Friday, August 9, 2019

गावात समृद्धी आणायची तर...

आपला देश समृद्ध व्हायचा असेल तर पहिल्यांदा आपली खेडी समृद्ध व्हायला हवीत. गावातच रोजगार आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तर कमी रोजगारीत  पोटापाण्यासाठी हाल अपेष्टा  सहन करत शहरात राहणारा माणूस सहज खेड्यात राहायला असता. पण आपल्या देशात फक्त शहरीकरणाकडेच अधिक लक्ष दिले जात असल्याने देशात ग्रामीण भागाचा विचारच केला जात नाही. त्यामुळे आज खेडी आणि शहरी भागाचा जो असमतोल वाढत चालला आहे, तो असाच वाढत जाणार आहे. आणि खेडी भकास होत जाणार आहे.

ग्रामीण भागात शेती आणि उद्योगधंद्यांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास आणि महत्त्वाचे दळणवळण व्यवस्था उपलब्ध झाल्यास खेड्यांच्या विकासाला आपोआप हातभार लागणार आहे. शेतीपूरक व्यवसाय,उद्योगधंदे शेताच्या बांधावरच उभे राहायला हवेत. त्यामुळे  कच्चा माल वाहतुकीचा प्रश्नही हलका होण्यास मदत होणार आहे. सरकारने ग्रामीण भागाचा विकास हा अजेंडा धरल्यास ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास मदत होणार असून देशाचे अनेक प्रश्नही आपोआप सुटतील.
आज फार विचित्र परिस्थिती आहे. खेड्यातील तरुणाला शहराकडे धाव घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.  शहरातील तरुण वर्ग  भाकास गावाकडे काय म्हणून जाणार हाही प्रश्न आहे.  साहजिकच  गावातील लोकसंख्या कमी होत असून शहरांमध्ये गर्दी वाढत आहे.  बरे ,शहरातील प्रश्न तर कुठे सुटले आहेत. तिथे इतक्या माणसांची व्यवस्था होईल, अशा सुविधाच नाहीत. शहरांमध्ये राहण्याचा, पाण्याचा तसेच रोजगाराचा प्रश्न बिकट होत चालला आहे, त्यामुळे रोजगारासाठी शहराकडे गेलेला माणूस शहरी झगमगाट मिळवला आहे, असे कुठे आहे. कित्येक लोक फूट पाठ, झोपडपट्टी भागात असुविधेत, दाटीवाटीने राहत आहेत. अनेक असुविधेत ही माणसं शहरात राहत असून शहराचा लाभ मिळतोच असे नाही. कित्येकांना शहराकडे धाव घेतल्याचा प्रश्चाताप होत असला तरी गावकड़े जाऊन तरी काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
 शहरांकडे वाढणारा तरुणांचा लोंढा थोपवायचा असेल तर शहारात ज्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, त्या ग्रामीण भागात मिळायला हव्यात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे  तिथे रोजगार निर्माण करून शहरातील तरुणांना गावाकडे आकर्षित करायला हवे. तरुणांनो, गावाकडे चला असे सगळेच म्हणतात, पण का? याचे उत्तर कोणीच देत नाही. जोपर्यंत याचे उत्तर सापडत नाही, तोपर्यंत गावाकडे तरुण जाणार नाही. रोजगार असेल तिथे लोकसंख्या वाढते हे सत्य आहे. २0११च्या जनगणनेनुसार देशातली ६८.८४ टक्के लोकसंख्या (८३.३१ कोटी) ही ६ लाख ४0 हजार ८६७ गावांत राहते. उरलेली ३२ टक्के लोकसंख्या ही शहरात राहते. मात्र, शहरात राहणार्‍या लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले. शहर आणि खेडेगावातील लोकसंख्येच्या घनतेमध्ये कमालीची तफावत निर्माण होत आहे. लोकसंख्येच्या घनतेची दरी कमी केल्याशिवाय आपला देश विकसित होणार नाही, देशातील राहणीमानाचा समतोल राखला जाणार नाही.
ब्रिटिशपूर्व काळात खेडी संपन्न होती. नंतर ती ओस का पडू लागली हे अगोदर पाहावे लागेल. ब्रिटिशपूर्व काळात गावगाडा कसा चालायचा तर अलुतेदार-बलुतेदार पद्धत प्रचलित होती. वस्तुविनिमय पद्धत होती. त्यामुळे गावातील सर्व लोक एकमेकांवर विसंबून असायचे. म्हणून गावाचा एकोपा होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जमीनदारी नष्ट करण्यात आली. लोकशाही समाजव्यवस्था हे स्वतंत्र भारताचे ध्येय ठरले. त्यामुळे गावात नवीन जागृती निर्माण झाली. पारंपरिक ग्रामसंस्था घुसळून निघाली. खेडेगावातही पैसा येऊ लागला, अलुतेदार-बलुतेदार या पद्धती कालबाह्य़ झाल्या. त्यामुळे गावातील लोकांचे एकमेकांवर विसंबून राहण्याचे दिवस संपले. परिणामी गावातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी लोप पावली आणि येथूनच खर्‍या अर्थाने सुरुवात झाली खेडे आणि शहरातील दरीला. खेडी परिपूर्ण व्हावीत असे मनापासून वाटत असेल तर पायाभूत सुविधांपासून सुरुवात करावी लागेल. गावात खेळाची मैदाने असावीत. करमणुकीसाठी रेडिओ, दूरचित्रवाणी, नाट्यगृह, सिनेमागृह सर्वांना उपलब्ध असावीत. नियतकालिके मिळण्याची सोय हवी. वाचनालये असावीत. शेतीची धान्यपिके, फळे-फुले बागाईत आणि वृक्षांचे योग्य संवर्धन व्हावे. त्यांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे. आरोग्य सुविधांची वानवा असता कामा नये. तालुका वा जिल्ह्य़ाच्या ठिकाणी हॉस्पिटल्स असावीत. ज्या ज्या पायाभूत सुविधा शहरात आहेत त्या त्या खेडेगावांमध्ये असाव्यात. खेड्यातील तरुणाला उच्च शिक्षण घेण्यासाठीच मुळात शहरांमध्ये यावे लागते. ग्रामीण भागात सर्व सुविधा आणि रोजगार मिळाल्या तर आपोआपच खेडी समृद्ध होणार आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment