विनायकने सकाळी लवकरच आईला उठवलं आणि हाताला धरून बाहेर अंगणात जिथे काही दिवसांपूर्वी पपईच्या बिया लावल्या होत्या, तिथे आणलं. "बघ आई,मी ज्या बिया पेरल्या होत्या,
आता त्या उगवून आल्या आहेत." हे सांगताना त्याला फार आनंद झाला
होता.
"खूप छान बाळा,आता तुला यांची काळजी
घ्यावी लागेल.आता कुठे अंकुर फुटले आहेत. नंतर त्यांचे रोपटे होईल. पुढे ती मोठी
होतील आणि मग फळं लगडतील." आई म्हणाली.
एके दिवशी तो शेजारच्या माळी काकांकडे गेला. त्यांच्या बागेत खूप पपईची झाडं होती. त्याने विचारले,"काका, किती दिवसांत झाडाला पपई लागतात?" त्याची उत्सुकता वाढत चालली होती. काका म्हणाले,"बाळा,पपईच्या रोपाला जवळपास आठ-नऊ महिन्यांनी फळं यायला सुरूवात होते. या रोपांना आठवड्यातून फक्त दोन तीन वेळेलाच पाणी द्यायचं असतं नाही तर रोप जाळून जातात.
आता तर विनायक पपईच्या रोपांची फारच काळजी घ्यायला लागला. शाळेतून आल्यानंतर अंगणातल्या पपईच्या रोपट्याजवळ येऊन बसायचा. पपईच्या रोपांभोवतीचं आळं सारखं करायचा. स्वच्छता ठेवायचा. त्यांना पाणी घालायचा. त्यांच्या वाढलेल्या प्रत्येक भागाला न्याहळायचा. त्यात त्याला भारी मौज वाटायची.
कधी आईला सल्ला विचारायचा. कधी बाबांशी बोलायचा. त्याचे सारखे काही ना काही प्रश्न असायचे. पण सगळे त्याला समजून सांगायचे. जसजशी रोपटं वाढत होती, तसतशी त्याची उत्सुकता आणि प्रश्न वाढत होते. त्याचा आनंदही रोपांच्या वाढत्या उंचीबरोबरच वाढत चालला होता.
एक दिवस त्याने आईला विचारलं,"आई, असा काही उपाय नाही का, की रोपाला पटकन फळं यावीत?"
आईने सांगितलं," बाळा, प्रत्येक कामासाठी निसर्गाने ठराविक वेळ ठरवली आहे.प्रकृतीच्या नियमानुसारच फळ मिळतं. आपल्या हातात फक्त प्रामाणिकपणे आणि मेहनतीने कार्य करत राहणं, या दोनच गोष्टी असतात."
अशा प्रकारे प्रतीक्षा आणि परिश्रम करता करता एक दिवस असा उजाडला की, त्यादिवशी पिकलेल्या पपई तोडल्या गेल्या. आईने त्याच्या कापून फोडी बनवल्या आणि एका ताटात सजवून ठेवल्या. आज विनायक फारच आनंदित होता. त्याने आईला विचारलं,"आई, आता मी पपई खाऊ ना?"
तो खूप नाराज झाला, जेव्हा आईने त्याला पपईच्या फोडी शेजाऱ्यांना वाटून यायला सांगितल्या तेव्हा. आई म्हणाली," आपल्या घरचे पपई असले तरी त्याच्यावर पहिला हक्क समाजाचा असतो. ज्यांच्यामध्ये आपण राहतो, त्यांचंही या झाडांच्या संरणाक्षणाकडे लक्ष असतं."
विनायक शेजाऱ्या-पाजारयांना पपईच्या फोडी वाटून आला. त्यानंतर घरी आल्यावर आईनेही त्याला पपईची फोड दिली. आईने विनायकला विचारलं,"बाळा, पपई कशी आहे? छान आहे ना? आनंद वाटतोय ना?"
विनायकनं उत्तर दिलं,"आई, खरं सांगू का? पपई वाटण्यात जो आनंद आला ना, तो खाण्यात नाही आला. अगं आई, सांगू का तुला? ज्यांनी ज्यांनी पपई खाल्ली ना सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.सगळ्यांनी पपई फार गोड आहे, स्वादिष्ट आहे सांगितलं. त्यांचा आनंद पाहून मलाही खूप आनंद आणि अभिमान वाटला." आई म्हणाली," बाळा, आयुष्यभर असंच मिळूनमिसळून राहा. सगळ्यांना आनंद दे."
मुलांनो, हाच मुलगा पुढे विनोबा भावे नावाने प्रसिद्ध झाला. भारत सरकारने त्यांचा 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरव केला.-मच्छिंद्र ऐनापुरे. 7038121012
No comments:
Post a Comment