Tuesday, August 27, 2019

(बालकथा) भूक लागल्यावर...!


"आई,मी जाते गं!" म्हणून आपले दप्तर पाठीला टाकत निकिता घरातून बाहेर पडली.
"नाष्टा केलीस का?" आईने आतून आवाज देत विचारलं,पण तिला काही परत आवाज आला नाही. रस्त्यावर धावत येत तिने स्कुल बसच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. खरं तर आज सकाळी उठायला उशीर झाल्यानं तिला आवराआवरी करायलाही उशीर झाला. या गडबडतीत ती  नाष्टासुद्धा  करू शकली नाही. त्यात सकाळपासून पावसाचंच वातावरण होतं. काळे ढग भरून आले होते. बसमध्ये बसल्यावर तिने दप्तरात डोकावून पाहिलं तर त्यात तिला लंच बॉक्सच दिसला नाही. "बरं झालं." ती मनातल्या मनात म्हणाली. तिला आनंद झाला. खरं तर तिला लंच बॉक्स आवडायचा नाही. आई जबरदस्तीने लंच बॉक्स दप्तरात ठेवते, असे तिला वाटायचं. तिला तिच्या शाळेच्या कँटीनमधले गरम गरम सामोसे,,वडापाव,भजी, पॅन्टीज असले पदार्थ खूप आवडायचे. ती आपला लंच बॉक्स इतर मैत्रिणींना द्यायची आणि कँटीनमधले पदार्थ खायची. तिचे बाबा तिला आईची नजर चुकवून वर खर्चाला पैसे द्यायचे.

बस शाळेत पोहचताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. कसे तरी पावसापासून स्वतः ला चुकवत बसमधील मुलं आपापल्या वर्गात शिरली. सर्वात पहिल्यांदा मराठीच्या शिक्षिका वर्गात आल्या. त्यांनी गृहपाठ तपासला. आणि अभ्यास सांगून वर्गाबाहेर निघून गेल्या. दुसरा तास इंग्रजीचा होता. या विषयाच्या सरांनी नवीन पाठ शिकवला आणि अभ्यास सांगून निघून गेले.आता मोठा पाऊस थांबला असला तरी सतत भुरभुर होतीच. आता निकिताला भूक लागली होती. आता तिचे तासाकडे लक्ष लागेना. कसा तरी तिसरा तास संपला. तिने घडाळ्यात पाहिले. अजून लंच ब्रेकला पाऊण तास होता.
चौथ्या तासाला कोणीच आले नाही. या रिकाम्या तासाला मुलं  सकाळी सांगितलेला गृहपाठ पूर्ण करण्यात गुंतली होती. काहीजण गप्पा मारत होते. निकिताने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. तिने घडाळ्यात पाहिलं. सुट्टीला अजून वीस मिनिटे बाकी होते. कँटीनमध्ये सामोसे बनत असतील. वीस मिनिटांनंतर ती आरामात सामोसे खायला जाऊ शकत होती. बाहेर मात्र सारखा पाऊस पडतच होता.कधी जोरदार तर कधी संततधार! थोड्या वेळाने लंच ब्रेकची बेल वाजली. निकीताने सुटकेचा श्वास सोडला,पण बाहेर पाऊस सुरूच होता. कँटीनमध्ये जायचं कसं?
काही मुलींनी सकाळी पावसाचे वातावरण बघून छत्र्या आणल्या होत्या. पण पूर्ण वर्गात दोनच छत्र्या होत्या. शेवटी ठरलं की दोघी दोघींनी छत्री घेऊन कँटीनमध्ये जायचं आणि येताना इतरांचेही पदार्थ आणायचे. पहिल्यांदा ज्या मुली जात होत्या,त्यांच्या हातात निकीताने पैसे ठेवले आणि दोन सामोसे आणायला सांगितले. कारण आता तिला कँटीनपर्यंत जायचे त्राणसुद्धा उरले नव्हते. मुली गेल्या पण थोड्या वेळाने रिकाम्या हाताने परत आल्या. त्यांनी सांगितलं की, पावसामुळे कँटीन बंद आहे. कँटीनवाल्या मावशी आल्या नव्हत्या. ऐकून निकिताच्या पायाखालची वाळूच सरकली. आता काय करायचं? काही वेळ ती कसं तरी मन मारून बसली. मुलींशी बोलत राहिली,पण तिचे कशातच लक्ष लागेना. आता तिला घरी गेल्यावरच खायला मिळणार होतं. आता तिला डबा विसरल्याचा पश्चाताप होऊ लागला.
थोड्या वेळाने एक शिपाई छत्री घेऊन तिच्या वर्गाकडे येताना दिसला. त्याने आत आल्यावर निकिताला आवाज दिला. तिच्या हातात लंच बॉक्स सोपवत आईने आणून दिल्याचं सांगितलं.तिला फार आनंद झाला. तिने गडबडीने डबा खोलला. आत चपाती आणि भरलेलं वांग होतं. तिला वांग आवडायचं नाही,पण मसाला आवडायचा. तिने नाराजीनेच मसाला आणि चपाती खायला सुरुवात केली. पण आज तिला नेहमीपेक्षा जेवण चवीला चांगलं लागत होतं. अशातच तिने वांगंही खाल्लं. तिला वांगं गोड लागलं. आज पहिल्यांदा तिने मनापासून संपूर्ण डबा संपवला. तिने आनंदाने ढेकर दिली. राहिलेल्या वेळेत तिने गृहपाठ पूर्ण केला.
घरी आल्यावर तिने आईला भरलेलं वांग छान होतं आणि मी वांगं देखील खाल्लं, असं सांगितलं. आई हसून म्हणाली." भरलेलं वांगं  तेच होतं, जे मी नेहमी बनवते. पण आज तुला भूक लागल्याने नेहमीपेक्षा चांगलं वाटलं असेल. नेहमी लक्षात ठेवायचं, भूक लागल्यावर कसलीही कुरकुर न करता जे समोर आहे, ते खावं. कारण भूक लागल्यावर सगळं चांगलंच लागतं. " तिला वाटलं, आई बोलते ते योग्य आहे. पण तरीही तिच्या मनात एक शंका होतीच.
निकीताने आईला विचारलं,"असल्या पावसात तू लंच बॉक्स का येऊन आलीस? तू असा का विचार केला नाहीस की, मी कँटीनमध्ये खाईन.?"
"तू काय काय खाशील, हे मला कसं माहीत? मला वाटलं,माझ्या मुलीने सकाळी नाष्टा केला नाही. लंच बॉक्ससुद्धा विसरून गेली. तू उपाशी असशील म्हणून लंच बॉक्स घेऊन आले."आईने सांगितले.
निकिताला आता पश्चाताप होऊ लागला. तिने विचार केला, आईला काय माहीत तिची मुलगी दुसऱ्याला लंच बॉक्स देऊन बाहेरचं खाते? तिने आईला काहीच सांगितलं नाही,पण मनोमन ठरवलं की,यापुढे आता आईच्या हातचा डबाचं खाणार!
आता ती आठवणीने लंच बॉक्स घेते आणि आता नेहमी तिची भरलेल्या वांग्याचं फरमाईश असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


No comments:

Post a Comment