Tuesday, August 27, 2019

(बालकथा) खरी यात्रा

प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक संत तीर्थयात्रा करत करत गंगोत्रीला पोहचले. वाटेत त्यांनी हरिद्वार आणि उत्तर काशीमध्येदेखील स्नान केले. मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतले आणि तिथेच व्हरांड्यात आडवे झाले. थकले होते, त्यामुळे त्यांना लगेच झोप लागली.
झोपेत त्यांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांनी दिव्य पुरुषांचे संभाषण ऐकले. एक दिव्य पुरुष विचारत होता, "या वर्षी किती तीर्थयात्री आले आहेत?"
"जवळपास दहा हजार यात्री आले असतील?"
"मग परमेश्वराने सर्वांची सेवा स्वीकारली का?"
दुसरा म्हणाला,"नाही!त्यातील काही मोजक्याच लोकांच्या सेवा स्वीकारल्या गेल्या."
"असं का?"

"कारण, देवावर प्रामाणिक श्रद्धा ठेवून खूपच कमी लोक येतात."
"बरं दादा, तुम्ही तर आतापर्यंत लाखो भक्तांना पाहिलं आहे. पण अशीही व्यक्ती आहे का,जिला  तीर्थयात्रा न करताही फळ मिळालं आहे?" पहिल्या देव पुरुषाने विचारले.
"हो, आहे अशी एक व्यक्ती?"
"काय नाव आहे त्याचं? आणि तो कुठे राहतो?" पहिल्या देव पुरुषाने उत्सुकतेने विचारलं.
दुसरा देवपुरुष म्हणाला,"तो चामड्याचे काम करतो. त्याचं नाव आहे रामदास. गाव त्याचं शिखेड."
यानंतर अचानक संतांची झोप मोडली. त्यांना स्वप्नाचे मोठे आश्चर्य वाटले. त्याच दिवशी ते परत निघाले. काही दिवसांचा प्रवास करून ते शिखेड गावी पोहचले. तिथे रामदासच्या  घरी गेले.
"काय करता ,दादा तुम्ही?" संतांनी रामदासला विचारले.
"चपला बनवतो आणि विकतो,महाराज." रामदासाने उत्तर दिले.
"तू कधी तीर्थयात्रेला गेला आहेस का?"
"नाही महाराज!मी तर साधा गरीब माणूस! तीर्थयात्रेसाठी पैसा कोठून आणणार?"
संत पुन्हा म्हणाले,"तू आणखी काही पुण्याचं काम केलं आहेस का?"
"नाही महाराज! मी आणि पुण्याचं काम कसं करणार?"
"पण दादा, मला तर स्वप्न पडलं होतं, त्यानुसार तुझ्यावर देवाची मोठी कृपा आहे. पण कारणाशिवाय असं होणार नाही.नक्कीच कधी तरी तू एकाद दुसरं मोठ्या पुण्याचं  काम केलं असशील?"
रामदास सांगू लागला," साधू महाराज, मला काही माहिती नाही.पण मागे काही वर्षांपूर्वी मला तीर्थयात्रेला जायची खूप इच्छा होती.मी थोडा फार पैसाही जमा केला होता. मी घरातून बाहेर पडलोच होतो,तेवढ्यात मला शेजारच्या घरातून मुलांचा  रडण्याचा आवाज आला. मला कळलं की, ते तीन दिवस अन्न-पाण्यात वाचून भुकेले होते. मला वाटलं, तीर्थयात्रा केव्हाही करता येईल. पण या मुलांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. मग काय, तो सारा पैसा मी त्या शेजाऱ्याला देऊन टाकला. त्यातून त्यानं अन्नधान्य आणावं म्हणून...!"
तेवढ्यात संत उदगारले,"धन्य रामदासा!तू धन्य आहेस. " असे म्हणतानाच संतांच्या डोळ्यांत अश्रू आले." मग स्वतःला सावरत म्हणाले,"रामदास! खरी तीर्थयात्रा तर तू केली आहेस."-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


No comments:

Post a Comment