Tuesday, August 27, 2019

(बालकथा) मधाची विहीर


चारी बाजूंनी रेतीचे तुफान उठले होते आणि वर प्रखर सूर्य आग ओकत होता. महालाच्या बुरुजावर सुलतान विमनस्कपणे उभा होता. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला," या खुदा, या प्रखर उन्हाने माझ्या राज्याचं काय होईल?"
तेवढ्यात त्याची पत्नी उसासे टाकत आली आणि म्हणाली,"शहजादेला काय झालंय कोण जाणे,पण उठल्यापासून रडतो आहे. "
सुलतान आपल्या मुलाच्या खोलीत गेला. प्रेमानं विचारलं," बेटा, काय झालं? का रडतो आहेस?" 
तो म्हणाला,"अब्बाजान, स्वप्नात मी दुधाच्या आणि मधाच्या विहिरी पाहिल्या. मला त्या हव्यात." असे म्हणून तो पुन्हा रडायला लागला. सुलतानने त्याला खूप समजावलं, परंतु तो रडायचा काही थांबला नाही.
सुलतान प्रखर उन्हाच्या झळा विसरून गेला. तो वजीरला सोबत घेऊन त्या विहिरींच्या शोधात निघाला. पुढे अंतर चालल्यावर त्यांना एका खजुराच्या झाडाजवळ एक उंट दिसला.जवळच एक वृद्ध नमाज पडत होता. नमाज पडून झाला. वृद्ध व्यक्तीने सुलतान आणि वजीराला विचारलं,"खूप भुकेले दिसता?"  मग त्याने उत्तराची वाट न पाहता हवेत हात फिरवला . चार सुंदर तबकांमधून फळे आणि मेवा समोर आला. दोघेही चकित झाले. 

तेवढ्यात सुलतानला आपल्या मुलाचे मागणे आठवले.त्याने वृद्ध माणसाला विचारले,"बडे मियाँ, तुम्ही माझी अडचण दूर कराल का?"
"सांग,काय हवंय तुला?"
"माझ्या मुलाला दुधाच्या आणि मधाच्या विहिरी हव्या आहेत."
सुलतानचे बोलणे ऐकून वृद्ध मोठमोठ्याने हसू लागला. आणि पुढे म्हणाला," दुधाच्या आणि मधाच्या विहिरी? थांब! पाहतो." असे म्हणून त्याने  आपले डोळे मिटले. काही तरी पुटपुटत हवेत हात फिरवला. क्षणात दुधाच्या आणि मधाच्या दोन विहिरी खजुराच्या झाडाजवळ दिसू लागल्या. त्या पाहून सुलतानच्या आनंदाला पारावर उरला नाही.त्या वृद्ध माणसाला खूप धन्यवाद द्यायचे होते,पण वृद्ध आणि उंट तिथून गायब झाले होते. 
सुलतान परत आपल्या मुलाकडे आला आणि म्हणाला,"आता रडायचं थांब आणि चल माझ्याबरोबर!"
वीस उंटांवर खण्यापिण्याचे सामान लादून ते विहिरींच्या दिशेने निघाले. विहिरीजवळच पाल ठोकली. शहजादा विहिरीच्या काठी गेला.दुधाच्या आणि मधाच्या विहिरी पाहून त्याला फार आनंद झाला. सुलतान मुलाला सोडून परत राज्यात परतला.
दुसऱ्या दिवशी शहजादेने पाहिले की, एक म्हातारी घागर घेऊन विहिरींच्या दिशेने येत आहे. तिथे आल्यावर म्हातारीने आपली घागर मधाच्या विहिरीत बुडवली आणि घागर मधाने भरून घेतली. शहजादेने एक दगड घेतला आणि त्या घागरीवर फेकला. घागर फुटली. ती म्हातारी गपगुमान तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा शहजादेने त्या म्हातारीला पाहिले. तिने दुसरी घागर आणली होती. तिने पुन्हा घागर मधाने भरून घेतली आणि चालू लागली. शहजादेने पुन्हा दगड मारला. या वेळेला घागर फुटली नाही,पण एक छिद्र पडले. म्हातारीने त्या छिद्रावर बोट ठेवले आणि चालू लागली.
शहजादा त्या म्हातारीच्या मागे मागे चालू लागला. एका झोपडीजवळ म्हातारी थांबली. तिने ते मध एका नक्षीदार सुरईत भरले. मग त्या घागरीचे छिद्र बंद करण्याच्या कामाला लागली. 
शहजादा लांबून हे सर्व पाहात होता. तेवढ्यात त्याला जोराची तहान लागली. त्याचा घसा कोरडा पडू लागला. तो म्हातारीजवळ गेला आणि म्हणाला,"मला तहान लागली आहे, पाणी द्या."
काहीच उत्तर न देता मधाने भरलेली सुरई आणि एक ग्लास त्याच्यापुढे ठेवला. मध पिल्याने शहजादेची तहान आणखी वाढली. त्याने पुन्हा म्हातारीकडे पाणी मागितले. म्हातारी म्हणाली,"इथे पाणी मिळणार नाही."
"मग कुठे पाणी मिळेल?" सुलतानच्या मुलाने अधीर होऊन विचारले.
"पाण्यासाठी तुला इथे खूप कष्ट करावे लागेल. तिथे कुदळ पडली आहे.विहीर खोद आणि पाणी मिळव." म्हातारी उत्तरली.
शहजादा काही बोलू शकला नाही. तो गपगुमान आपल्या वस्तीकडे निघाला. त्याला वाटले, तिथे तरी पाणी मिळेल. पण तिथे पोहचतो तर काय? तिथे काहीच नव्हतं. ना मधाची,दुधाची विहीर होती, ना खजुराचे झाड! फक्त रेतीचे वादळ घोंगावत होते.
तहानेने व्याकूळ शहजादा पुन्हा म्हातारीकडे आला. त्याने पुन्हा पाणी मागितले. तिने त्याच्या हातात कुदळ थांबवली. शहजादा गपचिप विहीर खोदण्याच्या कामाला लागला. 
काही दिवसांनी सुलतान आपल्या मुलाला पाहायला आला. पण तिथे ना विहिरी होत्या ना खजुराचे झाड!त्याला काहीच सुचेना. तो भांबावल्यासारखा झाला. तेवढ्यात त्याला एक उंट दिसला. त्यावर तोच पांढरी दाढीचा वृद्ध दिसला. सुलतान आणि वजीरला पाहून थांबला.
"माझा मुलगा कुठे आहे?" सुलतानने विचारले.
"मी शोधतो. माझ्यासोबत ये." वृद्ध हसला. 
चालत चालत ते खूप दूर निघून आले. संध्याकाळ होत आली होती. सुलतान आणि वजीरला तहान लागली होती. सुलतान वृद्ध माणसाला म्हणाला,"बडे मियाँ, खूप तहान लागली आहे."
वृद्ध हसून म्हणाला,"आणखी काही अंतर जाऊ."
ते आणखी पुढे आले. तिथे सुलतानला त्याचा मुलगा विहीर खोदताना दिसला. त्याने शहजादेला विचारलं,"तू विहीर का खोदतो आहेस?"
तेवढ्यात तिथे म्हातारी आली. तिला पाहून सुलतान म्हणाला," खूप तहान लागली आहे."
म्हातारीने मधाची सुरई आणि ग्लास आणून दिला आणि म्हणाली,"मध घ्या."
"मला मध नको,पाणी हवंय."सुलतान म्हणाला.
म्हातारी मोठमोठ्याने हसू लागली. म्हणाली,"मला वाटलं,तुम्हाला पाण्याची तहान लागत नाही.दुधाची आणि मधाची तहान लागते. पाणी प्यायचं असेल तर तुझ्या मुलाप्रमाणे कुदळ घे आणि विहीर खोदायला लाग."
बिचारा सुलतान काय करणार!  वजीर आणि सुलतानने हातात कुदळ घेतली. तेही विहीर खोदायच्या कामाला लागले. तिघेही काम करत असल्याने विहीरीची खोली वाढत गेली. हळूहळू त्यांना पाणी दिसू लागले. काही वेळाने विहिरीत बरेच पाणी आले. त्या पाण्याचा सगळ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. पाणी खूप मधुर होते. वृद्ध विहिरी काठावरच उभा होता. 
जाताना सुलतानाने वृद्ध माणसाला धन्यवाद दिले. म्हणाला,"मला सर्व काही समजलं आहे. मी माझ्या प्रजेला तहानलेले सोडून माझ्या मुलासाठी दुधाच्या आणि मधाच्या विहिरी मागितल्या.यामुळेच मला हे सर्व भोगावे लागले."
सुलतान मुलाला घेऊन राज्यात आला. त्या दिवसांपासून राज्यात विहिरी खोदल्या जाऊ लागल्या. प्रजेबरोबर शहजादा, सुलतान आणि वजीर स्वतः काम करू लागले. काही दिवसांतच राज्यात सर्वत्र विहिरी खोदल्या गेल्या. आता त्या वाळवंटी प्रदेशात कुणालाच पाण्याची कमतरता नव्हती. राज्यात आनंदी वातावरण पसरले. पण त्या दिवसांपासून सुलतानला कधीच तो वृद्ध आणि उंट दिसला नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
7038121012 

No comments:

Post a Comment