Tuesday, August 27, 2019

(बालकथा) आळसी गॅरी


'गुटर गु' ... लवकर ऊठ." जेली कबुतरीण आपल्या मुलाला- गॅरीला सकाळपासून उठवत होती. "आपल्या पार्कमध्ये दाणे टिपायला चल, नाही तर उपाशी राहावं लागेल."
"मम्मी, खूप झोप आलीय,थोडा वेळ झोपू दे ना." असं म्हणून गॅरी पुन्हा झोपून जाई. सर्व पक्षी रोज सकाळी लवकर उठून दाणे टिपायला जायचे.  तो मात्र झोपून राहायचा. पार्कमध्ये पौष्टिक अन्न मिळायचे. सकाळी लोक पक्ष्यांसाठी गहू, बाजरी, ज्वारी,मका, कडधान्यांची दाणे आणून द्यायची. सर्व पक्षी नाश्त्यानंतर सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका मारायचे. याचा शारीरिक आणि मानसिक फायदा व्हायचा.
जेरी परत येताना काही दाणे चोचीत टिपून आणायची. ग्लो कबूतर तिला म्हणायचा,"असं करून तू आपल्या मुलाला बिघडवते आहेस."
सकाळी उशिरा उठत असल्याने गॅरी आपली दिवस भराची कामदेखील व्यवस्थितरित्या करू शकत नव्हता. यामुळे आपल्या सहकारयांच्या तुलनेत तो कमजोर बनला होता.

एक दिवस सर्व पक्षी पार्कमध्ये दाणे टिपत होते. तेवढ्यात पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या. भिजण्याच्या भीतीने सगळ्यांनी भराभरा दाणे टिपले आणि आपापल्या घराच्या दिशेने उडाले. गडबडीत जेली आपल्या मुलासाठी दाणे टिपायची विसरून गेली. जेली आणि ग्लो आपल्या घरट्यात पोहचले तेव्हा, मुसळधार पावसाळा सुरुवात झाली होती.
घरट्यात गॅरी आपल्या मम्मीची वाट पाहत होता. मम्मीजवळ खायला काहीच नाही,पाहून गॅरी रडू लागला. जेलीने त्याला पाऊस थांबेपर्यंत थांबायला सांगितलं. पण तो थांबायचं नावच घेत नव्हता. गॅरी भुकेने व्याकूळ झाला होता आणि त्याचं रडणंही थांबत नव्हतं. आता ग्लो आणि जेली तर काय करणार? असहाय्य होते. तेवढ्यात शेजारच्या घरट्यातील मेरी चिमणीने आवाज दिला,"जेलीताई, काय झालं गंगॅरी का रडतोय सारखा?"
जेलीने कारण सांगितल्यावर ती म्हणाली,"गॅरीला माझ्या घरी पाठवून दे. मी अडचणीच्या काळासाठी काही दाणे टिपून ठेवले आहेत. ते खायला देईन." तिला आपल्या मुलाला शेजारी अन्नासाठी पाठवणं योग्य वाटलं नाही. तेवढ्यात चिमणीचा पुन्हा आवाज आला,"अगं, जेली, संकोच करू नकोस. गॅरी मला माझ्या मुलासारखाच. त्याला लवकर पाठव. मला तर त्याचा भुकेने व्याकूळ झालेला रडण्याचा आवाज मला सहन होत नाहीए."  गॅरीने जाण्यासाठी झेप घेतली खरी, पण कमजोर पंख, जोराचे वारे आणि पावसाचे फवारे सहन करू शकला नाही. तो खाली पडला. जेलीने त्याचा मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकला. त्याचे रडणे-ओरडणे ऐकून सगळेच पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर आले. ज्युली कोकिळा बँडेज घेऊन आली. मेरी आपल्या चोचीने गॅरीला दाणे भरू लागली... सगळ्यांचा आपलेपणा आणि लाडप्रेम पाहून गॅरी लवकर बरा झाला.
आता तो समजून चुकला होता की, तंदुरुस्त राहण्यासाठी खाणं पिणं आणि सकाळी लवकर उठणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गॅरीने सूर्याच्या पहिल्या किरणाला वंदन करून पार्कच्या दिशेने झेप घेतली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
7038121012


No comments:

Post a Comment