Sunday, August 4, 2019

(बालकथा) अजयचा समजूतदारपणा



अनंतपूर गावात एक प्राथमिक शाळा होती. सातवीपर्यंतच तिथं शिक्षण होतं. पुढच्या शिक्षणासाठी मुलांना जवळपास सहा किलोमीटर दूर जावं लागायचं. याच गावात अजय राहत होता. तो चांगल्या मार्कांनी सातवी पास झाला होता. त्याला पुढं खूप शिकायचं होतं. पण घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. अजयचे वडील भीमाशंकरदेखील त्याला शिकवू इच्छित होते. परंतु, अडचण अशी की, अजयला इतक्या लांब चालत आणि एकटं कसं पाठवायचं. सहा किलोमीटर चालत जायचं आणि यायचं अशक्य होतं. शेवटी गावातल्या जयवंतरावांकडून दोन हजार रुपये हात उसने घेतले आणि अजयला एक सायकल घेऊन दिली.
जयवंतरावांना गावातले सगळे लोक मानसन्मान  द्यायचे. लोक त्यांना आदराने  'दादा' म्हणायचे. तेही गावातल्या लोकांच्या प्रत्येक सुख-दुःखात  सहभागी व्हायचे.  लोकांच्या मदतीला धावायचे. ते धार्मिक वृत्तीचे होते. ते रोज सकाळी नदी काठी  असलेल्या शंकराच्या मंदिरात पूजापाठसाठी जायचे. 
एके दिवशी जयवंतराव पूजेसाठी शंकराच्या मंदिराकडे निघाले होते.पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, पूजापाठसाठी फुले आणायचीच विसरले. त्यांनी मंदिराच्या आजूबाजूला पाहिलं. उजव्या बाजूला त्यांना कण्हेरीचे झाड दिसले. त्याला फुले लगडली होती. पण ते झाड तारेच्या कुंपणाच्या पलीकडे होते. त्यांच्या हाताला त्याची फुले येईनात. खूप प्रयत्न करून ते थकले. तेवढ्यात त्यांना तिथून अजय जाताना दिसला. त्यांनी त्याला हाक मारली. अजय त्यांच्याजवळ गेला. जयंतराव म्हणाले,"मुला, पूजेसाठी मला थोडी फुले काढून दे."
"आजोबा, मला शाळेला जायला उशीर होतोय. शिवाय कुंपणापालिकडे जायचं म्हणजे माझा गणवेश खराब होईल." असे म्हणून अजय घाईगडबडीने निघून गेला. 
जयंतरावांना अजयचा राग आला. त्यांनी घरी आल्यावर अजयच्या वडिलांना बोलवायला पाठवलं.भीमाशंकर आल्यावर त्याला जयंतराव म्हणाले,"तुझा मुलगा तर खूप शहाणा आहे."
भीमाशंकरला सकाळचा प्रकार माहीत नव्हता. तो आनंदाने म्हणाला,"दादा, सगळी आपलीच कृपा!"
भीमाशंकरच्या या उत्तराने आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला. जयंतराव संतापाने उसळून म्हणाले," ही सर्व माझीच कृपा का?" 
आता भीमाशंकर घाबरला. त्यानं हात जोडून विचारलं,"माझी काही चूक झाली का?"
"नाही रे बाबा!चूक तुझी नाही,चूक आमची झाली. आता ती चूक आम्हालाच सुधरावी लागेल. मी तुला यासाठी बोलावलं आहे की, मी तुला जे उधार पैसे दिले होते, ते मला परत पाहिजेत."
भीमाशंकर घाबरून म्हणाला,"दादा,  धान्य यायला अजून अवकाश आहे. आता मला कसं बरं जमेल? रास झाली की, तुम्हाला तुमचे पैसे देईन."
पण जयंतराव ऐकायला तयारच नव्हते. शेवटी त्यांनी पंधरा दिवसांचा वायदा दिला.
जयंतरावांच्या पैशांची जुळणी कशी करायची, याचा विचार करत तो घरी आला. पैशाची व्यवस्था कशी होणार ,याच्या काळजीने त्याला घेरले. 
काही दिवस गेले. पावसाळ्याचे दिवस होते. रात्री खूप पाऊस झाला होता. पण जयंतराव नियमांचे पक्के होते. ते न चुकता रोज देवदर्शनाला जायचे. ते रोजच्यासारखे देवदर्शनाला निघाले. सगळीकडे चिखल झाला होता. वाटेत जयंतराव घसरून पडले. ते राडेराड तर झालेच पण पाय मुरगळल्याने त्यांना वेदनेने उठताही येईना. 
तेवढ्यात अजय तिकडूनच सायकलने शाळेला निघाला होता. त्याने जयंतरावांची अवस्था पाहिली. तो लगेच तिकडे धावला. त्यांना उठण्याला मदत केली आणि रस्त्याकडेला आणून बसवलं. तिकडून येणाऱ्या एका बैलगाडीला थांबवून त्यांना गाडीत बसवलं आणि दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली. नंतर त्याने जयंतरावांच्या घरी जाऊन निरोप दिला.
अजयची ही धावपळ बघून जयंतरावांनी आश्चर्याने विचारले,"मुला, त्या दिवशी तर तू फुले तोडून द्यायला नाही म्हणालास आणि आज मात्र माझी इतकी चांगली सेवा करतो आहेस?"
"आजोबा, त्या दिवशी माझी 'पीटी'ची परीक्षा होती.  उशीर झाला असता तर माझी परीक्षा हुकली असती. गणवेश घाण झाला असता, मार्क कमी मिळाले असते  शिवाय शिक्षक बोलले असते ते वेगळेच."
अजयचे बोलणे ऐकून जयंतरावांना वाईट वाटले. सत्य परिस्थिती जाणून न घेताच ते भीमाशंकरला बोलले. जयंतरावांना दवाखान्यात नेलं आहे, ही वार्ता कळताच  संपूर्ण गाव त्यांना पाहायला दवाखान्यात आला. भीमाशंकरही त्यात होता,पण पैशाची व्यवस्था न झाल्याने तो मागेच थांबला. जयंतरावांनी मात्र त्याला पाहिलं आणि आवाज दिला.
भीमाशंकर गपगुमान हात जोडून समोर येऊन उभा राहिला. तो काही सांगणार तोच जयंतराव म्हणाले," भीमाशंकर, अजय तर खूप समजूतदार आहे. याला खूप शिकव. तुला जे पैसे दिले होते,त्याची काळजी करू नकोस. जर आणखी पैशांची गरज पडली तर मला बिनधास्त सांग. तुला जमेल तेव्हा पैसे परत कर."
भीमाशंकरच्या डोळ्यांत अश्रू थरारले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 
(ही कथा दैनिक सकाळच्या दि.3 ऑगस्ट2019 च्या बालमित्र पुरवणीत प्रसिध्द झाली आहे.)

No comments:

Post a Comment