Saturday, July 29, 2017
Friday, July 28, 2017
ज्योतिषशास्त्र आणि आपण
माणसाला आपल्या पुढच्या आयुष्यात काय घडणार आहे,याची नेहमीच उत्सुकता असते. भविष्य जाणून घ्यायला माणूस
तसा उतावीळ असतो. ते जाणून घेण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो.
यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला जातो. मात्र
काही लोक याच्या आहारी जातात. अपेक्षित परिणाम आला नाही तर मात्र
निराश होतात. बरेच काही गमावून बसतात. ज्यांनी याचे दुकान मांडले आहे,
ती मंडळी लोकांना लुबाडून आपले खिसे गरम करतात. अशा लोकांमुळे ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे.पण तरीही
भविष्य जाणून घ्यायची वृत्ती संपलेली नाही. त्याची उत्सुकता अबाधित
आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार शनी, मंगळ,
गुरु हे खगोलीय ग्रह असले तरीही यांचा मानवी जीवनमानावर परिणाम होत असतो.
अशी धारणा असलेल्यांची लोकांची संख्याही मोठी आहे. कित्येक जण या ग्रहांच्या हालचालींचा दैनंदिन जीवनाशी संबध लावतात.
त्यानुसार आपले जीवन व्यतीत करत असतात.
ज्योतिष हे एक शास्त्र आहे.याला हळूहळू मान्यता मिळत आहे. हिंदू ज्योतिष पद्धती
ही हिंदूचे प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या
स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते,
ज्योतिष या शब्दाचा स्त्रोत हा मूळ संस्कृत शब्द ‘ज्योति’मध्ये आहे. ‘ज्योति’
म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची
आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त
परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे
शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. ज्योतिषशास्त्र म्हणजे परिपूर्ण
विज्ञान नाही,हेही कबूल करायला हवे.
या शास्त्राचा काय फायद्याबाबत समाजात
मतभिन्नत आहे. ज्योतिषशास्त्राबद्दल अनेक समज-गैरसमज आपल्या समाजात आहेत. ज्योतिषशास्त्रात वर्तविलेले
भाकित जरी जसेच्या तसे नसले तरी 80 टक्के घटना जुळून येत असतात,
असे अभ्यासकांचे मत आहे. हे शास्त्र भविष्यातील
धोके सांगत असते. भविष्य जाणून हे धोके टाळण्याचा प्रयत्न माणूस
करू शकतो. किंवा या धोक्यातील तीव्रता कमी करण्याचा प्रयत्नदेखील
हे शास्त्र जाणून करू शकतो. मात्र, भविष्य
जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घ्या. पण, त्याच्या आहारी जाऊ नका. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, असाही सल्ला दिला जातो.
ज्योतिष
सांगण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे कुंडली. त्यानंतर कृष्णमूर्ती,
हात बघून, चेहरा बघून अशा अनेक भविष्य सांगण्याच्या
पद्धती आहेत. कृष्णमूर्ती पद्धतीत गणिती भाग मोठया प्रमाणावर
असतो. साडेसातीबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा काळ माणसाच्यादृष्टीने मोठा कठीण काळ असतो. अभ्यासकांच्या
मतानुसार साडेसातीच्या काळात शनि 3 राशींमध्ये भ्रमण करतो.
सध्या शनी ज्या राशीत असतो, त्याच्या मागच्या आणि
पुढच्या राशीत शनी काही काळ राहतो. राशीचे काही वाईट करत नाही.
20 ते 50 वयापर्यंतच्या व्यक्तींना साडेसाती लागते.
साडेसातीत वाईटच होत किंवा फार त्रास होतो हा गैरसमज आहे. शनी ग्रहाइतका न्यायी ग्रह दुसरा कोणताही नाही. चांगल्याला
चांगले आणि वाईटाला वाईट, मग समोर कोणीही असो, म्हणणारा हा एकमेव ग्रह आहे. साडेसातीच्या काळात अनेक
लोक भरभराटीलाही आलेले आहेत.
मंगळ दोषाबद्दलही लोकांमध्ये सारखी
चर्चा होत राहते. अशा मुला-मुलींंची लग्ने
लवकर होत नाहीत, असे म्हटले जाते.
जन्मकुंडलीतील
हा मंगळ
दोष अनेक मुला-मुलींच्या लग्नात आडवा येतो. त्यामुळे अशा मुला-मुलींचे लग्न कारण नसताना रखडते.
मात्र अभ्यासक सांगतात की, मुळात मंगळ अशुभ दोष
नाही. आपल्या सर्वांच्याच पत्रिकेत इतर ग्रहांप्रमाणेच मंगळ हा
ही एक ग्रह असतो. पण 1, 4, 7, 8 व
12 या स्थानात मंगळ असल्यास तो मंगळदोष मनाला जातो. मंगळी व्यक्तींची वागण्याची पद्धत खूप सरळ असते. मंगळ
असलेल्या व्यक्तींमध्ये स्पष्टवक्तेपणा असतो. त्यामुळे त्यांचे
इतर राशींसोबत जुळणे कठीण असते. त्यांचे प्रेम आणि राग,
दोन्ही अतिशय तीव्र पण मनापासून असते. मंगळ दोष
असलेल्या व्यक्तींचा स्वभाव नीट समजून घेतला तर या व्यक्ती पत्नी व नंतर कुटुंबीयांसाठी
सकारात्मक ठरू शकतात.
ज्योतिषशास्त्रात आणखी एका गोष्टीची
भिती असते, ती म्हणजे कालसर्प योग . अभ्यासकांच्या
म्हणण्यानुसार कालसर्प नावाचा कोणताही योग नाही. अडलेल्या लोकांना
लुटण्यासाठी काही लोकांनी या कालसर्प नावाच्या योगला जन्म दिला. लोक अंधश्रध्दाळू आहेत. काही लोकांना मोठमोठया पूजा सांगितल्या
नाहीत तर उपाय झाला असे वाटत नाही. त्यामुळे भोंदू लोकांचे फावते.
लग्नाच्या
वेळी गुण बघणे ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे. सध्या प्रेमविवाह
मोठया प्रमाणावर होतात. त्यांच्या पत्रिकाही बघितल्या जात नाहीत.
तरीही त्यांची लग्न व्यवस्थित टिकतात. विवाह मोडतात,त्याला बर्याच प्रमाणात इगो महत्त्वाचा ठरतो.आजची पिढी शिक्षित आहे. बर्याच
घरात दोघेही कमावते असतात. त्यामुळे एकमेकावरचे दडपण सहन करत
नाहीत. एकमेकाला समजून घेतले तर विवाह टिकतात. त्यामुळे स्वभाव, मन, आरोग्य,
सांपत्तिक स्थिती बघून लग्न करण्याचा सल्ला देतो.
येणाऱया
संकटावर मात करण्यासाठीच्या उपायाबाबत जाणकार सांगतात ते मात्र लक्षात ठेवले पाहिजे.
ज्योतिषशास्त्र फक्त भविष्य सांगते. जे भविष्यात
होणार आहे ते अटळ आहे. भविष्य जाणून घेतात. कारण, येणाऱया संकटावर मात करण्यासाठी आपण सावध राहावे.
कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय भविष्यातील संकटे दूर करू शकत नाही.
ग्रहांच्या
खडयांबद्दल लोकांना उत्सुकता आहे.मात्र खडा हे आपल्या शरीरात
व्हिटॅमिनचे काम करतो. खडा नेहमी अंगठीतच घालावा, असे
सांगितले जाते. कारण इतर इंद्रियांच्या तुलनेत आपला नेहमी सूर्याच्या
संपर्कात येतो. कधी झाकला जात नाही. त्यामुळे
कोणताही खडा अंगठीत घालण्याचा सल्ला दिला जातो. खडयांचा उपयोग
हा धारण केल्यानंतर त्याचा परिणाम हा 1 ते 2 वर्ष एवढाच राहतो. तसेच हा खडा हातात घातल्यानंतर काढायचा
नसतो. तसेच ज्या ग्रहासाठी आपण हा खडा घालणार आहे. त्याच्या वेळेनुसार, संबंधित ग्रहाचा मंत्र म्हटल्यानंतर
खडा घालता येतो.
ज्योतिषबाबत काहीही समज-गैरसमज असले तरी बहुतांश लोक भविष्य वाचतातच.काही लोक
टाईमपास म्हणूनही वाचतात. ज्योतिषशास्त्राला नावे ठेवणारी अनेक लोक मागच्या दाराने भविष्य जाणून घेण्यासाठी
ज्योतिषाकडे जातात. बऱयाच
क्षेत्रातील मंडळी भविष्य जाणून घेतल्या शिवाय कामाला हात घालत नाही. ज्या कामात स्थैर्य नाही अशा सर्वच क्षेत्रातील लोक ज्योतिषशास्त्राचा आधार
घेतात. सेलिब्रेटी लोकांच्या ज्योतिषाबाबतच्या कहाण्या अधिक ऐकायला
मिळतात. याशिवाय सर्वात आधी जातात ते राजकारणी मंडळी.
निवडणूक ही त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. याकाळात
ज्योतिष सांगणार्यांना मोठा भाव येतो. मेहनतीवर विश्वास असलेली उद्योजक, चित्रपट
निर्मिती क्षेत्रातले लोकही करणारे
भविष्याचा आधार घेतात.
राशीवरून
भविष्याचा अंदाज पाहण्याची संख्या मोठी आहे. अलिकडे विविध
कार्ड पाहूनही भविष्य सांगितले जात असले तरी पारंपारिक राशीवरूनच्या भविष्य सांगण्याला
अधिक महत्त्व आहे. अभ्यासकांनुसार जन्मावेळी चंद्र ज्या राशीत
असतो ती आपली राशी समजली जाते. कोणत्याही ग्रहाला प्राप्त झालेली
राशी, स्थान म्हणजे घर किंवा भाव, नक्षत्र,
भावेशत्व, ग्रहाच वय, ग्रहावर
असलेली इतर ग्रहांची चांगली-वाईट दृष्टी व त्या विवक्षित ग्रहाचे
इतर ग्रहांशी होणारे शुभ-अशुभ योग हे सर्व पाहिल्या शिवाय कोणतेही
निदान करता येत नाही. कुंडलीतील प्रत्येक ग्रहाची तपासणी करून
वर्तवलेले भविष्यविषयक अंदाज सहसा चुकीचे येत नाहीत. जन्मवेळ
आणि जन्मस्थळी दिसलेली
ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे
जन्मकुंडली. जन्मकुंडली तयार करण्यासाठी जन्मवेळ, ठिकाण, दिनांक सारखे मुद्दे महत्त्वाचे असतात.
जन्माच्या वेळेवरून अचूक जन्मकुंडली बनविणे सोपे पडते. जन्मकुंडलीमध्ये मुख्य 9 ग्रह त्यांच्या स्थानानुसार
चौकटीत त्यांना स्थान दिलेले असते. तर त्या सोबत राशींची स्थाने
दिली जातात. या दोन्हींच्या 12 घरांमधील
भविष्यातील अंदाज आणि भुतकाळातील घटना भविष्यकार वर्तवू शकतो, असे ज्योतिष सांगतात.
ई-कचर्यामुळे आरोग्याला धोका

संगणक,त्याचे सुटे भाग,मोबाईल, केबल्स,प्रिंटर,सेल्स (बॅटर्या),की-बोर्ड,माऊस,हेडफोन,पेन्सिल सेल,चार्जर,
युज अँड थ्रो साहित्य,इलेक्ट्रॉनिक वस्तू या सगळ्या
वस्तूंचा ई-कचर्यात होतो. या वस्तू खराब झाल्या की, कुठेही बाहेर फेकून दिल्या
जातात. या वस्तू जाळल्यामुळे विषारी वायू बाहेर पडतो.
जनावरांसाठी हानीकारक आहेत. नाशिक,कोल्हापूर,पुण्यासारख्या शहरात रोज दहा ते पंधरा टन ई-कचरा तयार होतो.कोल्हापूर,सांगली,सोलापूरसारख्या शहरातही मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार
होतो.हा कचरा पर्यावरणाला मोठा हानीकारक आहे. त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावरही होतो,त्यामुळे हा
कचरा गोळा करण्यासाठी व त्याच्या विल्हेवाटीसाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
घरोघरी जाऊन अथवा शहरातल्या इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये जाऊन हा कचरा
गोळा करण्याची गरज आहे. कचर्याच्या विल्हेवाटीसाठी
प्लांट उभारण्याचीही आवश्यकता आहे.
Thursday, July 27, 2017
डॉ. कलामांचे चरित्र म्हणजे स्फूर्तीगाथा

वर्षाला 15 लाख लोक हिपॅटायटीसचे बळी
हिपॅटायटीस
ई व्हायरसद्वारे यकृताचा कर्करोग निर्माण करणारा गंभीर आजार आहे.
भारतात या आजाराने नवीन आरोग्य समस्या निर्माण केली असून, यामुळे दरवर्षी पंधरा लाख रुग्णांचा बळी जात आहे. संपूर्ण
जगात 12 व्यक्तीमधील एका व्यक्तीला ’हिपॅटायटीस-ब’ असल्याचे समोर आले आहे. सध्या
ही संख्या एचआयव्ही किंवा कर्करोगापेक्षाही अधिक आहे. परंतु यासंबंधी
जनजागृती कमी असून त्यामुळे जागृतीवर भर देण्याची आवश्यकता आहे. नियमित उपचाराने हा आजार बरा
होऊ शकतो, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
’हिपॅटायटीस’ म्हणजे यकृतावरील सूज होय. या सुजेला 5 व्हायरस कारणीभूत असतात. यातील ’हिपॅटायटीस बी’ या व्हायरसची लागण झालेले रुग्ण हे मोठ्या
प्रमाणात आढळून येतात. या आजारांवर लसीकरणाने संपूर्ण नियंत्रण
मिळू शकते. या रोगाची लक्षणे ही रुग्णांच्या लक्षात येत नाहीत.
यामुळे आपण या विषाणूने बाधित आहोत की नाही? हेच
कळत नाही. लागण झालेल्या रुग्णांमध्ये या विषाणूने हळूहळू यकृतावर
सूज निर्माण होते. नंतर त्यातील पेशी नष्ट होतात आणि यकृत टणक
होते. रुग्णाच्या लक्षात येईपर्यंत यकृतातील अर्ध्याअधिक पेशी
नष्ट होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यावर उपचार केला नाही
तर कालांतराने यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. यामुळे
या रोगाचे त्वरित निदान करुन उपचार करावे.
देशातील सर्वात संसर्गजन्य
भागात प्रामुख्याने रक्त तपासताना योग्य काळजी न घेतल्याने, असुरक्षित पद्धतीने केलेली शस्त्रक्रिया किंवा
डायलिसिस प्रक्रिया; तसेच नशेच्या औषधांच्या सेवनाच्या सुयांच्या
अयोग्य वापराने हा आजार संक्रमित होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीचा
टूथब्रश, गोंदण सुया, ब्लेड किंवा असुरक्षित
यौनसंबंधातून देखील याचा प्रसार होऊ शकतो.
हिपॅटायटीस ए आणि बी वर लसीकरण असले, तरी
हिपॅटायटीस सी टाळण्यासाठी अद्यापही लस उपलब्ध नाही. नवीन औषधांच्या
आगमनाने भारतात हा संसर्ग 90-95 टक्क्यांपर्यंत पूर्णपणे बरा
होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दीर्घकालीन
प्रभाव आणि अधिक खर्च यामुळे सी हा नेहमीच एक भयंकर आजार म्हणून ओळखला जातो.
यापूर्वी रुग्णांना एक वर्षाच्या महागड्या इंजेक्शनचा पर्याय उपलब्ध
होता. उपचारांमुळे मळमळ, गंभीर शरीरवेदना,
ताप आणि रक्त संख्या धोकादायक कमी करणारे साइड इफेक्ट्स होत होते.
त्यामुळे हा उपचार ठराविक लोकांपुरताच मर्यादित होता. भारतीय बाजारपेठेत नवीन औषधे येत असल्याने आता यावरील डब्ल्यूएचओ नुसार अंदाजे
15 लाख लोक हिपॅटायटीस सी-संबंधित यकृत रोगाने
दरवर्षी मरतात. तथापि, हा आजार लवकर लक्षात
आल्यास औषधोपचार 100 टक्के प्रभावी ठरतात. यासाठी नियमित स्क्रिनिंग करणे महत्त्वाचे असून, अशा
रुग्णांच्या कुटुंबीयांनी आपली तात्काळ तपासणी करून घ्यावी.
नवीन औषधांनी हिपॅटायटीस सी उपचारांमध्ये क्रांती घडवून आणली
आहे. आजची औषधे किमान साइड इफेक्ट्स असलेली असून, टॅबलेट स्वरूपात उपलब्ध आहेत. ती देखील जवळपास
100 टक्के प्रभावी आहेत. अगदी यकृतावर परिणाम झालेल्या
प्रकरणांमध्ये या औषधांचा जवळपास 75 टक्के परिणाम झालेला आढळतो.
फक्त 3-6 महिन्यांसाठी घ्याव्या लागणार्या या औषधांचा खर्च जवळपास पाऊण लाखा एवढा आहे.(28 जुलै जागतिक हिपॅटायटीस दिन)
Wednesday, July 26, 2017
राईट एज्युकेशनची गरज
तंत्रज्ञानाच्या
वाढत्या वापरामुले पुढील काही वर्षांत सध्याच्या नोकर्यांचे प्रमाण खूप कमी होणार आहे.
यामुळे कौशल्याधारित आणि भविष्याचा वेध घेत नवीन रोजगार मिळवून देणारे
शिक्षण आजच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे आहे. आता शिक्षणाच्या
हक्काकडून (राईट टू एज्युकेशन) योग्य शिक्षणाकडे
(राईट एज्युकेशन) जाण्याची नितांत गरज निर्माण
झाली आहे. शासनाने वेळीच पावले ओळखून अभ्यासक्रमात बदल करण्याची
आवश्यकता आहे. खरे तर आता शिक्षणाची व्याख्या बदलली आहे.
शिक्षण हेच भविष्य असले तरी तंत्रज्ञानामुळे समाजजीवनात होत असलेल्या
बदलांच्या अनुषंगाने शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. आपल्या
शिक्षणपद्धतीमध्ये अजूनही घोकंपट्टी होते आहे. आपले शिक्षण अजूनही
शिक्षक केंद्रीच आहे. ते विद्यार्थीकेंद्रीत व्हायला हवे आहे.
विद्यार्थ्यांना न्यानार्जनासाठी विचारप्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी,महिला, समाज आणि
राष्ट्रकेंद्रित विचार करून शिक्षण पद्धतीकडे पाहावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची आवश्यकता आहे.
त्याचबरोबर शिक्षकांसह समाजाच्या मानसिकतेतही बदल घडवावा लागणार आहे.
शिक्षण हक्कापासून आता आपल्याल योग्य शिक्षणाकडे वाटचाल करावी लागणार
आहे.

शिवाय शिक्षणाला
दैनंदिन जीवनाशी जोडण्याची गरज आहे. अनेकजण पदवी घेऊन बाहेर पडत आहेत.पण त्यांना
नोकर्या मिळत नाहीत. त्यासाठी अभ्यासक्रमात
आवश्यक बदल करून त्यात लवचिकतता आणावी लागेल. तसेच संशोधक,
विविध शाखांमधील संवाद वाढविण्याची गरज आहे.
सापाविषयीचे गैरसमज दूर करा
आज सकाळीच साप गारुड्याची एक महिला
एक टोपली घेऊन दारात आली. त्यात साप होता. नागाला दूध पाजा माय,पुण्य लागंल. असं काही बाही म्हणत दारात थांबली.तिच्या टोपलीतला साप
अगदी मरणाला टेकला होता. आता ती दोन-तीन
दिवस आपल्या टोपलीत ठेवून घरोघरी फिरणार होती आणि सापाला दूध, पैसे आणि स्वत:ला लुगडं,पातळ म्हणजे
साडी मागत फिरणार होती. साप काही दूध पिणार नव्हता.पण ते दूध तिच्या संसाराला उपयोगाला येणार होतं.सापाच्या
जिवावर तिचे तीन-चार दिवस घर चालणार होते. अलिकडेच जागतिक सर्पदिवस साजरा झाला. मात्र तो कुणी साजरा
केल्याचं ऐकलं नाही की वाचलं नाही. आता नागपंचमी आली आहे.
यादिवशी आपण त्याची पूजा करतो.त्याला दूध पाजतो.
इतर वेळी दिसला की,मात्र त्याला मारायला बघतो.
वास्तविक साप आपल्या शेतकर्याचा मित्र आहे.
त्याच्यामुळे निसर्ग संतुलन राहण्यास मदत होते. त्याला वाचवण्याची गरज आहे. घरात-दारात अथवा अन्य कुठला दिसला तर त्याला मारू नका. त्याला
जिवंत पकडून लांब रानात सोडत चला.खरे आपल्या देशात साप वाचवण्याची
मोहीम राबवण्याची गरज आहे.
आपण नागपंचमी सोडली
तर साप दिसला की, त्याला ठेचायचे,हा एकमेव एककलमी कार्यक्रम करतो.
आपण तो कोणत्या जातीचा,विषारी की बिनविषारी असला
विचारच करत नाही. त्याला यमसदनाला पाठवण्यासाठी सज्ज होतो.जतसारख्या ठिकाणी साप-गारुडी समाज आहे. शहरातले काही सुशिक्षित लोक साप दिसला की त्यांना बोलावून घेतात. ही मंडळी साप पकडून राना-वनात सोडतात. सर्पमित्रदेखील हेच काम करतात. सापाविषयी कळवळा असलेली
किंवा जागरूक माणसे याबाबत दक्ष असतात. मात्र सगळीकडेच असे होत
नाही. त्यामुळे सर्पाविषयी मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज
आहे. तो वाचला पाहिजे, यासाठी सर्व स्तरातून
प्रयत्न झाले पाहिजेत.
नाग आणि सर्पांविषयी
आपल्याकडे अनेक दंतकथा आहेत. ठिकठिकाणी नागाची मंदिरे आहेत. दरवर्षी नागपंचमीला त्याची
पूजा केली जाते. यादिवशी अगदी भक्तीभावाने महिला भाऊराया म्हणून
त्याची पूजा करतात. त्याला हळद-कुंकू वाहतात.दूध पाजतात. पण याच गोष्टी त्याच्यासाठी जीवघेण्या ठरतात.
कारण आजकाल हळद-कुंकू तयार करताना त्यात केमिकलचा
वापर करतात. त्याचा त्रास नागाला किंवा सापाला होतो. मानवी शरीरालादेखेल मोठे घातक आहे. हळद-कुंकू लावलेल्या ठिकाणी खाज सुटणे, जखम होणे असे प्रकार
आपण ऐकले आहेत,पाहिले आहेत. त्यामुळे सापाच्या
नाका-तोंडात हळद-कुंकू गेल्यास त्याला ते
बाधते. नाग दूध पित असला तरी त्याला ते पचत नाही.त्याच्या शरीरात ऊधाच्या गाठी होतात आणि तो पंधरा दिवसात मृत्यू पावतो,
असे आपले सर्पमित्र सांगतात.
सांगली जिल्ह्यातल्या
बत्तीस शिराळ्यात जिवंत सापांचा खेळ खेळला जातो. मात्र अलिकडे न्यायालयाने या खेळाला आणि जिंवत नागाची पूजा करण्यास
बंदी घातली आहे. सध्या यावर बरीच चर्चा आहे. पण प्रशासन आपल्या मतावर ठाम असल्याने बत्तीस शिराळ्याला नागपंचमीला होणारी
गर्दी कमी होऊ लागली आहे. नाही तर यादिवशी सापाचा खेळ आणि त्याची
पूजा करायला शिराळ्यात प्रचंड गर्दी असायची.पण काही मंडळे असा
खेळ करण्यासाठी पंचमीच्या अगोदर पंधरा दिवस साप पकडण्याची मोहिम सुरू करतात.
त्यामुळे सापांचे हाल थांबलेले नाहीत.
जगभरात जवळपास 3 हजार 400 च्यावर सापाच्या विविध जाती आहेत. आपल्या भारतातदेखील
300 ते 400 सापाच्या जाती आढळतात. मात्र यातले फारच थोडे साप विषारी असतात अन्य बाकी साप सगळे बिनविषारी असतात.
परंतु, आपल्यातील माणसे पुढचा-मागचा विचार न करतातच. त्याला दिसताच ठेचून टाकतात.साप चावला तर अघोरी उपचार करून घेतो किंवा दवाखाना गाठतो. बिनविषारी साप असला तर त्याचा फारसा त्रास होत नाही.मात्र
विषप्रतिबंधक लस टोचण्याचा डॉक्टरांना आग्रह करतो. परंतु,
चावा घेतलेला साप बिनविषारी असेल अ प्रतिबंधक लसीचा आपल्या शरिराला धोका
निर्माण होतो. त्याची रिअॅक्शन होऊन त्याचा
त्रास व्हायला लागतो. दंश करणारा साप बिनविषारी असेल तर त्याच्या
चाव्याने शरिरावर रक्त बाहेर येते. मात्र तो साप विषारी असल्यास
शरीरावर दोन काळे टिपके दिसू लागतात. तो भाग सुजू लागतो.
त्यामुळे तात्काळ उपचार घ्यावेत. आज नागपंचमी आहे.
त्याची पूजा करा. मात्र त्याला वर्षभरात कधी दिसला
तर मारायला जाऊ नका. त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करा.
समज-गैरसनज दूर करून सापांविषयी वस्तुनिष्ठ माहिती
समजून घ्या आणि त्याला वाचण्यासाठी प्रयत्न करीत राहा. त्याची
राखण केल्यासच खर्या अर्थाने त्याची पूजा केल्यासारखे होईल.
पर्यावरण वाचवायचे असेल तर साप वाचला पाहिजे. प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याने
आपण सापाला मारणार नाही, अशी शपथ या नागपंचमीच्या निमित्ताने
घ्या.
Sunday, July 23, 2017
स्वत:चं भविष्य स्वत: लिहा आणि यशस्वी व्हा

ज्योतीचा जन्म
वारंगल या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच तिच्या आईचे देहावसान झाले. आईविना
पोरके पोर तिचे काय होणार? पण तिच्या घरच्यानी तिला अनाथालयात
सोडले. कारण तिने आपले शिक्षण पूर्ण करावे. ती दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पण गरिबीमुळे तिला शिक्षण अर्ध्यावरच सोडून द्यावे लागले आणि शेतात कामाला
जावे लागले. दहावी झाल्यावर अवघी 16 वर्षांची
असतानाच तिला बोहल्यावर चढावे लागले.मात्र तिचा नवरा हा तिच्यापेक्षा
कितीतरी वयाने मोठा होता. लग्न झाल्यावर अवघ्या दोन वर्षात म्हणजे
ती 18 वर्षाची होईपर्यंत दोन मुलांची आई बनली. राबराबूनही घरगाडा चालवणे मुश्किल झाले. या सततच्या आर्थिक
तंगीमुळे घरात वारंवार खटके उडायला लागले. वाद व्हायला लागले.
मात्र ती हताश झाली नाही. तिने शिकायचं ठरवलं. तिने निश्चय
केला की, आपल्या मुलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करायचा.त्यांना शिकवायचे. चांगला माणूस घडवायचे.ती शेतात राबतच शिकत राहिली.
पहिल्यांदा ती
बीए पास झाली. नंतर पोस्ट
ग्रॅज्युएट डिग्री मिळवली. या दरम्यान तिने कॉम्प्युटर कोर्स
जॉइन केला. यानंतर ती 2000 मध्ये आपले भविष्य बनवायला युएएसला गेली. तिथे तिने पडेल ती कामे केली. गॅस स्टेशनमध्ये,
बेबी सिटर म्हणून तर कुठे व्हिडिओ शॉपमध्ये कामे केली. याच दरम्यान तिने आपल्या कंपनीची सुरुवात केली. आपल्या कष्टाच्या,जिद्दीच्या, विश्वासाच्या जोरावर
आणि काही तरी करून दाखवण्याच्या इच्छेमुळे रात्रंदिवस काम करून आपली कंपनी नावारुपाला आणली. मग काय तिने मागे वळून पाहिलेच नाही. ती सतत काम करत
राहिली. आज तिची देशात, जगात आपली अशी वेगळी
ओळख आहे.
श्रीमंत असूनही पैशाचा करतात सदुपयोग
आपल्यातले बरेच
लोक विचार करतात की, श्रीमंत बनल्यावर माणसे पैसा पाण्यासारखा खर्च करतात. वाट्टेल तशी चैनी करतात.कसंही वागतात. पण तसं नसतं. जगातले सगळ्यात श्रीमंत लोकदेखील अगदी विचार
करून पैसा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या अशा चांगल्या सवयी
आपणदेखील अंगी बाणगायला हव्यात. यातून आपणदेखील काही तरी घ्यायला
हवे.
1.ते साध्या घरात राहतात आणि सामान्य कार चालवतात
बहुतांश सुपर-रिच माणसे पैशाचे प्रदर्शन करत नाहीत.
आपल्याला लागेल तेवढेच खर्च करतात. साध्या घरात
राहतात. सामान्य कार चालवतात. इकॉनॉमी क्लासमधून
उड्डाण करतात. ऑरेन बफेट आणि ऑर्लोस स्लिम किती तरी वर्षांपासून
जुन्या घरात राहतात. अजीम प्रेमजी फोन एस्कॉर्ट गाडी चालवतात.

2. ते कपडे,चपला आणि खाण्या-पिण्यावर
खर्च कमी करतात
नेहमी स्मार्ट
श्रीमंत लोक डिझाइनर कपडे, ब्रांडेड चपला-बूट आणि अक्सेसरीज खरेदी करण्यापासून दूर
राहतात. ते अशा गोष्टींवर अधिक खर्च करतात, ज्या गोष्टी भविष्यात श्रीमंतीपणा कायम राखण्यासाठी सहाय्यभूत ठरतात.
ते श्रीमंतीचा देखावा करत नाहीत.रजनीकांत ऑफ स्क्रीन
साधा धोती-कुर्ता नेसतात.
यातून आपणही काही
गोष्टी शिकायला हव्यात. कपड्यांवर 3 ते 5 टक्क्यांपर्यंत
खर्च करावेत. सुट्ट्यांवरदेखील 5 टक्के
आणि खाण्या-पिण्यावर 15 टक्के खर्च करावेत.
अशा एसेट्समध्ये गुंतवणूक करावी, ज्यामुळे तुमच्या
संपत्तीमध्ये वाढ व्हावी.संपत्तीचे मूल्य घटवणार्या वस्तू जशा की कपडे,वाहने आदींमध्ये गुंतवणूक करण्यापासून
स्वत:ला वाचवा. जीवनात दिखाऊपणा करण्यापासून
स्वत:ला दूर सारा. लक्ष्याप्रति समर्पित
राहण्याचा प्रयत्न करा.
3. ते बचत पहिल्यांदा करतात, मग खर्च करतात
तुम्हाला ज्या
वस्तूंची गरज नाही, त्या वस्तू तुम्ही खरेदी करत असाल तर मग तुम्हाला लवकरच अशा वस्तू विकाव्या
लागतील की, ज्यांची तुम्हाला खरोखरच खरी गरज आहे. जर तुमचे उत्पन्न कमी असतानाही बचतीची सवय असेल तर तुमचं सुरक्षित भविष्य बनू
शकतं.
यातून आपल्याला
बचतीची शिकवण मिळते. इमरजन्सीसाठी सहा महिन्याचा मासिक खर्च बचत करायला शिकले पाहिजे. आपल्या गुंतवणुकीचे प्लॅनिंग करायला हवे. दर महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात बँक अकाउंटमधून एसआयपीसाठी रक्कम काढली जायला हवी.ते निश्चित करा.बचतीची सवय विकसित
झाल्याने तुमचे भविष्य सुरक्षित राहू शकते.
4. ते अधिक कॅश जवळ ठेवत नाहीत, क्रेडिट कार्डचा वापर करतात
अमेरिक्तील ऑईलकिंग
टी.बून पिकेन्स यांचा असा सल्ला आहे
की, तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, तेवढ्यासाठी कॅश कॅरी करा. बहुतांश श्रीमंत माणसे अधिक
कॅश स्वत:जवळ ठेवत नाहीत. त्यापेक्षा ते
क्रेडिट कार्डचा अधिक वापर करतात. ते क्रेडिट कार्डचा वापर फारच
संयमाने करतात.
यातून आपण क्रेडिट
कार्डचा नेहमी वापर करायला शिकले पाहिजे.यामुळे तुम्ही खर्चावर चांगल्याप्रकारे लक्ष ठेऊ शकता. यामुळे रिवार्डस आणि बेनिफिट्सच्या रुपाने फ्री मनी मिळून जातात.यामुळे चोरांपासून चांगली सुरक्षा मिळू शकते. अधिक रोखड
बाळगणे योग्य नव्हे.त्यापासून धोके आहेत.
5. ते डिस्काउंट शोधतात आणि किंमती कमी करून घेतात
श्रीमंत माणसे
पैशाचा योग्य वापर करतात. ते डिस्काउंट सेल,कूपन्स,रिवार्ड
आणि लॉयल्टी प्वॉइंट्सच्या मदतीने पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. थोड्या थोड्या डिस्काउंटसमुळे वेळोवेळी बरीच बचत होऊन जाते.यूएस स्टार क्रिस्टन बेल असतील किंवा अजीम प्रेमजी, ते
आपल्या एम्प्लॉइजना ऑफिसची लाईटस बंद करायला सांगतात.
यातून आपण लाईट,फोन बील किंवा अन्य बिले भरताना
किंवा रेल्वे,विमान तिकिट बूक करताना पेटीएमसारख्या मोबाईल अॅप्सचा वापर करायला शिकले पाहिजे.कारण या गोष्टी कॅशबॅक
व डिस्काउंट ऑफर करतात. प्रवासाच्या दरम्यान डिस्काउंट मिळवण्यासाठी
nearbuy.com सारख्या डिस्काउंट साईट्स उपयोगात आणायला हव्यात.
6. ते क्वॉलिटीवर अधिक लक्ष देतात
श्रीमंत लोक वस्तू
स्वस्त आहेत, म्हणून त्या
खरेदी करत नाहीत, तर ते त्याची क्वॉलिटी पाहतात. ते चांगल्या क्वॉलिटीच्या वस्तू विकत घेतात, कारण यामुळे
प्रोडक्ट अधिक काळ टिकतात. स्वस्त होम अप्लायंस खरेदी करत असाल
तर तुम्हाला मेंटेनन्स व रिपेयर्सवर अधिक खर्च करावे लागेल.
ज्या ज्या वेळेला
तुम्ही एखादी वस्तू खरेदी कराल, त्या त्या वेळेला त्याचा उपयोग आणि किंमत यादरम्यान तुलना करा. जर तुम्ही एखादी वस्तू एक-दोन वेळाच वापरणार असाल तर
अशी वस्तू खरेदी करू नका.
7. ते चॅरिटी करायला पसंदी देतात
प्रेमजी, शिव नडार आणि बिल गेट्स सारख्या
अनेक व्यक्ती आपल्या उत्पन्नातला मोठा हिस्सा चॅरिटीमध्ये दान करतात. श्रीमंत व्यक्तींना माहित आहे की, दान केल्याने त्यांच्या
संपत्तीत मोठ्या वेगाने वाढ होते.त्यामुळे अशी माणसे जास्तीत
जास्त संपत्ती दान करण्यावर विश्वास ठेवतात.
दान करण्यावर पूर्ण
विश्वास ठेवा, पण आपले भविष्यदेखील सुरक्षित करा. ज्या ज्या वेळेला
तुम्ही चॅरिटीजना डोनेट करता, त्या त्या वेळेला सेक्शन
80 जीअंतर्गत आयकरमध्ये सूट घ्यायला विसरू नका.
वॉरेन बफेट, बर्कशायर हॅथवेचे
सीईओ आहेत.यांची एकूण संपत्ती
75.6 अब्ज डॉलर इतकी आहे. मात्र ते आजही सामान्य
घरातच राहतात, जे त्यांनी 1958 मध्ये
31 हजार 500 डॉलरला विकत घेतले होते. लग्जरी कार,कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर खर्च करत नाहीत.
एन.आर. नारायण
मूर्ती हे इन्फोसिसचे
सह-संस्थापक आहेत. यांची एकूण संपत्ती 1.8 अब्ज डॉलर इतकी आहे. मात्र आजही ते सामान्य जीवन जगतात. कपडे, खाण्या-पिण्यावर व वाहनांवर अधिक खर्च करत नाहीत.
आजदेखील बंगळुरूमध्ये सामान्य घरात राहतात.

कार्लोस स्लिम
हेलू ( मॅक्सिकन
बिझनेस टायकून) यांची एकूण संपत्ती 54.5 अब्ज डॉलर आहे. 40 वर्षांपासून एकाच घरात राहतात.
लग्जरी कार, कॉम्प्युटर यांचा छंद नाही.
घरचं जेवण आवडतं.
रजनीकांत या फिल्मस्टारची संपत्ती 50 लाख डॉलर आहे.डिझायनर कपड्यांचा छंद नाही. सामान्य जीवन जगतात.लग्जरी गाड्या त्यांच्याकडे नाहीत. होंडा सिविक,
शेवरलेट तवेरा किंवा टोयोटा इनोवा वापरात आणतात.

अजीम प्रेमजी विप्रोचे अध्यक्ष आहेत. यांची संपत्ती 14.9 अब्ज डॉलर आहे. इकॉनॉमी क्लासमधून उड्डान करतात.
महागड्या हॉटेलमध्ये राहत नाहीत. फोर्ड एस्कॉर्ट
आणि टोयोटो कोरोला चालवतात. यांना याहीपेक्षा पायी चालायला किंवा
रिक्षातून प्रवास करायला आवडतं.
Friday, July 21, 2017
कृषी शिक्षणाची अवस्था चिंताजनक
भारतीय कृषी संशोधन
परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या पहिल्या 25 दर्जेदार कृषी विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील चारपैकी
एकाही कृषी विद्यापीठाने स्थान मिळवलेले नाही, त्यामुळे आपल्या
महाराष्ट्रातील कृषी शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि संशोधनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी
राज्याला हे नक्कीच भूषणावह नाही.राज्य शासन याकडे साफ दुर्लक्ष
करत असल्याचेच यातून दिसत आहे. राज्यातल्या शेतकर्यांना कर्जमाफी देऊन त्यांना काही प्रमाणात दिलासा देणार्या सरकारने कृषी विद्यापीठांमधील प्रश्नांकडे लक्ष देऊन
त्याची गुणवत्ता वाढवताना त्याचा थेट शेतकर्याला कसा लाभ होईल,
यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
राज्यातील कृषी
विद्यापीठांचे मानांकन घसरल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यात डॉ.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ(दापोली),वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ(परभणी),डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ( अकोला), आणि एकेकाळी दर्जेदार विद्यापीठांमध्ये समावेश
असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) या चारही विद्यापीठांचा दर्जा हा 30 क्रमांकांच्या पुढेच
आहे.भारतीय कृषी संशोधन परिषदेने राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांची
अधिस्वीकृती स्थगित केली आहे. अधिस्वीकृती नाकारणे म्हणजेच आपल्या
विद्यापीठांतील कामकाजांचा दर्जा दाखवण्यासारखाच आहे. जाणकारांच्या
म्हणण्यानुसार विद्यापीठांमध्ये वर्षानुवर्षे जागा रिक्त ठेवणे आणि खासगी कृषी महाविद्यालयांची
संख्या प्रमाणापेक्षा जास्त ठेवल्यामुळेच आपल्या कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती नाकारली
गेल्याची नामुष्की ओढवली आहे.यामुळे त्यांना दर्जेदार विद्यापीठांच्या
क्रमवारीच्या यादीत स्थान मिळालेले नाही.
कृषी विद्यापीठांच्या
कामगिरीच्या असमाधानकारकाला प्रत्यक्षपणे राज्य शासनच जबाबदार आहे, असे म्हटले पाहिजे.वास्तविक शासनाने कृषी शिक्षण व संशोधनाला जितके प्राधान्य द्यायला हवे ते
दिलेले नाही. शिवाय इथे राजकीय हेतूने कुलगुरू आणि कृषी शिक्षण
परिषद उपाध्यक्षांच्या बदल्या होतात, त्याचबरोबर भरतीमध्ये गुणवत्ता
नाकारली जाते, असा आरोप होत आहे. कुलगुरू
जर शिस्तीने वागू लागला तर त्यातही कोलदांडा घातला जातो, असाही
आरोप होत असल्याने त्यामुळे कसा दर्जा वाढणार आहे. कृषी शिक्षणाची
आवस्था चिंताजनक असून राज्य शासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
चिनी राखीला करा बाय बाय
बहीण भावाच्या पवित्र बंधनाच्या
धाग्याला देशसेवेचा अधिक स्पर्श राहावा,यासाठी
यंदा चिनी बनावटीच्या राखीला बाय बाय करा. व्यापारी बांधवांनी या राख्या आपल्या
दुकानात विक्रीसाठी ठेवू नये. अलिकडे दिवसेंदिवस चीनच्या कुरापती वाढल्या आहेत.
आशिया खंडात आपण बलवान आहोत, या गुर्मित चीन वागत
आहे.त्यालादेखील महासत्ता व्हायचे आहे, मात्र त्यांची रीत
धाकदपटशा, दहशत यावर अवलंबून आहे. मात्र अशा मुजोरपणावर
कुणाला जिंकता येत नाही. भारतानेही त्याच्या गुरगुरण्याला भीक घालू नये.
सिक्कीममध्ये बेकायदेशीर घुसखोरी करून प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न चालला आहे,
तो भारताने हाणून पाडायला हवा.करारानुसार इतर देशांना भारताने
संरक्षण देण्यात कुचराई करू नये. भारतीय सेना सडेतोडपणे उत्तर द्यायला सज्ज आहे.
आपण भारतीय म्हणून सैनिक व देशाच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. ही
कर्तव्य भावना समोर ठेवून चीनला धूळ चारण्यासाठी आपणही चिनी बनावटीच्या वस्तूंवर
बहिष्कार घालायला हवा. कोणतीही चायनीज वस्तू खरेदी न करण्याचा निर्धार करायला
हवा.
लवकरच रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण येतो आहे. या उत्सवात
प्रत्येकाने देशी धागा खरेदी करावा. बहीण भावाच्या स्नेहाचा पवित्र उत्सव देशी
धागा वापरून अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करावा. व्यापारी बांधवांनीही याला
मोलाची साथ द्यायला हवी. महत्त्वाचे म्हणजे चिनी बनावटीची राखी दिसायला सुंदर व
आकर्षक दिसते. परंतु, चीनमधून आलेला कच्चा माल व त्यावर
रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर सूत,धागे,कागद व पॉलिथीनचा वापर राखीसाठी केला जातो. शरीराला या वस्तू
अपायकारक आहेत. मळमळणे, ओकारी येणे, ताप
येणे आदी विविध आजार गतवर्षी लहान मुलांना राखी बांधल्यानंतर झाले असल्याच्या घटना
वृत्तपत्रातून वाचण्यात आल्या होत्या. त्यांची बोटे तोंडात गेल्यामुळे असे प्रकार
घडले होते. त्यामुळे ही चायनीज बनावट राखी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. येत्या
रक्षाबंधन सणाला देश माझा, मी देशाचा, हे
भान ठेवून प्रत्येक भारतीयांनी चिनी बनावटीच्या राख्या खरेदी करू नयेत. व्यापारी
बांधवांनीही अशा राख्या दुकानात विक्रीसाठी ठेवू नये.
हवामान यंत्रणा गावकेंद्रीत हवी
अलिकडे हवामान खात्याकडून शेतकर्यांसह
सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. हवामान अंदाज अचूक यावा, ही अपेक्षा तशी रास्तच आहे. मात्र हवामान खात्याकडून जो अंदाज दिला जातो,
त्याविषयी थोडे आकलन होण्याची आवश्यकता आहे. लोकांना या अंदाजाबद्दल
समज आणि थोडे स्पष्टीकरण देणेसुद्धा गरजेचे आहे. याचा अर्थ हवामान अंदाजाबाबत
जागृती वाढवणे आवश्यक आहे. म्हणजे अंदाजावर सारासार विचार करून शेतकरी वर्ग
शेतीविषयी निर्णय घेतील. मात्र अंदाज अचूक येण्याच्यादृष्टीने राज्यासह देशभरातील
निरीक्षण केंद्रे आणि रडार यांची संख्या वाढवण्याचीही गरज आहे. त्याशिवाय अंदाज
अचूकतेकडे जाणार नाही.

जून महिन्यात वेळेवर पाऊस
झाल्याने पेरण्या चांगल्या झाल्या. विदर्भ सोडला तर सर्वत्र पाऊस झाला. जूनच्या
शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊसमान कमी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कृषी हवामान खात्याच्या
साहाय्याने दर आठवड्याला अंदाज जिल्हावार व स्थानिक भाषेत दिला जातो. त्यात
पिकांपासून जनावरांच्या व्यवस्थापनापर्यंतची माहिती असते. मात्र ती हवामान तज्ज्ञांनुसार
देशभरातील केवळ 33 लाख शेतकर्यांपर्यंतच पोहचते. हवामान
खात्याच्या वेबसाईटवर शेतकर्यांना त्यांची नोंद करता येते. पण ते अजूनही फारसे
त्यांच्यापर्यंत पोहचले नाही. हवामान खाते आणि शेतकरी यांच्यातील अंतर कमी
करण्याची आवश्यकता आहे. एकाच जिल्ह्यात अतिपावसाचा व कमी पावसाचा प्रदेश असतो.
त्यामुळे अनेकदा या अंदाजाचा पुरेसा उपयोग होत नाही. शेतकर्यांसाठी तालुका
पातळीवर अंदाज कसा देता येईल, गावपातळीवर कशी माहिती मिळेल,
ही लोकांची अपेक्षा आहे. सध्या तरी हवामान विभागाला असा अंदाज
देण्यासाठी मर्यादा आहेत. ते जिल्हा पातळीपर्यंत अंदाज देऊ शकतात.
गावपातळी व तालुका
पातळीपर्यंतचा अंदाज देण्यासाठी नव्याने काही यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.
किमान प्रत्येक 100 ते 150
किलोमीटरवर रडार उभारण्याची गरज आहे. शिवाय तालुका पातळीवर जास्तीत जास्त
स्वयंचलित निरीक्षक केंद्रे उभारावी लागतील.या केंद्रांमधून जो डेटा मिळेल,
त्यानंतरच हवामान खाते अधिक अचूक आणि शेतकर्यांना हवा तसा अचूक
अंदाज व्यक्त करू शकेल. वास्तविक निसर्गाचे सर्वच चक्र अजून मानवाला समजलेले नाही.
परदेशातदेखील हवामान खात्यांचे अंदाज अनेकदा चुकत असतात. हवामान तज्ज्ञांच्यामतानुसार
जेव्हा कमीदाबाचे क्षेत्र नसते, तेव्हा ढगांची निर्मिती
कोठेही होऊ शकते आणि तुरळक ठिकाणी पाऊसही पडू शकतो. जेव्हा मान्सून वीक असतो,
तेव्हा अंदाज चुकतो. आपल्याकडे शास्त्रज्ञांची कमतरता नाही. जगाच्या
बरोबरीने आपले शास्त्रज्ञ काम करत आहेत. त्यांच्या तोडीला तोड आपले शास्त्रज्ञ
आहेत. मात्र आपल्याला कमतरता भासते आहे ती साधनांची! ही साधने जितकी गाव केंद्रीत
होतील,तितकी आपले शास्त्रज्ञ ती गावपातळीपर्यंतचे अचूक
हवामान अंदाज देतील. मात्र हवामान यंत्रणेमुळे बराच फायदा होत आला आहे. कारण
पूर्वी चक्रीवादळात लाखो माणसांचा मृत्यू होत असे. आता पूर्व किनार्यावर रडारची
मालिका बसवल्यामुळे चक्री वादळाचा अंदाज मिळतो व त्यामुळे लाखो लोकांचे प्राण आणि
आर्थिक हानी यापासून सुटका मिळत आहे. केंद्र सरकारने शेतकर्यांच्या जीवनाकडे लक्ष
देतानाच हवामान अंदाज कसा अचूक येईल,यासाठी ज्या साधनांची
जिथे जिथे गरज आहे, तिथे तिथे ती बसवण्यासाठी तत्परतेने पाऊल
उचलण्याची गरज आहे.
Thursday, July 20, 2017
Tuesday, July 18, 2017
निसर्गाशी मैत्री साधा
महाराष्ट्र सरकारने यंदा 4 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला. शासकीय पातळीवर त्याचे
नेटके नियोजन झाले आणि अगदी ग्रामस्तरापर्यंत झाडे लावण्याचा कार्यक्रम झकास पार
पडला. ही कौतुकाची बाब झाली पण ही झाडे लावली गेली,त्यांच्या
संगोपनाबाबत मात्र नियोजन झाले नाही. सध्या मान्सून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे
रानोमाली जी झाडे लावण्यात आली ती वाढण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. शिवाय
बेवारस झाडांकडे पाहायलाही कुणाला वेळ नाही, त्यामुळे ही
झाडे मरून जाणार आहेत. शासकीय पातळीवर त्यांच्या जगण्याविषयी काही तरी उपाययोजना
व्हायला हवी आहे. टँकरने पाणी घालून ती झाडे जगवायला हवी आहेत. यासाठी आर्थिक
तरतूद करून प्रशासन कामाला लावण्याची गरज आहे. नाही तर मग येरे माझ्या मागल्या...
प्रमाणे दरवर्षी झाडे लावायची आणि त्याचे आऊटपूट काही नाही, असा
कार्यक्रम यंदाही व्हायला नको. एकाच खड्ड्यात कितीदा वृक्षारोपण करण्यात आले आणि
त्याचे फोटोसेशन झाले, याला गिणतीच नाही. अशा खड्ड्यांनाच
आता लाज वाटत असावी, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासकीय
पातळीवर तर झाडे जगवण्याविषयी प्रयत्न व्हायला हवेच पण तुम्ही आम्हीदेखील वैयक्तिक
लक्ष देऊन ही झाडे जोपासली पाहिजेत. आपण ज्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला
ती झाडे जगली का ते पाहायला हवे आणि ती जगली नसतील पुन्हा नव्याने रोप आणून लावावे
आणि त्याची काळजी घेतली जायला हवी.
धावपळीच्या आणि यंत्राच्या
चाकाप्रमाणे फिरणार्या आजच्या या विज्ञान युगात आपण अनेक जबाबदार्या पाठीशी घेऊन
काम करत आहे. आपण वृक्षारोपण दिनाशिवाय अन्य दिवशी त्याकडे पाहत नाही. आपले काम
आणि आपण एवढेच आपण समजतो. त्यामुळे पर्यावरणाकडे लक्ष जाणार तरी कसे? असा प्रशन आहे.निसर्गाशी प्रेम करणारी माणसे आज घड्याळाच्या
काठावर जगणार्या माणसांवर नाराज आहे. त्यांच मत असं की माणसाला निसर्गसौंदर्य
पाहायला वेळच नाही. तो निसर्गाशी मैत्री साधत नाही, निसर्गाशी
एकरुप होत नाही. निसर्गाशी एकरुप न झाल्याने नैसर्गिक विविधता, नाविन्य माणसाला उपभोगता येईल का? चैतन्य, प्रसन्नता यांचे सुख त्याला मिळेल का? असे त्यांना
वाटते. मात्र इतकाही माणूस निष्ठूर नाही. त्याला निसर्गाचे महत्त्व पटलेले आहे.
त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने काय होते, याची त्याला कल्पना
आली आहे. निसर्गावर प्रेम करणारा माणूस त्याचा लुप्त उठवण्यासाठी वर्षा सहल काढतो
आहे. त्याचा अनुभव घेतो आहे. त्यामुळे सरसकट माणसाला दोष देता येणार नाही. मात्र
त्याने निसर्गाची आणखी काळजी घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
आजच्या धावपळीच्या युगात
मानवाने निसर्गाकडे पाठ दाखवल्याने व पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे घातक
कृतीतून पर्यावरणाचा समतोल ढासळवला आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. दररोज अनेक
मार्गांनी होणार्या प्रदूषणाचा सभोवतालच्या निसर्गावर, पर्यावरणावर,
जनजीवनावर झालेला परिणाम फारच भयंकर आहे,याची
कल्पना यायला लागली आहे. निसर्गावर निष्ठा असणारी माणसं सांगतात, निसर्ग माणसाला चैतन्य देतो. आनंद, शांती, उत्साह व चैतन्य मिळविण्यासाठी माणसे निसर्गात रमतात. कंटाळा, दिवसभराचा शीण, आळस घालविण्यासाठी माणसे एखाद्या
बागेत जातात. तेथील झाडं, फुलं त्या फुलांवर भिरभिरणारी
फुलपाखरं, त्यांची रंगबिरंगी रुपे ते आपल्या नयनात टिपून
घेतात. मग त्यांना आनंद मिळतो तो निसर्गाशी एकरुप झाल्याचा. प्रसन्नता आणि शांती
लाभून त्यांचे मन उत्साही बनते.
वातावरण स्वच्छ, शांत ठेवायचे असेल आणि चैतन्य फुलवायचे असेल तर मग पर्याय एकच
’झाडे लावा, झाडे जगवा आणि चैतन्य फुलवा’.
माणसाला कळले आहे, निसर्गाला दुखावले की काय होते. मात्र तरीही काही माणसे
त्याकडे दुर्लक्ष देतात. जगाबरोबर काय होईल ते होईल, अशी
म्हणणारी माणसेही कमी नाहीत. मनुष्य आळशीदेखील आहे. झाडे तोडली पण नवी झाडे
लावली नाहीत. काही माणसे फक्त झाडाचे फळ चाखतात, पण झाडे
लावत नाहीत की त्यांना पाणी घालत नाहीत. अंगणात असलेले झाड त्यांच्या कामासाठी
पाहिजे असेल किंवा त्याची अडचण होत असेल तर ते झाड माणसे तोडतील पण दुसरे झाड
लावणार नाहीत. इंधन टंचाईत मनुष्याने मोठया प्रमाणावर जंगलतोड केली. पण नवी झाडे
लावली नाहीत. जंगल तोडीमुळे सृष्टीचे रुप बदलू लागले. हिरवाईचे प्रदेश ओसाड पडू
लागले. नवी झाडे न लावल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळले. प्रदूषणाची समस्या
निर्माण झाली. सृष्टीसौंदर्य हरपू लागले. शांतता व प्रसन्नता भंग पावली. मग जंगल
संपत्ती नष्ट होऊ लागल्याने जंगलतोडीविषयक कायदे केले गेले, वृक्षरोपणाचे
कार्यक्रम हाती घेण्यात आले.
निसर्गप्रेमी सांगतात, झाडाफुलांजवळ मनुष्याला जे मिळते ते त्याचे जीवन. म्हणजेच
त्याचा आनंद. मित्रांनो हिरव्यागार मखमलीवर पडून झाडांसंगे गप्पा मारुन
फुलपाखरांसमवेत बागडून पहा किती मौज आहे. हा सुखद अनुभव अनुभवा. निसर्गात रमा,
झाडे लावा त्यांची योग्य काळजी घ्या. झाडे जगवा, त्यामुळे सृष्टीला बहर येईल, सौंदर्य वाढेल आणि
शांतता लाभून तुमच्या जीवनात चैतन्य व नवा उत्साह फुलेल. सृष्टीसौंदर्यात
दंग झाल्याने माणसाला नवचैतन्य मिळते. माणूस जर आनंदी असेल, उत्साह
व चैतन्य त्याच्याकडे असेल तर तो खर्या अर्थाने जीवन जगेल. ज्याचा आनंद शुध्द,
त्याचे जीवन शुध्द. हा आनंद लाभणार या सृष्टीत, निसर्गाच्या सान्निध्यात, झाडाफुलांच्या सहवासात.
म्हणूनच ’झाडे लावा, झाडे जगवा आणि चैतन्य फुलवा’.
सृष्टीसौंदर्य वाढवा, झाडे लावून सृष्टीचे रुप हिरवेगार
ठेवा. हा निसर्गप्रेमींचा संदेश ऐकू या आणि त्यानुसार वागूया.
Subscribe to:
Posts (Atom)