Tuesday, August 27, 2019

(बालकथा) दुसरा स्वर्ग


एक होते आत्रेय ऋषी. अत्यंत ज्ञानी आणि तपस्वी. त्यांचा आश्रम गौतमी नदीजवळच्या वनात होता. तिथे ते आपल्या पत्नीसोबत राहत होते. वनात आणखीही काही ऋषी आश्रम करून राहत होते.
एकदा आत्रेय ऋषींनी सर्वांसोबत मिळून यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञाची पूर्ण तयारी झाली. गौतमी नदीच्या उत्तर काठावर यज्ञाला सुरुवात झाली. कित्येक दिवस तिथे मंत्रोच्चार गुंजत राहिले.
यज्ञ पूर्ण झाला. सर्व ऋषीगण आपापल्या तपोवनात निघून गेले. पण अजूनही आत्रेय ऋषींचे मन संतुष्ट पावले नव्हते. ते पुन्हा यज्ञ करण्याच्या तयारीला लागले. यज्ञ यावेळेला फारच दिवस चालला. ऋषी तन, मन साधना करत राहिले. 
शेवटी एक दिवस यज्ञ पूर्ण झाला. तेव्हा एक आकाशवाणी झाली,' देवता तुमच्या साधनेवर प्रसन्न झाले आहेत. आपल्याला आठ प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. आता आपण तुमच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ -येऊ शकता.'
आत्रेय संतुष्ट होऊन आपल्या आश्रमात परतले. त्यांना त्यांच्या साधनेचे फळ मिळाले होते. 

एके दिवशी आत्रेय यांनी विचार केला,'स्वर्गाचे नाव खूप ऐकून आहे,चला पाहून तर येऊ.'
त्यांनी मनोमन स्वर्ग यात्रेचा संकल्प केला. तेवढ्यात त्यांना जाणवू लागले की, ते हवेत उडत आहेत. उंचच्या उंच पहाड पार करून  ते आणखी वर जात आहेत. शेवटी ते अमरावतीत पोहचले.
स्वर्गातला थाटमाट पाहून ऋषी चकित झाले. जितके ऐकले होते,त्याहून अधिक सुंदर होता स्वर्ग! ऋषी आत्रेय फिरत फिरत इंद्रसभेत पोहचले. इंद्र सिंहासनावर विराजमान होते. ऋषींनी सर्वच देव देवतांना तिथे पाहिले. अप्सरा नृत्य करण्यात दंग होत्या. इंद्राने ऋषींना पाहिले,तसे सिंहासनावरून उठून   स्वागत केले.  अप्सरांनी त्यांचे चरण धुतले. सेवा केली. स्वर्गात काही दिवस घालवल्यानंतर आत्रेय ऋषी पृथ्वीवर परतले.
पृथ्वीवर आता त्यांना फार अळणी  वाटू लागले. तपस्येला बसले तरी त्यांना स्वर्गातील दृश्येच आठवू लागली. विचार करू लागले,' कुठे स्वर्गातील सौंदर्य आणि कुठे पृथ्वीवरचे नीरस जीवन.'
त्यादिवशी ऋषींनी नीटसे भोजनही केले नाही. पत्नीने विचारले,पण त्यांनी तो विषय टाळला.
त्यानंतर आत्रेय ऋषी अनेकदा स्वर्गलोक गेले.पण गेल्यावर आठ-दहा दिवस राहूनच परतायचे. त्यामुळे पृथ्वीवर त्यांच्या पत्नी काळजीत असायच्या. एक दोन वेळा ऋषी पाताळलोकही गेले. स्वर्गातून पळून दैत्य दानव तिथेच राहत होते. 
एके दिवशी ऋषी स्वर्गातून आल्यावर फार उदास दिसत होते. पत्नीने भोजन वाढले,तर त्यांनी पान बाजूला सारले. पत्नी आता गप्प बसली नाही. तिने ऋषींना विचारलेच,"तुमच्या या चिंतेचे कारण काय आहे सांगा."
आत्रेय ऋषींचे मन आता जड झालं होतं. ते म्हणाले," मी स्वर्गाचा आनंद उपभोगला आहे. आता मला पृथ्वीवरचे जीवन नीरस वाटू लागले आहे. आता आपल्याला एक तर स्वर्गात जाऊन राहावे लागेल किंवा स्वर्ग पृथ्वीवर  आणावा लागेल."
ऋषींना काय म्हणायचं आहे,हे त्यांच्या पत्नीला कळलेच नाही. काही विचार केल्यावर आत्रेय ऋषी म्हणाले,"मी निश्चय केला आहे. आपल्याला स्वर्गात जाऊन राहणे अशक्य आहे,पण पृथ्वीवर स्वर्गाची निर्मिती करणार."
यानंतर आत्रेय ऋषींनी विश्वकर्मास आवाहन केले. काही वेळाने विश्वकर्मा तिथे प्रकट झाले. ऋषी म्हणाले,"आपण देवतांचे शिल्पकार आहात. आपण इंद्रनगरी बनवली आहे. माझ्या आश्रमाजवळ एक स्वर्ग बनवून द्या. त्यात सर्वकाही असावे,जे देवलोक मध्ये आहे. तसे म्हटले तर हा 'दुसरा स्वर्ग' म्हणूनच ओळखला जावा. कशाचीच कमतरता नसावी."
विश्वकर्मा आश्चर्याने ऋषींकडे पाहात राहिला. मग म्हणाला," मुनींवर, हे तुम्ही काय बोलत आहात? स्वर्ग केवळ एकच आहे. आणि तो तिथेच राहील. पृथ्वीवर कसा येईल? तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तरीही तुम्ही त्याचा का अट्टाहास धरता आहात? तुमच्यासाठी हवं तर इथे मायानगरी वसवतो. आकाश ठेंगणे वाटेल, असे इथे मोठमोठे महाल उभे करतो."
विश्वकर्माच्या गोष्टी आत्रेय ऋषींना आवडल्या नाहीत. ते नाराज झाले. ऋषी पुढे म्हणाले,"माझ्या तपश्चर्येची ताकद तुला माहीत नाही. म्हणून तू मला असली शिकवण देत आहेस. मी मनात आणले तर तुला इथेच भस्म करून टाकू शकतो. बाकी काही सांगू नको,इथे फक्त दुसरा स्वर्गलोक उभारला गेला पाहिजे. त्याशिवाय तुला स्वर्गलोक जाऊ देणार नाही. " असे बोलून ऋषी आपल्या झोपडीत निघून गेले.
विश्वकर्मा पुढे काहीच बोलला नाही. तो दुसऱ्या स्वर्गलोकच्या निर्माणाला लागला. जे काही स्वर्गात होते, ते सर्वकाही तिथे बनवले. हिरे जडजवाहीरने बनलेला दरबार, सोन्याचा पर्वत, सुंदर नंदनवन,कल्पवृक्ष, सर्वकाही त्याने या दुसऱ्या स्वर्गलोकात बनवले.
विश्वकर्मा निघून गेला. आत्रेय ऋषींनी इंद्रासारखे वज्र्य धारण केले.सभेत जाऊन सिंहासनावर बसले. अप्सरा नृत्य करू लागल्या.अगदी तसेच दृश्य होते,जसे स्वर्गलोकी  पाहिले होते. आत्रेयांना फार आनंद झाला. अशाप्रकारे मस्तीत, आनंदात दिवस जात होते.आत्रेय यांचे सर्व नियम भंग पावले. त्यांनी तपस्या करायची सोडून दिली.
एके दिवशी पातळातून काही दैत्य पृथ्वीवर आले.त्यांनी पृथ्वीवर नवा स्वर्गलोक पाहिला.  ते घाबरून पुन्हा पाताळात आले. तिथल्या लोकांना त्यांनी पृथ्वीवरील स्वर्गलोकाविषयी सांगितले. त्यावर चर्चा सुरू झाली. काही म्हणाले,'स्वर्गलोक पृथ्वीवर येण्याने मोठ्या संकटाची चाहूल आहे. याचा अर्थ इंद्र आपल्या पाताळावर आक्रमण करणार. देवता आपल्याला इथेही सुखाने राहू देणार नाहीत. आता आपल्या गप्प बसून चालणार नाही. देव लोक आपल्यावर आक्रमण करण्याअगोदर आपणच त्यांच्यावर आक्रमण करू.'
अचानक दैत्यांनी आत्रेय ऋषींच्या स्वर्गाला वेढा दिला. यावेळी आत्रेय दरबारात अप्सरांचे नृत्य पाहण्यात दंग होते. त्यांनी दानवांचा आरडाओरडा ऐकला. ते स्वतःला सावरण्यापूर्वीच दगड-धोंड्यांचा वर्षाव सुरू झाला. ते घाबरले.
दैत्य ओरडत होते,"ए इंद्र, बाहेर ये. आज तू जिवंत राहणार नाहीस. तुला तुझ्या मृत्युनेच पृथ्वीवर ओढून आणले आहे."
ऋषींनी विचार केला,'आपल्या तपश्चर्येच्या जोरावर या दैत्य दानवांना नष्ट करून टाकू. ' त्यांनी जल हातात घेतले आणि मंत्र पुटपुटायला सुरुवात केली.पण काहीच घडले नाही. त्यांच्या तपाचा प्रभाव कधीचा समाप्त झाला होता.
या कालावधीत दैत्यांचे सैन्य स्वर्गलोकीत घुसले.  आत्रेय भीतीने थरथरू लागले.ते ओरडले," मी इंद्र नाही. हा नकली देवलोक आहे."
पण दैत्य कुठे  मानायला तयार होते. ते म्हणाले,"आम्ही तुला चांगल्या प्रकारे ओळखतो. तू आम्हाला धोका देण्यासाठी खोटे बोलतो आहेस. पण आता तू मरणाला तयार हो."
आत्रेय ऋषींना कळेना काय करावं? ते शपथ घेऊन सांगू लागले की, "तो मी नव्हेच. "
शेवटी दैत्यांना त्यांच्यावर विश्वास वाटू लागला. दैत्य सेनापती म्हणाला," जर तू म्हणतोस ते बरोबर असेल तर तू हे नकली स्वर्गलोक तात्काळ येथून हटव. आम्ही थोड्या वेळाने पुन्हा येऊ. जर पुन्हा आहे असे दिसले तर आम्ही तुला ठार मारू."
आत्रेय ऋषींनी विश्वकर्माचा धावा केला. तो हसत हसतच प्रकट झाला. आत्रेय म्हणाले," दैत्य माझ्या मागे लागले आहेत. हे नकली देवलोक तात्काळ नष्ट करून टाक. माझी झोपडी आणि तपोवन पुन्हा दिसू दे."
काही क्षणातच तिथून नकली स्वर्गलोक गायब झाले. आता तिथे आत्रेय ऋषींची झोपडी आणि तपोवन दिसू लागले. दुरून पाहणाऱ्या दैत्यांनी हा चमत्कार पाहिला. ते परत निघून गेले.
आत्रेय ऋषी मान खाली घालून उभे राहिले. त्यांची पत्नी म्हणाली," आता स्वतःला सावरा. जे काही झालं,ते विसरून जा. पुन्हा एकदा आपले तपस्वी जीवन सुरू करा."
आत्रेय ऋषी पुन्हा आपल्या कठीण तपश्चर्येला लागले. खूप वर्षांच्या तपश्चर्येनंतर देव पुन्हा प्रसन्न झाले. 'आकाशवाणी झाली,'आत्रेय वर माग.'
जुन्या गोष्टींची आठवण झाल्यावर ऋषींची मान शरमेने खाली झुकली. त्यांना स्वतः चीच लाज वाटत होती. तेवढ्यात आकाशवाणी झाली,"ऋषींवर, जे झाले ते झाले. आता इथून पुढे हे ठिकाण  आत्रेय तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाईल. इथे येणारे पुण्य मिळवतील."
पण ऋषींनी ती आकाशवाणी  ऐकलीच नाही,ते पुन्हा आपल्या साधनेत लीन झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
7038121012

No comments:

Post a Comment