Tuesday, August 27, 2019

(कथा) खचलेले मन


ही हकीकत मी सातवीचा विद्यार्थी असतानाची आहे. आम्हाला गणिताला नवीन सर आले होते, सुरेश केंगार. मी गणितात हुशार नव्हतो. प्रयत्न खूप करायचो,पण मार्क मात्र किमान पासिंगच्या मार्कांजवळच घुटमळायचे. हा विषय माझ्या डोक्यावरूनच जायचा. आमच्या गणिताच्या शिक्षकांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा  आम्ही काहीसे चकित झालो होतो. कारण ते दिसायला थोडे विचित्रच होते. त्यांचा चेहरा मोठा होता आणि बाकी धड थोडे ठेंगणे होते. त्यांची उंची पाच फुटाच्या खालीच होती. सगळे त्यांना पाहण्यापेक्षा अधिक निरखून पाहात होते. याच दरम्यान, काही खोडकर मुलांच्या तोंडून हसू फुटले.
मला ही हरकत काही आवडली नाही. सर दिसायला थोडे विचित्र होते,पण शेवटी ते आमचे गुरू होते. सुरेश सर यांच्यासोबतचा पहिला दिवस काही खास गेला नाही. ओळखी करण्यात आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात गेला. त्यांनी सांगितले की,त्यांचे घर खेड्यात आहे आणि ते एकटेच इथे शहरात राहतात. 

दुसऱ्या दिवशी आम्ही गणिताच्या तासाला सुरेश सरांची वाट पाहात होतो. पण त्यांना यायला उशीर होत होता. याच दरम्यान, वर्गातल्या कुणीतरी खोडकर मुलाने माकडाचा आवाज काढला. त्याबरोबर सगळा वर्ग हास्यकल्लोळात बुडाला. मग काय!वर्गात माकडाचा आवाज काढण्याची स्पर्धाच सुरू झाली. तेवढ्यात एका खोडकर  मुलाने म्हटलेच,"आपल्या नव्या सरांचे तोंड माकडासारखेच आहे. " हे ऐकून वर्गात पुन्हा मोठ्याने हशा पिकल्या.तेवढ्यात सर वर्गात आले. वर्ग एकदम चिडीचूप झाला.
सरांनी बहुतेक सगळं ऐकलं असावं,पण त्यांनी त्याकडे कानाडोळा केला आणि शिकवायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या पहिल्याच तासाला ज्याप्रमाणे शिकवायला सुरुवात केली,त्याने मी फारच प्रभावित झालो. कारण त्यांनी गणिताचे उदाहरण फारच सोप्या भाषेत आणि पद्धतीत समजावून सांगितले. यापूर्वी कुणीच अशा पद्धतीने गणित शिकवलं नव्हतं. त्यांच्या अशा पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या गणितामुळे हा हार्ड विषय मला सोपा वाटू लागला होता. सुरेश सरांकडे योग्यता होती. हळूहळू माझ्यात प्रगती होत होती. मला हा विषय आवडू लागला होता.पण इकडे खोडकर,टारगट  मुलांचा दूरव्यवहार दिवसेंदिवस वाढत चालला होता. सरांनी त्यांना समजावून सांगितले, ताकीद दिली,पण त्यांच्यात काहीच सुधारणा होताना दिसत नव्हती. सरांना नेहमी माकड किंवा चिंपाझी म्हणून हिणवले जात होते. त्यांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष टर उडवली जात होती.
मधली सुट्टी असो किंवा लहान सुट्टी ! शाळा परिसर असो वा कोठेही!संधी मिळेल तिथे त्यांना टार्गेट केले जात होते. सुरेश सर विनम्र आणि भावूक मनाचे होते.ते कुठल्या मुलावर हात उगारत नव्हते. छडीचा वापर तर कधीच त्यांनी केला नाही.  फार तर ताकीद द्यायचे किंवा वर्गाबाहेर उभा करायचे. पण मुले त्यांना समजूनच घ्यायचे नाहीत. पुढे पुढे मुलांच्या हरकती सर मनावर घेऊ लागले. जो जोश, उत्साह सुरुवातीला शिकवताना होता, आता तो राहिला नव्हता. मला अंदाज आला की,मुलांच्या गोष्टी त्यांनी फारच मनावर घेतल्या आहेत. यामुळे त्यांची उच्च श्रेणीची योग्यता दबली जात होती.
एके दिवशी अचानक सुरेश सरांच्या जागी दहावीला शिकवणारे अभिजीत सर वर्गात आले. त्यांनी सांगितले की, "सुरेश सर येणार नाहीत,त्यामुळे त्यांच्या जागी आता गणित विषय मी शिकवणार आहे. चार दिवस लागोपाठ सुरेश सर शाळेत आले नसल्याने अभिजीत सरांचा तास सुटल्यावर सुरेश सर न येण्याचे कारण विचारले. त्यांनी सांगितले की,त्यांची तब्येत ठीक नाही,त्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली आहे. कदाचित ते येणारही नाहीत."
माझं मन व्याकूळ झालं.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुरेश सरांना भेटायला त्यांच्या खोलीवर गेलो. त्यांच्यात पहिल्यासारखा उत्साह आणि ऊर्जा दिसत नव्हती. त्यांना शाळेला न येण्याचं कारण विचारलं,तेव्हा सांगितलं की, त्यांनी शाळेतील नोकरी सोडली आहे.मी म्हणालो,"तुम्ही खूप छान शिकवता सर!मी गणितात कच्चा होतो सर! तुमच्यामुळे त्यात सुधारणा झाली आहे. तुम्ही पुन्हा शाळेत या ना सर?"
सर म्हणाले,"बाळा, आता ते शक्य नाही.
मी त्यांना विचारलं,"सर, मी रोज तुमच्याकडे गणित शिकायला येऊ का?मला तुमच्याकडूनच शिकायचं आहे. प्लिज सर, नाही म्हणू नका."
सर म्हणाले," ठीक आहे, मी रोज संध्याकाळी तुला शिकवीत जाईन."
दुसऱ्या दिवसापासूनच मी ठरलेल्या वेळेत त्यांच्याकडे गणित  शिकायला जाऊ लागलो. गणितात आणखी सुधारणा होऊ लागली.  आमची दुसऱ्या टर्ममधील चाचणी परीक्षा जवळ आली होती. या पेपरची तयारी मी सुरेश सरांसोबत केली. या ट्युशन दरम्यान सुरेश सर आणि माझ्यात छान मैत्री जमली. आम्ही खूप हसायचो. त्यांना विनोद सांगायलाही आवडे. आता माझ्या लक्षात आलं की, सुरेश सर स्वतःला सावरत आहेत.
दुसऱ्या चाचणीच्या गणिताच्या पेपरचे मार्क सांगायला अभिजीत सर वर्गात आले. गणितात सर्वात जास्त मार्क घेणाऱ्या मुलाचे नाव सरांनी घेतल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण तो मी होतो.
आमच्या वर्गामध्ये सर्वाधिक डांबरट असलेला नितेश उठून उभा राहिला आणि म्हणाला,"सर, या अगोदर याने  कधीच गणितात इतके मार्क घेतले नाहीत. याने नक्कीच चिंटिंग केली आहे."
मी आत्मविश्वासपूर्वक उत्तर दिले," नाही सर, मी अजिबात चिंटिंग केली नाही. हे माझ्या आणि सुरेश सरांच्या मेहनतीचे फळ आहे.मी त्यांच्याकडूनच गणिताची ट्युशन घेतली होती. आमच्या वर्गातल्या काही मुलांच्या खोड्या आणि शेरेबाजी यामुळे सुरेश सरांना खूप दुःख झाले. त्यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेतली. आणि त्यांनी नोकरी सोडली.
माझी ही गोष्ट ऐकून वर्गातली सर्व मुले आणि अभिजीत सर दंग झाले.  अभिजीत सरांच्या लक्षात काय प्रकार आहे तो पूर्ण लक्षात आला. तेव्हा सरांनी वर्गातल्या मुलांना विचारले,"जर तुमची आई किंवा कुणाचीही आई दिसायला विद्रुप असेल, सावळी असेल किंवा काळी असेल अथवा तिच्यात काही शारीरिक व्यंग असेल तर तुम्ही तिच्यावर प्रेम नसतं केलं का? तिला तिचा सन्मान दिला नसता का? तिला घराबाहेर काढलं असतं का?" हे ऐकून वर्गातली टारगट पोरं गप्प झाली. त्यांना आपण केलेल्या कृतीचा पश्चताप झाला. ते म्हणाले,"सर, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. सुरेश सरांना पुन्हा घेऊन या. आम्हालाही  त्यांच्याकडूनच शिकायचं आहे."
संध्याकाळी माझ्या सोबत अभिजीत सर त्यांच्या खोलीवर आल्यावर सुरेश सरांना फार आनंद झाला. मी सुरेश सरांना शाळेत काय घडले, ते सर्व सांगितले. त्यांना पुन्हा शाळा जॉईन करण्याची विनंती अभिजीत सरांनी केली.  पहिल्यांदा ते तयार झाले नाहीत,पण मुख्याध्यापक सरांनी पाठवलेला संदेश आणि आमचा आग्रह त्यांना मोडवला नाही. त्यांनी पुन्हा शाळा जॉईन करण्याचे मान्य केले. दुसऱ्या दिवशी ते पहिल्यासारखे उत्साहात, पुऱ्या जोशात शाळेत आले. शाळेतील सगळ्याच मुलांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. टारगट मुलांनी त्यांची माफी मागितली. मला मात्र खूप आनंद झाला होता,कारण सर, खचलेल्या मनस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आनंदाने जीवन जगायला लागले होते. -मच्छिंद्र ऐनापुरे.


No comments:

Post a Comment