Tuesday, August 27, 2019

(बालकथा) हुशार शिकारी


एका गावातला एक जमीनदार फार रागीट होता. त्याला लोकांना विनाकारण त्रास द्यायला आवडायचे. तो काहीसा मठ्ठ डोक्याचाही होता,त्यामुळे कोणतीही गोष्ट लक्षात यायला त्याला उशीर लागायचा. गावाजवळ दाट जंगल होतं. जमीनदार या जंगलात नेहमी शिकार खेळायला जायचा.
एकदा जमीनदार जंगलात शिकार करायला गेला. तिथे एका हरणाला पाहून त्याने बंदुकीचा निशाणा साधला. पण इतक्यात तिथेच असलेल्या एका शिकाऱ्याने अचूक निशाणा साधून त्या हरणाची शिकार केली. हरीण खाली कोसळले. 
हे पाहून जमीनदार भयंकर संतापला. तो शिकाऱ्याला म्हणाला,"ही शिकार माझी होती, तू का त्याला मारलंस?" त्याने संतापाने आपल्या माणसांकरवी त्या शिकाऱ्याला खूप मारहाण केली.
शिकाऱ्याला विनाकारण मारहाण झाल्याने तोही संतापला.त्याने मनातल्या मनात निश्चय केला,"आता या गावात राहायचे नाही,पण जमीनदाराला मोठी अद्दल घडवायची."
शिकारी रात्रभर काय करायचे,याची योजना आखत राहिला. सकाळी उठल्यावर जमीनदाराच्या वाड्याच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला कळले की, थोड्याच वेळात जमीनदार पुन्हा शिकारीला जाणार आहे.
मग काय! तो लगेच माघारी फिरला. घरातून बंदूक घेऊन जंगलात गेला. वाटेत त्याने एका सशाची शिकार केली. ती शिकार त्याने एका झाडाखाली झाकून ठेवली. पुढे गेल्यावर त्याने काही कावळ्यांची शिकार केली. तीही तिथेच एका झाडाखाली झाकून ठेवली. या नंतर शिकारी लपून जमीनदाराची प्रतीक्षा करू लागला.

काही वेळाने जमीनदार आणि त्याची माणसे येताना दिसली. शिकारी झाडीतून बाहेर आला. थोडा लांब उभारून एका झाडावर निशाणा साधला. जमीनदार जवळ आल्यावर त्याने गोळी झाडली. 
जमीनदाराने इकडेतिकडे पाहिले,पण त्याला कुठेच जनावर दिसले नाही. त्यामुळे तो शिकाऱ्याची टर उडवत म्हणाला,"हवेत गोळ्या झाडून कशाला टेंभा मारतो आहेस, जा, गप गुमान घरी जा."
शिकाऱ्याने जमीनदाराला वाकून नमस्कार केला आणि म्हणाला,"असं काही नाही. ही बंदूक जादूची आहे. याचा निशाणा कधीच चुकत नाही. याचा चमत्कार आता दाखवतो."
असे म्हणून समोरच्या झाडीखाली  मघाशी शिकार केलेला आणि लपवून ठेवलेला ससा त्याने त्याला आणून दाखवला. मात्र जमीनदाराचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. तो म्हणाला,"खोटे आहे हे! असं होऊच शकत नाही. मला मूर्ख बनवत आहेस."
तोपर्यंत त्याने दुसऱ्या कोपऱ्यावर तिकडे लांब असलेल्या झाडावर निशाणा साधला आणि गोळी झाडली. मग म्हणाला,"या बंदुकीचा निशाणा कधीच चुकत नाही. तुम्ही स्वतः पाहू शकता." असे म्हणून त्याने कोपऱ्यातल्या झाडाखाली ठेवलेले कावळे घेऊन आला. 
जमीनदार पाहातच राहिला. तो म्हणाला,"ही बंदूक मला विकून टाक. यासाठी तुला दोन हजार देतो. बोल, आहे का मंजूर?
"माझ्या वडिलांनी ही बंदूक एका जादूगाराकडून विकत घेतली होती.त्याने सांगितले होते की, ही बंदूक कधीच कुणाला विकायची नाही." शिकारी म्हणाला.
"चल, आता चार हजार देतो. यापुढे नाही. दे इकडे!" असे म्हणून त्याने त्याची ती बंदूक अक्षरशः हिसकावून घेतली. जमीनदाराच्या सांगण्यावरून त्याला चार हजार रुपये देण्यात आले. 
रुपये घेऊन तो लगेच घरी परतला. बायकोला म्हणाला,"थोड्याच वेळात जमीनदार येईल. तू तयार राहा बरं." असे म्हणून त्याने सगळी हकीकत आपल्या बायकोला सांगितली. काय करायचं तेही सांगितलं.
खरोखरच थोड्या वेळाने जमीनदार आरडाओरडा करत  आला. तो थेट शिकाऱ्याच्या घरात घुसला. जमीनदाराने पाहिले की,शिकारी एक हातोडा घेऊन त्याच्या बायकोजवळ उभा आहे.
जमीनदाराला पाहताच शिकाऱ्याने हातोडीने बायकोच्या खनपटीला हळुवार मारायला सुरुवात केली. म्हणाला,"दे एक रुपया?"
जमीनदाराने पाहिले की, शिकाऱ्याच्या बायकोच्या तोंडातून एक रुपया खाली जमिनीवर पडला. 
हा चमत्कार पाहून जमीनदार म्हणाला,"तुझ्या बंदुकीतून काही अंतरावरचा जनावर देखील मरत नाही.तू मला फसवलं आहेस."
शिकारी म्हणाला," असं होणार नाही.माझी ती बंदूक जादूची आहे आणि हा हातोडादेखील! याने  खानपटीला ठकठक केल्याने हिच्या तोंडातून एक रुपया पडतो. हे बघा!" असे म्हणून त्याने त्याच्या बायकोच्या खानपटीला हातोड्याने ठकठक केली. आणि तिच्या तोंडातून एक रुपया खाली पडला.
असे त्याने अनेकदा केले.
जमीनदाराला मोठं आश्चर्य वाटलं. तो फक्त पाहातच राहिला. शिकारी पुढे म्हणाला," जेव्हापासून हा हातोडा मिळाला आहे, तेव्हापासून मी मला हवे तेवढे पैसे काढतो. जर तुम्हाला बंदूक पसंद नसेल तर तुमचे पैसे संध्याकाळी घेऊन जा. तोपर्यंत तुमच्या चार हजार रुपयांची व्यवस्था करून ठेवतो."
जमीनदार बंदुकीची गोष्ट विसरूनच गेला. म्हणाला,"मला हा हातोडा विकत दे."
"कुठल्याही परिस्थितीत नाही. अगोदरच माझी बंदूक तुम्हाला विकली आहे." शिकारी म्हणाला.
जमीनदाराला हाव सुटली होती. त्याला कोणत्याही किंमतीत तो हातोडा हवा होता. म्हणाला,"पाच हजार, दहा हजार कितीही रुपये घे,पण मला हा हातोडा दे.वाटल्यास तुला तुझी बंदूक परत करेन आणि त्याचे पैसेही घेणार नाही. थांब, तुला आताच पैसे देतो."
थोड्या वेळातच तो दहा हजार रुपये घेऊन आला. शिकाऱ्याने बंदूक आणि रुपये घेऊन त्याला हातोडा दिला.
जमीनदार हातोडा घेऊन घरी गेला. त्याने बायकोला बोलावले. म्हणाला,"आता आपण मालामाल होणार. तुझ्या तोंडातून पैशांचा पाऊस पडणार." मग त्याने बायकोच्या खनपटीला हातोड्याने ठकठ क केली. आणि म्हणाला,"दे रुपया."
पण रुपया कोठून निघणार? ही तर शिकाऱ्याची चाल होती. त्याने अगोदरच त्याच्या बायकोच्या तोंडात रुपये भरून ठेवले होते. तेच ती तोंडातून बाहेर टाकत होती.
आपल्या नवऱ्याचा हा विचित्र प्रकार पाहून जमिनदारीण ओरडायला लागली. जमीनदार ओळखून चुकला की, आपल्याला शिकाऱ्याने पुन्हा ठकवलं आहे. पैशाबरोबर बंदूकही गेली. तो संतापानेच आपली बंदूक घेऊन शिकाऱ्याच्या घराकडे धावला.
पण घरात शिकारी होताच कुठे? तो तर ठरल्याप्रमाणे बायकोला घेऊन पसार झाला होता. जमीनदार मात्र डोक्याला हात लावून तिथेच मटकन बसला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment