Thursday, August 29, 2019

प्राथमिक शाळेत खेळ अनिवार्य हवा


अलीकडे विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू जागतिक स्तरावर चमकत असताना दिसत आहेत. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली. हिमा दास ही एक भारतीय धावपटू आहे. २0१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर अँथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे. गेल्या महिन्यात  चीनमध्ये पार पडलेल्या  स्पर्धेत तिने पुन्हा पाच सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावण्याचे काम केले आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कुस्तीत कांस्यपदक जिंकून देशाची  शान राखली. क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा वाढत आहे,पण हा दबदबा 125 कोटींच्या  तुलनेत कमीच आहे. सध्या देशात खेळाविषयी चांगले वातावरण तयार होत असताना शासन पातळीवरही त्याला प्रोत्साहन मिळायला हवे. शालेयस्तरावर, आणि महाविद्यालयीन स्तरावर यासाठी विशेष अकॅडमी  विभाग बनवून आवड असलेल्या मुलांना प्रशिक्षण द्यायला हवे. अजूनही शालेय स्तरावर मुलांच्या कौशल्याकडे म्हणावे असे लक्ष दिले जात नाही. शाळांमध्ये शिकवला जाणारा इतिहास ,भूगोल फारच कंटाळवाणा आहे. तो टाळून त्या ऐवजी मुलांना स्थानिक पीकपाणी यावर शिक्षण द्यायला हवे. आज मुलांना कशाची गरज आहे, त्याला प्राधान्य द्यायला हवे. वैज्ञानिक प्रयोग आणि कार्यानुभव या विषयांवर भर देताना त्यासाठी आवश्यक साधने प्राथमिक स्तरावर उपलब्ध व्हायला हवी, त्याच्या देखभालीची व्यवस्था व्हावी.
खरे तर खेळाची सुरुवात प्राथमिक शाळेपासूनच होणं गरजेचं आहे.  उत्तम आरोग्य असेल तर त्याचे डोके सुध्दा उत्तम राहते, असे म्हटले जाते. मुलाचा शारीरिक,भावनिक विकास खेळातूनच होतो. आज मुले घरात बसल्या ठिकाणी मोबाईल वर सर्व खेळ खेळत आहेत. मैदानी खेळ कमी झाले. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यांचा मेंदू काम करेनासे झाले आहे. आज आपल्या मुलांचा शाळा व्यतिरिक्तचा वेळ शिकवणीमध्ये जात आहे. शाळांमध्ये खेळाचे प्रकार अधिक आणि तास कमी, असा प्रकार आहे. शाळेत किती व कोणकोणते खेळ शिकवले जातात हा एक संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो. त्यास शिक्षक दोषी आहेत असे नाही. कारण तेथे खेळाच्या शिक्षकाची कमतरता भासते. आज कित्येक शाळेत खेळाचे शिक्षकच नाहीत तर काही शाळेत खेळाचे मैदान उपलब्ध नाही तर मुले काय खेळतील आणि कुठे खेळतील? कधी कधी मुले ज्यांच्या शाळेत मैदान आहे तेथे खेळताना दिसून येतात त्यांना कोणाचे मार्गदर्शन नसते, ना कोणाचा कानमंत्र ते आपले उगीच खेळ खेळत असतात. परंतु त्यांना चांगला गुरु मिळाला तर अनेक स्तरावर आपले नाव व कीर्ती मिळवू शकतात. शाळेत शिकलेल्या खेळाचा आयुष्यात फायदा होतो. शालेय जीवन संपल्यावर आपले कोणत्याच खेळाकडे लक्ष जात नाही कारण त्या खेळाविषयी जी रूची शाळेत तयार व्ह्ययला पाहिजे ते होत नाही. शाळेतील खेळ पावसाळी आणि हिवाळी खेळापुरती आहे, हा  औपचारिकपणा कमी व्हायला हवा.
उच्च प्राथमिक शाळेमधून खेळाला प्राधान्य देताना विषय क्रीडा शिक्षकाची नेमणूक व्हायला हवी. खेळातले बारकावे, याच कालावधीत मजबूत झाल्यास त्याचा त्याला पुढे उपयोग होतो. सहाव्या वर्गापासून तरी खेळाच्या शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुले योग्य दिशेत मोकळेपणाने खेळ खेळतील. एखाद्या खेळात निपुण व्हायाचे असेल तर विषय शिक्षकच फक्त त्यास न्याय देऊ शकतो. प्रत्येक  ऑलिम्पिकचा इतिहास पाहिले असता भारत देश सन 1900 पासून यात सहभाग घेत आहे. आजपर्यंत भारताने नऊ सुवर्ण चार रौप्य आणि बारा कांस्य असे एकूण 25 पदके गेल्या 116 वर्षात मिळविले आहेत आणि गेल्या २0 वर्षांचा मगोवा घेतल्यास असे लक्षात येते की सन 1996 पासून भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कांस्यपदकाची कमाई केली. याचाच अर्थ गेल्या वीस वर्षापासून भारताचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग आणि पदकांची कमाई वाढत आहे, हे लक्षात ठेवून देश पातळीवर खास असे क्रीडा धोरण राबवण्याची गरज आहे. प्राथमिळ स्तरापासूनच क्रीडा क्षेत्राकडे पाहायला हवे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment