Saturday, August 24, 2019

अनेक ट्रेंडची सुरुवात करणारा एकमेवाद्वितीय: अमिताभ

आज कौन बनेगा करोडपतीआणि अमिताभ बच्चन हे एक घट्ट समीकरण झालं आहे. त्यामुळे या शोच्या अकराव्या पर्वातही सूत्रसंचालक म्हणून अमिताभ त्याच उत्साहाने प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र नुकताच अमिताभनं एक मोठा खुलासा केला आहे. जेव्हा या शोचं सूत्रसंचालन करण्याविषयी पहिल्यांदा त्यांना विचारणा झाली तेव्हा ते लगेचच तयार झाला नव्हता. त्या काळात म्हणजे साधारण 19 वर्षांपूर्वी अमिताभ यांचे चित्रपट रुपेरी पडद्यावर सपशेल आपटत होते. नेमकं काय करायचं, याबद्दल स्पष्टता नसताना या शोसाठीचा निर्णय घेणंही त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. मुळातच चित्रपट यशस्वी होवोत किंवा न होवोत, त्यांच्यासारख्या महानायकाने टीव्हीवर काम करू नये, असाच सल्ला त्यांना कुटुंबीयांकडून आणि परिचितांकडून मिळाला होता.

मात्र आता तो कबूल करतोय त्याची गेलेली प्रतिष्ठा याच टीव्ही शोने मिळवून दिली. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून एक कोटी रुपये जिंकण्याचं स्वप्न सर्वसामान्यांना दाखवणारा आणि त्याची पूर्ती करणारा हा शो टेलिव्हिजनवर 2000 साली दाखल झाला. तेव्हापासून आजवर या शोचे प्रदर्शक बदलले. आधीस्टार प्लसवाहिनीवर हा शो प्रसारित होत होता. 2010 मध्ये तोसोनी टेलिव्हिजनकडे आला. वेळोवेळी या शोमध्येही अनेक बदल करण्यात आले. शोमधून मिळणारी रक्कमही वाढत गेली. पण केबीसीशी सूत्रसंचालक म्हणून जोडलं गेलेलं अमिताभ बच्चन यांचं नाव आजही कायम आहे. 19 वर्षे  आणि अकरा पर्व या शोशी तो जोडला गेला. या शोची सुरुवातही योगायोगानेच झाली होती, असं अमिताभ यांनी सांगितलं. सगळीकडेच अपयश चाखायला मिळालेलं असताना टीव्हीसारखं तुलनेने नवं माध्यम आणि नव्या संकल्पनेचा शो करणं घरच्यांना फारसं पटत नव्हतं. त्यामुळे टीव्ही न करण्याचा सल्लाच आपल्याला मिळाला होता, असं त्यानं कबूल केलं आहे. अमिताभ यांच्याशिवाय हा शो होऊच शकत नाही, असा निर्धार असलेल्या शोच्या कर्त्यांकरवित्या टीमने अखेर त्यांना लंडनमध्ये मूळ ब्रिटिश शो दाखवण्यासाठी नेलं होतं.
केबीसीचा प्रस्ताव घेऊन निर्माते जेव्हा त्याच्याकडे गेले, तेव्हाची परिस्थिती थोडी कठीण होती. मात्र त्याच्याकडे या शोचं एक निश्चित स्वरूप होतं, त्यांची एक यंत्रणा होती. या शोची ही यंत्रणा, हा शो कसा आयोजित केला जातो ते पाहायला मिळेल का, अशी विचारणा त्यांनी केली होती. यासाठी निर्मात्यांनी त्याला चक्क इंग्लंडला नेले. तिथं हा शो प्रत्यक्ष कसा केला जातो, कसा चित्रित होतो, त्याचा सेट हे सगळं त्यांनी पाहिलं. त्या सेटवर जे वातावरण होतं ते तसंच मला मिळेल का? तो तसाच माहौल असेल तर मी हा शो करू शकेन, असं त्याने निर्मात्याला सांगितलं. त्याच्या सगळ्या अटी मान्य करण्यात आल्या। त्यामुळे अमिताभलाही यश मिळालं आणि केबीसीला! हा शो अमिताभने करायाला घेतला तेव्हा तो  यांनी घेतला तेव्हा ते 57 वर्षांचा होता आणि आज 76 व्या वर्षीही ते त्याच उत्साहाने हा शो करत आहेत. हे माझं काम आहे आणि ते मला केलंच पाहिजे. उलट, मी वेगवेगळ्या प्रकारचं काम करत राहिलं पाहिजे, हा त्याचा आग्रह असतो. आणि जोपर्यंत आपण प्रत्येक जण जिवंत आहोत तोवर प्रत्येकालाच चांगलं काम मिळवण्यासाठी, ते त्याच पद्धतीने करण्यासाठी झगडत राहिलं पाहिजे, असं तो म्हणतो.

आज बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रातला तो महानायक म्हटला जातो. त्याने खूप उन्हाळे पावसाळे खाल्ले आहेत. त्याला यहशी सहजासहजी मिळालं नाही. 11 ऑक्टोबर 1942 रोजि अलाहाबाद येथे अमिताभ वच्चन याचा जन्म झाला. त्याचे शिक्षण इथेच सेंट मेरिज बॉइज हायस्कूलमध्ये झालं.शाळेतही तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा पुढे होता. वर्गात तो अभ्यासाकडे लक्ष देत असे., तर मैदानातही तो खेळण्याचा पूर्ण आनंद घेत असे. घरी तो खोडकरपणे वागत असला तरी संक़टाच्यावेळी त्याच्यातील प्रगल्भता दिसे. वडिलांचे व्यक्तिस्वातंत्र्य जपण्याची कला त्याला लहानपणीच अवगत झाली होती. डॉ. हरिवंशराय बच्चन हे अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांचा बराचसा वेळ वाचन आणि लिखाणात जाई. पतीच्या व्यस्त जीवनक्रमाशी  तेजी बच्चन यांनी स्वत:ला जुळवून घेतलं होतं. आपले वडिल विशेष व्यक्ती आहेत हे अमिताभ आणि अजिताभ या दोघा भांवडांनी स्वीकारल होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर अमिताभने चंदीगडमधल्या सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. किरोरिमल कॉलेजचा प्रवेश निश्चित झाल्यावर त्याने दिल्लीला जाण्याचे ठरवले. आपल्या मोठ्या मुलाला दूर पाठवायला तेजी बच्चन सुरुवातीला तयार नव्हत्या. मात्र आता आपली मुलं मोठी झाली आहेत, ती आता दूर जाणार हे सत्य हरिवंशराय आणि तेजी बच्चन या दोघांनी समजून घेतलं.
पदवी घेतल्यानंतर अमिताभने कोलकात्यामध्ये पहिली नोकरी स्वीकारली. त्याचे सुरुवातीचे दिवस साहसानेच भरले होते. त्याचा दिवस पहाटे सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालू राहायचा. जवळपास तीन वर्षे त्याचा हा दिनक्रम होता. अशा प्रकारे त्याचे आयुष्य सुरळीत सुरू असतानाही अमिताभ मनातून अस्वस्थ होता. मितभाषी आणि आत्ममग्न अमिताभ स्वत:चं स्वप्न इतरांना बोलून दाखवत नव्हता.त्याचा भाऊ अजिताभदेखील तिथेच कोलकात्याला त्याच्यासोबत होता. त्याने त्याची इच्छा ओळखली. एका मासिकात छापून आलेला चित्रपट प्रवेशाचा अर्ज त्याने एके दिवशी आणला. अर्जासोबत छायाचित्र आवश्यक होते. म्हणून स्वत: जवळील साध्या कॅमेराने त्याने अमिताभचा फोटो काढला. अर्ज आणि फोटो पत्राद्वारे मुंबईला पाठवला. उत्तर येईल, असं अमिताभला वाटलं नव्हतं. पण लवकरच प्रतिसाद मिळाला. चांग़ल्या बातमीने नवीन निर्णय घ्यायलाही भाग पाडलं. प्रथम आलाहाबादला राहणार्या आई-वडिलांना कळवणं भाग होतं. त्यानंतर सुरक्षित नोकरीवर पाणी सोडून चित्रपट क्षेत्रातला जुगार खेळायला तयार राहायला हवं होतं. अमिताभनं दुसरा पर्याय स्वीकारायचं ठरवलं. जुनी नोकरी आणि मित्रांना रामराम करत त्याने स्वप्ननगरी मुंबईच्या दिशेला कूच केलं. के.. अब्बास यांनी सात हिंदुस्थानी चित्रपटातल्या एका व्यक्तिरेखेसाठी अमिताभची निवड केली. 1969 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातल्या अमिताभच्या अभिनयाने अनेकजण प्रभावित झाले. या चित्रपटामुळे चांगल्या संधी येतील, ही अपेक्षा मात्र फोल ठरली. उलट महिन्याभरानंतर हे स्वप्न भयानक वास्तव समोर बनून आलं. स्टुडिओ ते स्टुडिओ फिरून , प्रत्येक निर्मात्याच्या दारावर टकटक करूनही भूमिका मिळत नव्हत्या. अमिताभ स्वाभिमानी असल्याने घरून आर्थिक मदत घेत नव्हता. त्यामुळे त्याला अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागले. चित्रपट निर्माता हृषिकेश मुखर्जी यांनी त्याला गुड्डी मधली भूमिका देऊ केली. पण तो सात हिंदुस्थानी मध्ये काम करीत असल्याचे समजल्यावर त्यांनी अमिताभाऐवजी नवोदित समित भांजा याला संधी दिली. नंतर मुखर्जींनी राजेश खन्नाच्या आनंदमध्ये अमिताभला घेतले. हे 1970 साल होतं आणि एका संध्याकाळी पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभी केली असता अमिताभकडे ऑटोग्राफ मागितला होता.
आनंदमधल्या अमिताभच्या दमदार अभिनयामुळे खरं तर हा चित्रपट टेक ऑफ पॉईंट ठरला असता, मात्र अमिताभच्या नशिबात यश एवढ्या लवकर लिहिले नव्हते. त्यानंतर आलेले अकरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. परवाना, प्यार की कहानी, रेश्मा और शेरा, बन्सी बिरजू, बॉम्बे टू गोवा, एक नजर, रास्ते का पत्थर, संजोग, गरम मसाला, एक पाहुणी भूमिका आणि अखेरचा बंधे हाथ एकापाठोपाठ आले आणि मागे परतले. ही अपयशाची गाथा प्रकाश मेहरा यांच्या जंजीरने खंडित केली. 1973 साली आलेला हा चित्रपट अमिताभच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने सहकलाकार जया भादुरीशी लग्न केलं. आणि दोन वर्षांनंतर शोलेच्या बंगलोर इथल्या आऊटडोअर चित्रिकरणादरम्यान श्वेताचा जन्म झाला.
अँग्री यंग मॅनची प्रतिमा दशकभर कायम राहिली. अमिताभसोबत काम केलेल्या चित्रपटनिर्मात्यांनी त्याला अनेक प्रतिमा दिल्या. हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटातला अस्वस्थ, यश चोप्रा यांचा रोमांटिक , प्रकाश मेहरांचा गंभीर आणि मनमोहन देसाईंचा मनोरंजक अमिताभ प्रेक्षकांना दिसला. या व्यक्तिरेखांमध्ये विविध रंग भरण्याची चढाओढ सुरू झाली. काही वेळा ती प्रेक्षकांच्या पसंदीस उतरली. काही वेळा नुकसान झालं. हा नवा सुपरस्टार राजेश खन्नाच्या स्थानाला धक्के देऊ लागला आणि एक वेळ अशी आली की, या स्थानासाठी अमिताभला पसंदी देण्यात आली. अमिताभने राजेश खन्नाला मागे टाकले आणि सर्व दिर्ग्दर्शकांनी त्याला नायक मानण्यास सुरुवात केली. असंख्य चाहत्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. चित्रपट पंडितांनी बॉक्स ऑफिसवरील यशाला क्रांतीची उपमा दिली. दर शुक्रवारी अमिताभचे नवे सुपरहिट चित्रपट येऊ लागले.
अमिताभच्या लोकप्रियतेने कळस गाठला. आता केवळ ठिणगी पडायचा अवकाश होता आणि मनमोहन देसाई यांच्या कुली चित्रपटावेळी ठिणगी पडली. पुनीत इस्सरसमवेत हाणामारीचे दृश्य करत असताना सुपरस्टारला अपघात झाला. जबरदस्त मार बसला. गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या आईची मैत्रीण इंदिरा गांधी या त्याला भेटायला आल्याच्या बातम्यांनी हेडलाईन मिळवली. अवी टंडनच्या खुद्दाची तिकिटे भरमसाठ किंमतीत काळ्या बाजारात विकली जाऊ लागली. सहा महिन्यानंतर त्याला घरी आणले गेले. तो बरा व्हावा,यासाठी सर्व देश प्रार्थना करू लागला. देशभरातून असंख्य पवित्र धागे पाठवण्यात आले. अनेकांनी उपास केले, तो वाचण्यासाठी यात्रा केल्या. त्याने बहिष्कार टाकलेल्या प्रसारमाध्यमांनाही स्वत:चा मान बाजुला ठेवला आणि घडलेल्या दुर्घटनेची दखल घेतली. काही काळ या घटनेने इतर सर्व झाकोळून टाकले.
त्याच्या चित्रपटातल्या नायकाप्रमाणे सुपरस्टार जादुईरीतीने पूर्ववत झाला. हळूहळू का होईना पण तो स्वत:च्या पायावर उभा राहिला. मनमोहन देसाईंच्या कुलीमध्ये ज्या दृश्यात तो जखमी झाला होता, त्याच दृश्याने त्याने कामाची सुरुवात केली. त्याच्या डोळ्यांमध्ये भितीचा लवलेश नव्हता. अपघातानंतर सर्वप्रथम नमकहलाल प्रदर्शित झाला आणि त्यापाठोपाठ कुली आला. याचित्रपटात अमिताभ जखमी झाल्याचं दृश्य फ्रीझ करून दाखवण्यात आलं. अपघाताच्या स्मृतींना उजाळा मिळू नये यासाठी अमिताभच्या चाहत्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे बोलले गेले. त्याचा राजकारणातला प्रवेशाचा निर्णय भावनाशीलतेतून घेण्यात आला. आई इंदिरा गांधी यांच्या खुनानंतर राजकारणात आलेल्या राजीव गांधींना आजूबाजूला विश्वासातील माणसे हवी होती. मित्र अमिताभ त्यासाठी परिपूर्ण उमेदवार होता. अमिताभ अलाहाबाद मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाला. पण महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांनी त्याची अवस्था अभिमन्यूप्रमाणे केली. राजकारण सोडण्याचा एकमेव पर्याय त्याच्यासमोर राहिला.
राजकारणातला घोडेबाजार कवीच्या मुलाला मानवला नाही. शेवटी तो पुन्हा कलात्मक क्षेत्राकडे वळला. अतिरिक्त बोजाने वाकलेल्या सुपरस्टारने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अखेरीस शहनशहाच्या रुपात तो ओळखीच्या जगात आला. 1986 मध्ये के. भाग्यराजचा संस्मरणीय आखरी रास्ता प्रदर्शित झाला. वडील आणि मुलगा यांची दुहेरी भूमिका असलेली कथा अतिशय सुरेख होती. साधारण 88 सालच्या दरम्यान चुका व्हायला सुरुवात झाली. अर्थात याला अमिताभ सर्वस्वी जबाबदार नव्हता. त्याचे जुने दिग्दर्शक अमिताभसोबत यशाला ग्राह्य धरू लागले. गंगा जमुना सरस्वतीने या प्रकाराला सुरुवात आणि 1989 मध्ये आलेल्या मैं आझाद हूं चा अपवाद वगळता जादूगर आणि तुफानमुळे ग्रहण सुरू राहिले.
आपल्या यशस्वी कारकिर्दीचा पुनश्च आढावा घेणं आवश्यक होतं. मुलुल आनंदने अमिताभला पुन्हा स्टारपदावर नेण्याचे ठरवले. 1990 मध्ये अग्निपथ, 1991 मध्ये हम आणि 1992 मध्ये खुदा गवाह आला. अग्निपथ ही अंडरवर्ल्डची कथा होती. हममध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीने उदवस्त झालेल्या कुटुंबाच चित्रण होतं. तर खुदा गवाह कॉस्च्यूम ड्रामा होता. पण हे प्रयत्न वाया गेले. 90 च्या दशकात सुरुवातीला अमिताभने मीडियावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला. प्रसारमाध्यमांमुळे सुपरस्टार होता येत नाही, हे सिद्ध झाले. या माध्यमांच्या मदतीशिवाय अमिताभने स्वत:चे करिअर प्रगतिपथावर ठेवलं होतं. आणि मीडियाचा जोरदार प्रचारही अजुबा, इंद्रजीत, अकेला, इन्सानियत यांना तारू शकला नाही. अमिताभला माघार घ्यावी लागली. मी माझ्या करिअरचा मागोवा घेत आहे, माझ्यातल्या अभिनेत्याला पुन्हा जाणवत आहे, असे त्याने सांगितलं.
हे कारण सुयोग्य होतं. 1973 मध्ये जंजीर प्रदर्शित झाल्यापासून आणि नंतर 1982 दरम्यान झालेल्या अपघातानंतर अमिताभ अविश्रांत काम करत होता. त्याने संन्यास घेतल्यावर अनेक निर्माते आणि लेखक त्याच्याकडे कथा घेऊन जात. पण त्याचे मौन पाहून माघारी येत. याच दरम्यान त्याने टीव्ही एशिया काढला. त्यानंतर एबीकॉर्पची घोषणा केली. ही त्याच्यासाठी सर्वात मोठी आणि सर्वात वाईट घटना होती. या घटनेमुळे त्याच्या गुणावगुणावर प्रकाश पडला. त्याने अनेकांवर सहजरित्या विश्वास टाकला. कंपनी डबघाईला आली. एक विजेता पराभूत झाल्याचं हे ठळक उदाहरण होतं. बोफोर्स कांड, व्ही.पी. सिंग सरकारकडून झालेली चौकशी, बंगळूरु मधल्या मिस वर्ल्ड 96 स्पर्धेचे आयोजन, टीका, जीवे मारण्याच्या धमक्या आणि प्रसारमाध्यमांचा राग यामुळे अमिताभची अवस्था वाईट झाली. नशिबाने घाला घातला . अमिताभकडून सर्व काही दूर गेले. केवळ त्याच्याबद्दलचा आदर कायम राहिला. बोफर्स कांडामधून त्याचं नाव काढून घेण्यासाठी त्याने लढा दिला.21 मे 1991 ला राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर सर्व शांत झालं.
पुन्हा एकदा संकटं चालून येत होती. त्याचा पुर्न पर्दापणाचा चित्रपट मृत्यूदाता बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर त्याच्या अल्बमकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्याच्या जाहिरातींवर बंदी आली. या सर्व अपयशाला त्याने धीराने तोंड दिलं. सूर्यवंशम सारखे काही चांगले चित्रपट, लाल बादशहासारखे वाईट आणि मेजरसाबसारखे विवादात्मक चित्रपट त्याने केले. 2000 मध्ये कौन बनेगा करोडपती द्वारे या सुपरस्टारने छोट्या पडद्यावर पर्दापण केलं. त्याच वेळी आदित्य चोप्रा दिग्दर्शित मोहबतेंपासून त्याची नवी सुरुवात झाली. मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांमध्ये त्याने चरित्र भूमिका करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांनंतरशो बिझनेसमध्ये त्याला चार दशक पूर्ण होतील. आज 76 व्या वर्षीही वर्ष वय असताना तो  मध्यवर्ती भूमिका करत आहे. त्याने स्वत:ची किंमतही घसरू दिली नाही. असे करणारा तो एकमेकाद्वितीय आहे. आजमितीस त्याच्यासारखा कोणी अन्य नाही. त्याने अनेक ट्रेंडची सुरुवात केली. त्याने मायकल जॅक्सनच्या धर्तीवर पहिला संगीत स्टेज शो केला. चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी स्वत:चा आवाज त्याने दिला. स्वत:चा मुलगा त्याच क्षेत्रात असताना प्रेक्षकांच्या नजरा स्वत:कडे वळविण्याची क्षमता असणं ही मोठी गोष्ट आहे. अभिषेक बच्चनलाही त्याचा अभिमान आहे. आपण एका महान वडिलांच्या घरी जन्मलो आहोत,याची त्याला बालपणीच कल्पना आली होती. त्यामुळे तो आपल्या बापाचे महत्त्व जाणून घेऊन आपली वाटचाल करत राहिला. हिंदी चित्रपटाच्या इतिहास अमिताभने आपले स्थान पक्के करताना स्वत: ला वेळोवेळी सिद्धही केले आहे. असा हा महानायक एकमेवाद्वितीय आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत



No comments:

Post a Comment