संजू वर्गात याच वर्षी आला होता. त्याच्या येण्याने
विराट, अनय आणि चित्रांश यांची अडचण झाली होती, कारण हे तिघेही वर्गातले टॉपर्स होते आणि पहिल्याच टेस्टमध्ये संजूने थर्ड
रँक मिळवले होते. त्या दिवसापासूनच या तिघांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली
होती. कधी त्याच्या दप्तरावरून तर कधी त्याने डोक्याला लावलेल्या तेलावरून त्याची
थट्टा चालवली जात होती. संजूला आपण एकटे पडल्याची जाणीव होत होती. तो एका कोपऱ्यात
बसून एकटाच डबा खायचा. एके दिवशी संजू एकटाच बसून लंच
बॉक्स उघडून जेवण खाणार इतक्यात चित्रांशने त्याची शिळी भाकरी उचलली आणि सगळ्यांना
दाखवू लागला. सगळी मुले त्याची टर उडवू लागले. त्याची मस्करी करू लागले. संजूच्या
डोळ्यांतून आसवे टपकू लागली.
वास्तविक संजूचे वडील एक ऑटो रिक्षा चालवत होते.
त्याला चांगल्या शाळेत शिकवावे,इतकी त्याच्या आई - वडिलांची ऐपत
नव्हती. पण 'राईट टू एज्युकेशन' या
शासनाच्या योजनेतून त्याला शहरातल्या नामांकित शाळेत प्रवेश मिळाला होता. या शाळेत
सगळी मुलं धनाढ्य बापांची होती. त्यांना पाहून संजूला आपण गरीब असल्याची लाज वाटू
लागली होती. त्या दिवशी संजू घरी गेल्यावर खूप रडला. त्याच्या वडिलांनी त्याला
समजावून सांगितले,'थोडे दिवस जाऊ दे, सर्वकाही
ठीक होईल. तू फक्त मन लावून अभ्यास कर. चांगल्या संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत
नाहीत. तू चांगल्या शाळेत शिकलास ना तर तुला तुझे भविष्य सावरता येईल आणि आमचेही!'
संजू दुसऱ्या दिवशी शाळेत पोहचल्यावर गपचिप आपल्या
जागेवर जाऊन बसला. विराट, अनय आणि चित्रांश अभ्यासाकडे लक्ष देण्याऐवजी संजूचा अपमान
करण्याची अधिकाधिक संधी शोधत राहिले.
इकडे संजूने अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात
केली. परिणाम असा झाला की, पहिल्या टर्ममध्ये तो सेकंड रँकमध्ये पोहचला. एके दिवशी
तिघांनी संजूला एकाकी गाठले आणि त्याला धमकी देऊ लागले,तेवढ्यात समोरून क्लास टीचर आले. त्यांनी तिघांनाही चांगलेच फ़ैलावर घेतले आणि वर उद्या
प्रिन्सिपलकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले. तिघे चांगलेच नरमले.
प्रिन्सिपल सरांनी ही गोष्ट आपल्या घरापर्यंत पोहचवली तर आपल्याला
आणखी वेगळीच शिक्षा मिळेल,या भीतीने तिघेही घाबरून गेले.
तिघेही संजूचे घर शोधत त्याच्याजवळ पोहचले. तो एका
छोट्याशा झोपडपट्टीत राहत होता. संजू तेव्हा त्याचा युनिफॉर्म धूत होता. त्यांना
पाहून तो घाबरला. विराट त्यांच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला," ये मित्रा, हे घे 500 रुपये,पण लक्षात ठेव. हा मॅटर कसल्याही परिस्थितीत प्रिन्सिपल सरांपर्यंत पोहचला
नाही पाहिजे , अशा पद्धतीने क्लास टिचरांना मॅनेज करायचं.
फक्त तू एवढंच सांभाळायचं. बाकी आम्ही बघून घेऊ." संजूने पैसे घेऊन पुन्हा
विराटच्या खिशात कोंबले. आणि गपचिप उभा राहिला. त्यांनी त्याला दोन हजार रुपये
दिले,तेही त्याने परत केले.
तिघे पुन्हा घाबरले. तेव्हा संजू म्हणाला,"तुम्ही मला मित्र मानलं आहे आणि एका मित्राचे कर्तव्य आहे की आपल्या
अडचणीत असलेल्या मित्रांना मदत करणे.तुम्ही निंश्चित राहा."
तिघांनीही आज आपण त्याच्या पुढे किती छोटे आहोत आहोत,याची
भावना झाली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment