Monday, September 4, 2017

उत्तर कोरियाच्या मुसक्या आवळा

     उत्तर कोरियाने सहावी अणू चाचणी घेऊन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाच्या टिकर्या टिकर्या उडवल्या आहेत.त्याने सगळ्या जगाला आणि त्यातल्या त्यात अमेरिकेलाच खुले आव्हान दिले आहे. या अणूचाचणीला उत्तर कोरिया हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवून आणल्याचा दावा करत आहे.या स्फोटानंतर जमिनीमध्ये निर्माण झालेली कंपने पाहता ही आतापर्यंतची सर्वात शक्तीशाली अणू चाचणी असल्याचे मानले जात आहे.याला जपानसह अनेक देशांनी पुष्टी दिली आहे.उत्तर कोरियाने केलेल्या पाचव्या अणू चाचणीच्या तुलनेत ही चाचणी नागासकी आणि हिरोशिमावर फेकण्यात आलेल्या अणूबॉम्बपेक्षाही कित्येक पटीने शक्तीशाली असल्याचे सांगितले जात आहे.उत्तर कोरियाच्या दाव्यानुसार हा हायड्रोजन बॉम्ब मिसाईलवर लोड केला जाऊ शकतो. त्याचे हे वागणे जागतिक शांततेच्यादृष्टीने नक्कीच धोकादायक आहे.तो सातत्याने आपल्या दबंगगिरी ओळख करून देत आहे, त्यामुळे तो सर्वात मोठ्या शिक्षेला पात्र आहे.

     एका हुकूमशहाला जागतिक शांतता धोक्यात घालण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनसारख्या देशांचे वागणेही असे नाही की, या देशावर त्याचा परिणाम व्हावा. गेल्या आठवड्यातच उत्तर कोरियाने जपानच्या वरून एक बॅलिस्टिक मिसाईल डागले होते.अशा प्रकारे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर विभागाकडे अगोदरच अशी माहिती उपलब्ध झाली होती की, उत्तर कोरिया लवकरच सहावी अणूचाचणी घेणार आहे. असे असतानाही केवळ नाराजी किंवा धमकी देण्यापलिकडे अन्य देशांकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. अमेरिकेचे राष्त्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाला परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती,मात्र उलटपक्षी प्योंगयांग याने अमेरिकी बेट गुआमवर निशाणा साधण्याची धमकी देऊन टाकली. प्योंगयांगच्या आतापर्यंतच्या वागण्याचा असाच अर्थ काढला जाऊ शकतो की, तो देश धमक्या किंवा निर्बंधांना भीक घालणारा नाहीया देशाला वठणीवर आणण्यासाठी अन्य मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
     जपानने विनाविलंब संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. याची अंमलबजावणी तातडीने व्हायला हवी. खासकरून चीन आणि अमेरिका या देशांनी समजूतदारपणा दाखवत परिस्थिती योग्य प्रकारे हातळण्याची गरज आहे. आक्रस्ताळपणा केल्यास त्याचा गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागणार आहे. मात्र याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी गप्प बसावे. उत्तर कोरियाची गोची होईल, अशा प्रकारची रणनीती आखली जायला हवी. कदाचित अमेरिकेने आपल्याशी बोलणी करावी, हे सांगण्यासाठी उत्तर कोरियाने बिजिंगमध्ये होणार्या बिक्रसच्या बैठकीपूर्वी ही चाचणी घेतली असावी. बिजिंगवर दबाव आणला जावा, असाही उद्देश असू शकतो. त्यामुळे देशातल्या जबाबदार देशांची इथे कसोटी लागणार आहे.

No comments:

Post a Comment