Thursday, August 1, 2019

प्लास्टिक कचऱ्यापासून हायड्रोजन गॅस?


'प्लास्टिक कचरा' ही एक मोठी डोकेदुखी आपल्यासह सगळ्याच देशांना भेडसावत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे मुंबई शहराची 2005 मध्ये आणि त्यानंतर दरवर्षी काय अवस्था होते आहे,हे आपण पाहात आहोतच. प्लास्टिक कचरा जाळल्यानंतर त्यातून निघणारा विषारी दूर आजूबाजूच्या रहिवाशांना आजाराने  बाधित करून टाकत आहे. शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था मात्र याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपल्या देशात खूप मोठा प्लास्टिक कचरा जमा होत असून त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. आपल्या देशातल्या बहुतांश राज्यांनी प्लास्टिक पिशव्यांना वापरास बंदी घातली आहे. पण तरीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला नाही. साहजिकच आपल्याकडील कित्येक कायदे फक्त कागदावरच आहे. 

या प्लास्टिकचे काय करायचे असा प्रश्न सर्वच देशांना पडला आहे. यातून संशोधन सुरू आहे. आता या प्लास्टिक कचऱ्याचा उपयोग आपल्याला फायद्यासाठीच करता येईल, अशी सुचिन्हे दिसत आहेत. ब्रिटन येथील चेस्टर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी प्लास्टिक कचऱ्यातून हायड्रोजन गॅस निर्मिती करण्याचा चांगलाच उपाय शोधून काढला आहे. या हायड्रोजनचा उपयोग आपल्याला वाहनांमध्ये इंधन आणि वीज निर्मितीसाठी करता येणार आहे.
संशोधकांनी दावा केला आहे की, या प्रक्रियेत खूप कमी प्रमाणात मिथेन गॅसचे उत्सर्जन होईल. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. संशोधकांचे म्हणणे, असे की, प्लास्टिक कचऱ्याची समस्या झेलणाऱ्या समाजाला हा पर्याय चांगलाच साबीत होऊ शकतो. याच वर्षी पहिल्यांदाच या प्रक्रियेचा वापर चेशायरमध्ये एलेसमेरे पोर्टजवळ एका संयंत्रणेत केला जाणार आहे.
या प्रक्रियेत एका गरम भट्टीत प्लास्टिक कचरा टाकून हायड्रोजनसह काही गॅसचे उत्पादन केले जाणार आहे. या योजनेतून कधीच रिसायकलिंग न केलेल्या जवळपास 2.5 कोटी टन खराब प्लास्टिक कचऱ्याचा वापर केला जाणार आहे. यामुळे पेट्रोलियम पदार्थांचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी हे एक चांगले पाऊल म्हटले पाहिजे
आपल्या देशातदेखील फार मोठी प्लास्टिक कचऱ्याची समस्याच आहे. पर्यावरण हानी तर होत आहेत,पण जनावरेदेखील प्लास्टिक खाऊन दगावत आहेत. आपल्या देशातसुद्धा अशा प्रकारची यंत्रणा उभी राहणे, आवश्यक आहे. नव्या साधनांचा वापर करून आपल्या देशापुढील समस्यांचे निराकरण व्हायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत  7038121012


No comments:

Post a Comment