Tuesday, August 27, 2019

(बालकथा) जॉन अंकल


गल्लीत सर्वात वयस्कर आहेत जॉन अंकल. तरीही सगळे त्यांना जॉन अंकलच म्हणतात. जॉन अंकल   स्वभावाने खेळकर आहेत. ते नेहमी आनंदी असतात. थोडे गप्पीष्ट आहेत. त्यांच्या गप्पा ऐकायला मुलांना फार आवडतं. रोज संध्याकाळी मुलं त्यांच्या घराच्या व्हरांड्यात जमा होतात,कारण त्यांच्याकडून मनोरंजक गोष्टी, विनोद ऐकायला मिळतात. एक दिवस मुलं संध्याकाळी जायची ती, सकाळीच जाऊन बसली. त्यांना पाहून जॉन अंकल चकित झाले. जॉन अंकल बाहेर आल्यावर सगळी मुलं एकदम म्हणाली,"हॅपी बर्थ डे अंकल."
अंकल पुन्हा चकित झाले,"अरे, तुम्हाला माझा वाढदिवसदेखील माहीत आहे?"

"हां अंकल, आणि हा घ्या बर्थ डे कार्ड? आम्ही सगळ्यांनी बनवलाय."
कार्ड पाहून जॉन अंकालना फार आनंद झाला. "व्हेरी व्हेरी थँक्स माय चिल्ड्रन!"
मुलं आनंदात होती. त्यांची दंगामस्ती चालली होती. जॉन अंकलंनी काही तरी विचार केला आणि म्हणाले,"आज गोष्ट ऐकायला नक्की या मुलांनो! आज माझा वाढदिवस आहे तर आज मी तुम्हाला एक छान आणि खास गोष्ट सांगणार आहे." मुलं आनंदानं घरी गेली. त्यांना माहीत होतं की, आज गोष्ट ऐकायला मज्जा येईल.
संध्याकाळ झाल्यावर झाडून सगळी गल्लीतली पोरं त्यांच्या भोवती गोळा झाली.. अंकल म्हणाले,"आज मी तुम्हाला आर्मी लाईफमधली गोष्ट सांगणार आहे."
मुलांना चांगलं माहीत की, अंकल भारतीय लष्कराच्या सेवेत होते.
जॉन अंकलनी गोष्ट सांगायला सुरुवात केली," ही गोष्ट त्यावेळची आहे,ज्यावेळी आमची बटालियन हिमालय पर्वताच्या उंच शिखरावर तैनात होती. त्यावेळेला तिथे इतकी थंडी पडली होती की, आमच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. दोन फुटावर उभ्या असलेल्या सैनिकांनादेखील आमचं बोलणं ऐकायला जात नव्हतं. ज्यावेळेला आम्ही आमच्यामध्ये आग पेटवायचो, तेव्हा कुठे आपसात  बोलणं व्हायचं." 
हे ऐकून मुलांनी आश्चर्याने विचारलं," बापरे!इतकी प्रचंड थंडी पडते तिथे?"
"हो... शत्रू  गोळा फेकायचा ना तेव्हा त्याचा आवाजदेखील ऐकायला यायचा नाही. बॉंब थेट येऊन आदळायचा." मुलं आश्चर्यात बुडाली होती आणि जॉन अंकल हसत होते.
आता पुढची गोष्ट ऐका,"एकदा आमची पोस्टिंग राजस्थानातल्या वाळवंटात झाली होती. त्या वर्षी बॉर्डरवर भयंकर उन्हाळा होता. इतका उन्हाळा की, आम्ही आंघोळीला अंगावर पाणी घ्यायचो तर त्याची वाफ होऊन आकाशात उडायची. तेव्हा आम्ही मग उपाय शोधला. आम्ही बादलीत पाणी भरून घ्यायचो आणि बँकरमध्ये  जायचो आणि तिथे आंघोळ करायचो. "
पुन्हा मुलं मोठ्यानं ओरडली,"अरे बापरे! असला भयंकर उन्हाळा? असल्या उन्हाळ्यात तर आम्ही मरूनच जाऊ, अंकल!खरंच!" जॉन अंकल मोठमोठ्याने हसू लागले. त्यांना पाहून मुलांनी सुस्कारा सोडला. कारण ते हिमालयात  किंवा वाळवंटात नव्हे तर जॉन अंकलच्या घरात  बसले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment