Tuesday, August 27, 2019

(बालकथा) मंटू आणि बबलू अडकले


लहानग्या मंटू माकड आणि बबलू अस्वलामध्ये दाट मैत्री होती. मंगल वनात ते एकाच कॉलनीत राहत होते. 
एक दिवस ते घराबाहेर खेळत होते. तिथे मदारी राजू कोल्हा आला. त्याने त्यांना केळे दाखवले,ते पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. ते उड्या मारतच त्याच्याजवळ पोहचले. दोघांनाही मदारीने एक एक केळ दिले.
"आणखी?" बबलूने मदारीपुढे हात पसरला.
"आणखी हवेत तर, माझ्यासोबत चला.जवळच माझी केळीची बाग आहे.तिथे हवी तेवढी केळी खा." मदारीने लालूच दाखवले.
मंटू आणि बबलूचे नशीबच खोटे होते. ते घरात काही न सांगता मदारीसोबत निघाले. पुढे आणखी एक कोल्हा होता. राजुने त्याला मदतीला बोलावले होते. दोघांनी मिळून मंटू आणि बबलूचे हात बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला. फक्त एवढेच करून थांबले नाहीत तर ,त्यांच्या डोळ्यांवर पट्टीही बांधली. 

दोघा कोल्ह्यांनी मुलांना घेऊन कंटक वन गाठले. तिथे गेल्यावर  मंटू आणि बबलूच्या तोंडातला बोळा काढला. हात खोलले आणि डोळ्यांवरची पट्टी काढली.
"कान देऊन ऐका, आता तुम्हाला इथेच राहावे लागेल. आता रडायचं बंद करा. आणि पळून जाण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका, नाहीतर हात पाय तोडले जातील. "राजू कोल्ह्याने मुलांना धमकावले.
मुले काहीच बोलले नाहीत. ती खूप घाबरली होती. हे पाहून राजुची बायको चिंगीने त्यांच्यासाठी किचनमधून खायला आणले आणि म्हणाली,"घ्या बाळांनो, खाऊन घ्या.तुम्हाला भूक लागली असेल."
"नाही काकू, आम्हाला काहीच खायचं नाही. आम्हाला आमच्या घरी जायचं आहे.आमचे आईवडील काळजीत असतील.काकांनी आम्हाला केळ्याचे आमिष दाखवून इथे आणले आहे. " मुले रडत रडत सांगू लागली.
तेवढ्यात राजू कोल्ह्याची मुलगी राणी तिथे आली. मंटू आणि बबलूला पाहून तिला खूप आनंद झाला. कारण तिच्यासोबत खेळायला कोणीच नव्हते . आता तिला दोन मित्र मिळाले होते.
"तुम्ही रडता का आहात? जेवा. मग आपण खेळायला जाऊ." राणी म्हणाली.राणीला पाहिल्यावर मुलांमध्ये जीवात जीव आला. त्यांनी मग खूप फळं खाल्ली.
मदारी राजू आता  मंटू आणि बबलूला डान्सचे ट्रेनिंग देऊ लागला. तो म्हणाला,"तुम्ही दोघांनी लवकरात लवकर डान्स आणि खेळ करायला शिकायचं. यानंतर आपण शेजारच्या गावात जायचे आणि तिथे तुम्ही डान्स आणि खेळ करायचा. लोक पैसे देतील, मग मस्त चैनी करा."
मुलांचा नाईलाज होता. डान्स,विविध प्रकारचे मनोरंजक खेळ शिकू लागले. काही दिवसानंतर राजू मदारी  त्यांना गावोगावी घेऊन खेळ करू लागला. त्याची चांगली कमाई होऊ लागली. पण तो मुलांच्या खण्यापिण्याकडे लक्ष देत नव्हता. त्यांना शिळेपाके अन्न दिले जायचे. शिवाय शिव्या- मारहाण सहन करावे लागायचे.
कधी कधी कोल्ह्याची मुलगी राणी त्यांना चांगलं चुंगल खायला आणून द्यायची. त्यांच्यासाठी आपल्या वडिलांसोबत भांडायची.
"चिंगी,राणीला या दोघांपासून लांब ठेवत जा. तिच्या मदतीने ते पळून जातील. मग आपल्याला भीक मागावी लागेल. "एके दिवशी राजू आपल्या बायकोला म्हणाला. चिंगीने लक्ष ठेवण्याचे वचन दिले.
आता मंटू आणि बबलूची तब्येत खालावत चालली. ते खूप रडायचे. त्यांना आईवडिलांची खूप आठवण यायची. त्यांना रडताना राणीने कित्येकदा पाहिले होते.
"बाबा,तुम्ही दुसरे काही तरी काम करू शकता. या बिचाऱ्या मुलांना का त्रास देता. यांना जाऊ द्या,त्यांच्या आईबाबांकडे." राणी असे कित्येकदा म्हणाली होती. त्याचे बाबा तिलाच रागवायचे. त्यामुळे आता तिने आपल्या या दोस्तांसाठी काही तरी करायचे, असा निश्चय केला. आता ती फक्त योग्य त्या संधीची वाट पाहत होती.
कंटक वनात वनदेवीच्या मंदिर परिसरात यात्रा भरली होती. यात्रेत राजू मदारी मंटू आणि बबलूला घेऊन आला. सोबत मुलगी राणी आणि त्याची बायको चिंगीसुद्धा होती.जागा शोधून त्याने मंटू आणि बबलूचा खेळ करायला सुरुवात केली. प्रेक्षकांना त्यांचा खेळ फार आवडला. लोकांनी खूप टाळ्या वाजल्या आणि पैसेही भरपूर दिले.
राजू मदारीला फार आनंद झाला. राजू बायकोला म्हणाला,"यात्रेतून राशन-तेल आणतो. तोपर्यंत या मुलांची काळजी घे."
"ठीक आहे,जाऊन या. यांची काळजी घेईन." चिंगी म्हणाली. राजू कोल्हा निघून गेला.
"ही संधी योग्य आहे, मंटू आणि बबलूला पळून जाण्यासाठी."  राणीने विचार केला. ती आईला म्हणाली,"तूही फिरून ये जा यात्रेतून. मी लक्ष ठेवीन यांच्यावर!"
चिंगीला काही दागिने घ्यायचे होते. "ठीक आहे,पण या दोघांवर पाळत ठेव.नाही तर तुझे बाबा तुला नि मला फाडून खातील."
"ठीक आहे आई, तू काही काळजी करू नको. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन." राणी भरवसा देत म्हणाली.
राजू कोल्ह्याची बायको दागिने खरेदी करायला निघून गेली.
"मित्रांनो, संधी चागली आहे. जा तुम्ही." राणी म्हणाली.
"अगं, पण तू! तुझे बाबा..." बबलू म्हणाला.
"माझी काही काळजी करू नका.मी काय करायचं ते ठरवलं आहे. तुम्ही आता लगेच पळा. नाही तर पुन्हा अशी संधी मिळणार नाही." राणी म्हणाली.
"तुझे खूप उपकार झाले.तुला आम्ही कधीच विसरणार नाही." मंटू म्हणाला. दोघांनी राणीला प्रेमाने आलिंगन दिले आणि जंगलात पसार झाले.
राजू परत आला तेव्हा त्याला मंटू आणि बबलू दिसले नाहीत.त्याने राणीला आणि बायकोला विचारले.
"बाबा,तुम्ही गेला लगेच पोलीस आले. ते त्यांच्या सोबत मंटू आणि बबलूला घेऊन गेले. ते तुम्हाला शोधत आहेत. आपण जेवढ्या लवकर येथून सटकू, तेवढे बरे होईल. नाही तर तुम्हाला पोलीस पकडतील. माकड आणि अस्वलाला पकडून ठेवल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होईल."राणी काहीशी घाबरत म्हणाली.
हे ऐकून राजू मदारी घाबरला. तेवढ्यात त्याला समोरून चित्ता शिपाई येताना दिसला.त्याची पाचावर धारण बसली. तो दुसऱ्या मार्गाने आपल्या कुटुंबासह पळून गेला. इकडे मंटू आणि बबलू सुखरूप घरी आलेले पाहून त्यांच्या आईवडिलांना फार आनंद झाला.  पुन्हा कधीच कुणाच्या आमिषाला बळी न पडण्याचे त्यांनी आपल्या आईवडिलांना आश्वासन दिले.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012


No comments:

Post a Comment