Tuesday, August 27, 2019

(बालकथा)आळशी राजा


एकदा गोवळकोंडा राज्यात मोठा दुष्काळ पडला. पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली. जनता घागरी घेऊन वणवण फिरू लागली. पाण्यासाठी लोकांमध्ये भांडणे होऊ लागली. शेवटी जनतेने राजाकडे तक्रार केली.
राज्यावर राजा गोळायुद्ध राज्य करीत होता. तो प्रत्येक गोष्ट मंत्री आणि अधिकाऱयांना विचारत असे. ते जे काही सांगत,तेवढेच तो करे, तेवढेच पोपटासारखा बोले. काय चांगलं,काय वाईट याची काहीच माहिती नसे. तो खूप आळशी होता. सकाळी दात घासायलाही तो आळस करायचा. आठ आठ दिवस आंघोळ करत नसे. तासनतास झोपलेला असे. कधी डोळे उघडे असतात,तेव्हा मंत्री आणि अधिकारी राजकीय कागदपत्रांवर सह्या घेत. राजा पेंगत पेंगतच सह्या करत असे.

एक दिवस राजाने गोवळकोंडा राज्यातील सगळी झाडे तोडण्याच्या कागदावर सही केली.  दुसऱ्या दिवशी राज्यातील तलाव, नदी, झऱ्याचे पाणी दुसऱ्या राज्यांना विकण्याच्या कागदावर सही केली. मग काय तीन महिन्यात गोवळकोंडा राज्यात एक झाडही शिल्लक राहिले नाही. पाणी बाटल्यांमध्ये विकलं जाऊ लागलं. राज्यातले अधिकारी, कर्मचारी विकतचे पाणी पिऊ लागले. संपूर्ण जनता वैतागून गेली.
 एक दिवस महालाच्या बाहेर मोठी गडबड झाली. जनता घोषणा, गोंगाट करत होती. राजाने मंत्र्याला विचारलं,"जनतेने काय गोंधळ चालवलाय?"
"महाराज,दोन वर्षांपासून राज्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे पाण्यासाठी गोंधळ घालतेय." मोठ्या बेफिकीरीने मंत्र्याने उत्तर दिले.
राजा जांभई देत म्हणाला,"ठीक आहे ठीक आहे. ताबडतोब पावसाला येण्याचे आदेश देऊन टाका. मला झोप येतेय." असे म्हणून तो पुन्हा शयनगृहात निघून गेला. मंत्री विचार करू लागला. मग जनतेला म्हणाला,"परवा दिवशी गोवळकोंड्यात पाऊस होईल. जनतेला काही समजलच नाही. पण मंत्री सांगताहेत तर त्यांच्यावर अविश्वास कसा दाखवायचा. दुसऱ्या दिवशी गोवळकोंडाची जनता आश्चर्य चकित झाली. प्रत्येक गल्लीत मोठमोठ्या काहिली ठेवण्यात आल्या होत्या. त्या पाण्याने भरलेल्या होत्या. त्यात बेडकं खेळत होती. डरांव डरांव करत त्यांनी गलका उडवला होता. त्यांच्या आवाजानं जनतेचं डोकं दुखू लागलं. पण पावसाचा काही पत्ता नव्हता. आकाशात बिलकुल ढग नव्हते. 
एक दोन दिवस नाही तर चांगला आठवडाभर बेडकं आरडत ओरडत होती. पाऊस काही झाला नाही. उन्हामुळे मोठमोठ्या काहिली सुखून जाऊ लागल्या. बेडकं उड्या मारून बाहेर पडू लागली. 
गोवळकोंड्याच्या शाळेतल्या कल्पना आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून जनतेचा अडाणीपणा दूर करण्याचा विचार केला. पाऊस कसा पडतो, हे सांगणारे नाटक बसवले. आणि ते गोवळकोंड्याच्या प्रत्येक गल्लीत सादर केले. झाडे नसतील, पाऊस होणार नाही, असा संदेश त्यातून दिला. 
दुसऱ्या दिवशी गोवळकोंडा राज्यात लाखो रोपे लावण्यात आली. जनता रोज एक घागर झाडाला पाणी घालू लागले. हे सर्व पाहून वर्षाराणी खूश झाली. गोवळकोंडा राज्यावर ढंगांची गर्दी जमली. त्यावर्षी गोवळकोंडावर खूप मोठा पाऊस झाला. जनता आनंदाने नाचू लागली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment