Saturday, August 24, 2019

(बालकथा) डाव उलटला


गोष्ट जुनीच आहे. एक राज्य होतं सुंदरनगर. या राज्यावर प्रामाणिक आणि दयाळू राजा सज्जनसिंह राज्य करीत होता. जनता राजावर खूप खुश होती. महामंत्री प्रियबदावर त्याचा खूप विश्वास होता. 
एक दिवस शेजारील दुष्टपूर राज्याचा बदनाम सिंह नावाचा एक व्यक्ती शरणार्थी म्हणून सुंदरपूर राज्यात दाखल झाला.  त्याने सुंदरपूर राज्यात राहण्याची परवानगी मागितली. राजा प्रामाणिक, स्वच्छ मनाचा होता,त्याने त्याला परवानगी दिली. मात्र महामंत्री प्रियबदा यांना ही गोष्ट खटकली. परंतु, राजाचा निर्णय बदलू शकले नाहीत.

हळूहळू बदनामसिंह राजाचा प्रिय दरबारी बनला. राजाला काही अडचण आल्यास तो थेट बदनामसिंह याच्याशी सल्लामसलत करीत असे. आता तर बदनामसिंह राजा सज्जन सिंहाचा प्रामाणिक सल्लागार बनला. राजा डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवायचा.
प्रियबदा यांना काही तरी काळंबेर असल्याचा संशय आला. त्यांनी राजाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. "महाराज, मला माहित आहे की, आपण बदनाम सिंहावर खूप विश्वास टाकता. पण तो शत्रू देशाचा रहिवाशी आहे. आपण जरा सावधच असायला हवे."
"तो शत्रू देशाचा रहिवाशी आहे,पण  शत्रू नाही. मला काही समजत नाही असे समजू नका." राजा काहीसा क्रोधीत होऊन म्हणाला.
" महाराज,मी माहिती काढली आहे. तो इथे येण्यापूर्वी क्रूरसिंहचा विश्वासू माणूस होता." प्रियबदा आदराने पण सांभाळून बोलत होते.
"मी पाहतोय की, त्याच्या आगमनाने तुमच्यात  ईर्षा उत्पन्न झाली आहे. म्हणूनच तुम्ही असा विचार करता आहात. तुम्ही खूप बदलला आहात. मी तुम्हाला देशातून हाकलून देत आहे." राजा क्रोधाने म्हणाला.
प्रियबदा दुःखी मनाने काही संपत्ती आणि विश्वासपात्र नोकर घेऊन राज्याबाहेर पडले.
तिकडे बदनामसिंहने संजयसिंहला दुष्टपूरवर आक्रमण करण्यासाठी राजी केले. राजाला ही गोष्ट प्रजाहितदक्ष वाटली, म्हणून तोही तयार झाला. आक्रमण करण्यासाठी राजा सैन्यांसोबत राज्याच्या सीमेवर निघाला,तसे गुप्तचरांनी  मागून संदेश आणला की, क्रूरसिंहने राज्यावर कब्जा मिळवला आहे. बदनामसिंहने त्याच्यासाठी किल्ल्याची द्वारे खोलली होती.
राजाला आता कळून चुकले की, ते बदनामसिंहच्या विणलेल्या जाळ्यात पुरते अडकले आहेत. आपला जीव धोक्यात आहे,याची स्पष्ट जाणीव त्यांना झाली. त्यांनी काही विश्वासू सहकाऱयांना घेऊन जंगलाच्या दिशेने पळ काढला. धावत धावत जंगलात आले. तिथे त्यांना काही सैन्य युद्धाभ्यास करताना पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत प्रियबदा होते. राजाने प्रियबदा यांची क्षमा मागितली.
प्रियबदा म्हणाले," मला माहित होतं की सुंदरनगरची अशीच अवस्था होणार. याच संकटातून मला आपले राज्य वाचवायचे होते. "
ऐकून राजाचे डोळे पाणावले. त्याने विचारले,"आता आपण काय करायचं?"
"आज रात्रीच ,जेव्हा क्रूरसिंहचे सैन्य आनंदोत्सव साजरा करत असतील ,तेव्हा आपण गुप्त मार्गाने महालात प्रवेश करायचा . तिथे अगोदरच दासीच्या रुपात आपले महिला सैनिक विरोधकांच्या भोजनात झोपेचे औषध घाललेल्या असतील. राजा क्रूरसिंहच्या महालात प्रवेश करून त्याला ठार करू."
आणि झाले तसेच! मध्य रात्रीच्या वेळी सज्जनसिंह यांनी आपल्या सैन्यांसोबत हल्ला चढवला. घडामोडी अशा काही वेगाने घडल्या की, काही कालावधीतच  पुन्हा सज्जनसिंहने राज्यावर कब्जा मिळवला. यात क्रूरसिंह मारला गेला.
दुसऱ्या दिवशी लोकांनी पाहिले की, बदनामसिंहच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवून धिंड काढली जात आहे. नंतर त्याला शिक्षा म्हणून गाढवं राखायला ठेवण्यात आले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


No comments:

Post a Comment