Tuesday, August 27, 2019

(बालकथा) फेकू उंट


एक उंट होता. पण तो मोठा फेकू होता. मोठं मोठं फेकायचा, मोठ्या मोठ्या बाता मारायचा. एक दिवस तो असाच फिरायला निघाला. नदीच्या काठाला उंदीर, खारुताई, माकड आणि ससा गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या आणि ते मोठमोठ्याने हसत होते. तिथे उंट गेला आणि तोही मोठमोठ्याने हसू लागला. सशाने विचारलं,"उंटदादा, तू का हसतो आहेस?"
उंट म्हणाला,"तुला पाहून हसतोय. माझ्या समोर तुम्ही काहीच नाही आहात. अगदी चिल्लर आहात."
"उंदराने विचारले,"म्हणजे? तुला म्हणायचं काय आहे?"
उंट आपली मान झटकून म्हणाला," याचा अर्थ असा की, माझं एक दिवसाचं राशन-पाणी तुमच्या सर्वांसाठी महिनाभर चालतं. जिथंपर्यंत तुमची नजर जाते,तिथं पर्यंत तर माझी मान जाते. मी वाळवंटातला जहाज आहे. मी तिथे अगदी सहजरित्या न थांबता, न थकता धावू शकतो. तुम्ही तिथे चार पावलं टाकली तरी दमून जाल. कळलं?"

हे ऐकून खारुताई हसायला लागली. उंदीर, ससा आणि माकडदेखील हसू लागले. उंटाने पाय आपटत विचारलं,"तुम्ही का हसता?"
खारुताई हसतच पुढे म्हणाली,"उंटदादा,मानलं की, तू खूप मोठा आहेस.पण प्रत्येक मोठ्यानं हरप्रकारची छोटी कामं करावी, असं काही नसतं."
उंट म्हणाला,"मी लहानांच्या तोंडाला लागत नाही. मला ते योग्य वाटत नाही. माकडदेखील हसत म्हणाले,"उंटदादा, नाराज का होतोस?"
उंट माकडाला म्हणाले,"अरे, ही तर इवलीशीच आहेत. यांच्याशी मी काय बोलणार? तू समोर ये. तूच सांग आता की, असं कोणतं काम आहे जे तू करू शकतोस आणि मी नाही? हां,पण झाडावर चढायला सांगू नको म्हणजे झालं." खारुताई पटकन उडी मारून माकडाच्या कानाजवळ गेली. दुसऱ्याच क्षणी माकड पळतच कुठं तरी निघून गेलं. थोड्या वेळाने ते एक कलिंगड  आपल्या पाठीवर घेऊन आलं. ते त्याने उंटासमोर ठेवलं. 
माकड उंटाला म्हणाले,"हे घे, तुला माझ्या सारखं हे कलिंगड तुझ्या पाठकुळीवर  ठेवून चालून दाखवायचं. उचल याला आणि वीस पावलं का होईना पण चालून दाखव. पण लक्षात ठेवायचं, कलिंगड खाली पडता कामा नये."
बिचाऱ्या उंटाची बोलतीच बंद झाली. डोंगरासारख्या ओबडधोबड पाठीवर  कलिंगड कसा ठेवणार? आणि गोल आकाराचे कलिंगड पाठीवर ठेवून चालणार कसामोठं कठीण काम होतं. उंट तोंड पाडून तिथून गपगुमान निघून गेला.
तेव्हापासून उंट मोठ्या मोठ्या बाता फेकायचा बंद झाला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


No comments:

Post a Comment