्यास गंभीर स्वरूपाचे परिणाम दिसून येतात. शेवटी आपल्या तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

1 comment:


  1. येत्या दहा ते बारा वर्षांत भारत हा लठ्ठपणाची राजधानी बनू शकतो. केवळ भारतच नाही तर जगातील ५१ टक्‍के किंवा ४ अब्जाहून अधिक लोक पुढील १२ वर्षांत लठ्ठपणाचे शिकार होतील, असा निष्कर्ष एका संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे.
    'वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन'या संघटनेच्या २०२३ अँटलसच्या नव्या अहवालानुसार ही बाब समोर आली. यात २०३५ पर्यंत भारतासह जगातील निम्म्यान अधिक लोकसंख्या लठ्ठपणाने ग्रासलेली असेल, असे स्पष्ट केले आहे.
    लठ्ठपणा हा देशात होणाऱ्या मृत्यूच्या संभाव्य कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. लठ्ठपणाला सहव्याधी म्हणजेच कोमॉर्बिडीटी असेही संबोधले जाते. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, गॅझेटचे व्यसन, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव आणि चुकीच्या आहाराच्या सवयी हे लठ्ठपणाचे कारण आहे. यामुळे तणाव, नैराश्य, चिंता, निराशा, एकाकीपणा, आत्मसन्मान कमी होऊ शकतो.

    ReplyDelete