Friday, August 16, 2019

सोशल मिडिया आणि आम्ही


सोशल मीडियाने माणसाच्या विचार करण्याच्या कृतीला ब्रेक लावला आहे. एकादी घटना घडली,कुणी काही वक्तव्य केलं की, प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागतो. आणि या प्रतिक्रियांना आपल्या सभ्य संस्कृतीचा कसलाच आधार राहिलेला नाही. सोशल मिडीयाला फिल्टर लावणं अशक्य झाल्याने चोहीकडे असभ्य संस्कृतीच माजली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे 'बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.' हा सुविचार शाळेच्या फलकावरच राहिला आहे. फेसबुक,व्हॉट्स अप,ट्विटर यांच्यासह अनेक सोशल माध्यमं लोकांना खुणावत आहेत. क्रिया-प्रतिक्रिया पटकन होता असल्याने सगळं काही क्षणात घडून जातं. समज-गैरसमज होऊन जातात. पण यातल्या प्रतिक्रिया या तत्कालीन असतात. भडकावू असतात. त्यामुळे वातावरण मात्र विनाकारण गढूळ होतं. कारण त्या व्यक्त करताना विचारांना थारा दिलेला नसतो.

गेल्या पंधरवड्यात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांसह 16 जिल्ह्यांना महापुराने त्रासून सोडलं. जवळपास सहा हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झालं. सुमारे शंभर लोकांचा बळी गेला. हजारो जनावरे वाहून गेले. अनेकांची घरे पाण्यात गेली. काहींची कुटुंबं उदवस्त झाली. काहींचे उद्योग-व्यवसाय मातीमोल झाले. या नैराश्यातून काहींनी नंतर आत्महत्याही केल्या. मात्र माणुसकी जिवंत असल्याने या पूरग्रस्तांना तात्काळ चोहोबाजूंनी मदत सुरू झाली. अनेकांनी अन्नछत्र सुरू केले. काहींनी निवारा दिला. काहींनी अंथरूण- पांघरूण दिले. काहींनी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा बंदोबस्त केला. काहींनी पाकीटबंद पाकिटे वाटली.  ज्या भागता सातत्याने दुष्काळ आहे,त्या भागातल्या लोकांनीही आपल्याला जमेल तशी मदत केली. काहींनी पूर ओसरल्यावर पूरग्रस्त भागात जाऊन साफसफाई केली. आता हा पूरग्रस्त भाग पूर्वपदावर येत आहे. ही चांगली गोष्ट आहे.
पण अशा दुर्दैवी घटनेतही आपल्याला आपल्या माणुसकीच्या विपरीतही पाहायला मिळालं. महापुराने बेघर झालेल्या, त्रासलेल्या लोकांच्या घरावर डल्ला मारून काही लोकांनी 'मड्यावरचे लोणी खाण्याचा ' निदर्यी प्रकार केला. काही लोकांनी पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आलेल्या वस्तू, साहित्यांवर डल्ला मारण्याचा प्रकार केला. त्यामुळे शेवटी जिल्हाधिकारी लोकांना जी काही मदत आहे,ती शासकीय कार्यालयात जमा करावी, असे आदेश काढावे लागले. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली,पण त्याची विल्हेवाट मात्र व्यवस्थित लावली गेली नाही. पोलीस,लष्करी दल, शासकीय अधिकारी कर्मचारी अहोरात्र मदतीला लागले. सामाजिक संस्था धावून आल्या. त्यामुळे नुकसान आटोक्यात आले.
आपल्या हाताची पाची बोटे सारखी नाहीत, त्याप्रमाणे समाजात विविध स्वभावाची, प्रकृतीची माणसे आहेत. काहींना प्रत्येक गोष्टीत खोट दिसते,प्रत्येक गोष्टीत चूक दिसते. अशीच माणसे अधिक प्रमाणात या माध्यमांवर सक्रिय असतात. कारण त्यांना वातावरण गढूळ करण्यातच अधिक आनंद मिळत असतो. अशा लोकांच्या संपर्कात आलेली माणसेही मग त्यांच्यासारखा विचार करायला लागतात.  साधी गोष्ट आहे, चांगल्या कामाचा फार गाजावाजा होत नाही. मात्र वाईट कामाचा लगेच प्रसार होतो. यात चांगल्या माणसाचीही नाचक्की होते. त्याला थेट रावणाच्या पंगतीला नेऊन बसवले जाते. सभ्य माणसाच्या विरोधात एकादी बातमी आली असली तरी त्या बातमीमागे अनेक गोष्टी असतात. गैरसमजातूनही असा प्रकार घडलेला असतो,पण सोशल मिडियावर लगेच अशा माणसाला फ़ैलावर घेतले जाते. त्याच्या सगळ्या गोष्टींचा उद्धार केला जातो. माणसे दम धरायलाच तयार नाहीत, विचार करायचंच सोडून दिले आहेत. यातून समाज आणखीही आणखी गढूळ व्हायला लागला आहे. माथेफिरू बनू लागला आहे. एकीकडे माणुसकीचे दर्शन दिसत असले तरी दुसरीकडे माणुसकीचा ऱ्हास होतानाही दिसत आहे. माणसे कामाच्या व्यापात गढून गेले असल्याने माणुसकी म्हणून उभे राहत असले तरी त्यांना प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहचणे अशक्य झाले आहे. त्यामुळे मधल्या मधे गाळा मारण्याचा प्रकार वाढला आहे. असा गाळा मारण्याचा प्रकार सर्वच क्षेत्रात शिरला असला तरी त्यालाही काही धरबंद असायला हवा.
सोशल मीडियामुळे जसे गल्लीत दादा,अण्णा, भाऊ, साहेब जन्माला आहेत,तसे 'मदत करायची टीचभर आणि गाजावाजा करायचा पसाभर' असा प्रकारही वाढला आहे. त्यामुळे सेल्फी काढल्याने जसा आनंद होतो, तसा आनंद बारीकसारीक मदत करून काही लोक आपले फोटो मीडियावर टाकत आहेत. असं म्हणतात की, एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळली नाही पाहिजे,पण आज अशा मदतीचा गाजावाजा कशासाठी? महापुराच्या निमित्ताने हा विषयही चर्चेत आलाच. मदतीच्या पाकिटावर मुख्यमंत्रयांची छबी दिसावी,म्हणून छपाईत वेळ घालवला आणि मदत उशिराने पूरग्रस्तानपर्यंत पोहचली. राजकीय विरोधकांनीही असाच प्रकार केल्याने त्यांनाही याच टीकेला सामोरे जावे लागले. यात आणखी एक असाच इर्षेचा प्रकार पाहायला मिळाला. राज्यात सोळा जिल्ह्यात पुराची परिस्थिती उद्भवली तर अनेक जिल्ह्यात अजूनही दुष्काळी परिस्थिती आहे. या पूरग्रस्त क्षेत्रातल्या लोकांना दुष्काळी भागातल्या लोकांनीही मदत केली. पण त्याचा संदेशही वाईट गेला. अनेक दुष्काळी भागातल्या महाभागांनी आम्ही आर्थिक संकटात असूनही मदत केली. पण याच सधन भागातल्या लोकांनी आम्ही दुष्काळात होरपळत असताना का मदत केली नाही, असा सवाल करत आम्हीच माणुसकीचे पाईक अशा पोष्ट टाकल्या. त्यामुळे त्यांनी केलेली मदत चांगल्या भावनेने केली होती का, असा सवाल उपस्थित होतो.  अशा आपलीच इज्जत घालवणाऱ्या पोस्ट टाळायला हव्यात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment