Saturday, August 31, 2019

(बालकथा) अब आया उंट पहाड के नीचे

उंटानं पहाड कधी पाहिला नव्हता. त्याच्या बाबतीत कधी काही ऐकलं नव्हतं. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठा आणि उंच कोणी नाही, या पौढीत होता. एक दिवस झाडांची पानं खातं तो एका खुल्या मैदानात आला.  एक शेळीही  झाडांची पानं खात खात तिथे आली. आपल्या शरीराचा गर्व  बागळणारा उंट म्हणाला, "बघ, माझं शरीर किती बलाढ्य आणि उंच आहे."

शेळीने त्याला पाहिलं आणि म्हटलं," हा आहे, अगदी पहाडासारखं!
"पहाड!'' आश्रर्य मिश्रित ईर्षेनं उंट म्हणाला.
"हो पहाड! तुझ्या पेक्षा किती तरी मोठा आणि उंच असतो."
"माझ्यापेक्षा  किती तरी मोठा आणि उंच असतो?" उंट पुन्हा आश्चर्याने म्हणाला. तेवढ्यात जोराचं वादळ आलं. शेळी घाबरली. उंटाने वाळूच्या मैदान बैठक मारली. शेळीला म्हणाला," ये इकडं माझ्या आडोशाला. नाही तर या वादळात उडून जाशील."
शेळीने उंटाच्या आडोशाला बसून आपला जीव वाचवला. वादळ शमलं. उंट आकडून म्हणाला," बघ, माझ्या बलदंड शरीरामुळे तुझा जीव वाचला. "
"हो, खूप खूप धन्यवाद! तरीही पहाड पहाडच असतो. "
"चल, पळ येथून. उपकार तर मानले नाहीसच, उलट मलाच चिडवतेस?" 
"नाही दादा, असं नाही. गैरसमज करून घेऊ नकोस." शेळी विनवणी करू लागली.
" चल, पळ येथून." उंटाला राग आला.
दुसऱ्यादिवशी उंटाचा मित्र गाढव चरत चरत त्या मैदानात आले. गाढव म्हणाले," दोस्ता, असं करू या का? इथं फक्त खुरटं गवतच आहे. पोटच भरत नाही. सजीवाय झाडंही फार कमी आहेत. आपण तिकडे नदीकाठी जाऊ. तिकडे गवत,झाडं भरपूर आहेत."
उंटाने संमती दिली आणि दोघेही नदीच्या दिशेने निघाले. नदीच्या काठाने जात गवत आणि झाडाची पानं खात खात ते खूप दूर निघून गेले. तेवढ्यात जोराचं वादळ आलं.
गाढव घाबरून म्हणाले," बहुतेक हे वादळ आपल्याला उडवून नेईल. आपली काही खैर नाही."
उंट म्हणालं," घाबरू नकोस. मी खाली बसतो. तू माझ्या आडोशाला येऊन बस. काही होणार नाही."
उंट जमिनीवर बसला आणि त्याच्या आडोशाला गाढव येऊन बसले. पण वादळ जोराचं होतं. उंटाला बसणं अवघड झालं. तो थरथरू लागला. वाटू लागलं, आता त्याला वादळ उडवून नेईल.
तेवढ्यात गाढवही म्हणाले,"उंट दादा, आपलं काही खरं नाही. हे वादळ आपल्याला उडवून नेईल. चल,पळ, आपण समोरच्या पहाडाच्या आश्रयाला जाऊ. "
"पहाड?" पुन्हा उंटाच्या तोंडून आश्चर्याचा शब्द आला.
"नको रे,काय गरज आहे. थोड्या वेळाने वादळ थांबेल. " उंट म्हणाले.
गाढव मात्र घाबरून घट्ट झाले होते. "अरे, पळ नाही तर दोघांचाही फुकट जीव जाईल."
"ठीक आहे." उंट इच्छा नसतानाही गाढवासोबत पळाला. दोघेही पहाडाच्या  आश्रयाला आले.
उंटाने पहाड पहिल्यांदा पाहिले. प्रचंड मोठा आणि खूप उंच होता. उंट तोंड वर करून पहाडाचे शिखर पाहात होता. विशाल पहाड पाहून तो दंग झाला.
"माझ्यासारखे किती तरी उंट याच्या आश्रयाला येऊ शकतील." तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. त्याचा गर्व क्षणात उतरला. उंट तोंड वर करून पाहाडाच्या  शिखराकडे पाहात होता. पहाड गालातल्या गालात हसत होता. म्हणत होता,'अब आया उंट पहाड के नीचे.' -मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली) 7038121012

पत्ता- संभाजी चौक, के.एम.हायस्कूलमागे,जत ता. जत जि. सांगली. 416404

No comments:

Post a Comment