Sunday, January 29, 2017

वाचनाकडून लेखनाकडे



     मला शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड होती. माझे माध्यमिक शिक्षण  विश्रामबाग(सांगली) येथील महाराष्ट्र रेसिडेन्शियल(एम. आर) हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या तिथल्याच होस्टेलमध्ये राहात होतो. हाताला जे गवसेल ते वाचत सुटायचो. शाळेजवळच पोलिस लाईन होती. तिच्या गेटवर कुपवाडकडे जाणार्या मार्गावर एक मोफत वाचनालय होते.म्हणजे एक लोखंडी खांब रोवलेला आणि त्यावर एक-दीड फुटाच्या चार पाईपा असायच्या.त्यात वर्तमानपत्रे ठेवली जायची. ती वाचायला सकाळी गर्दी असायची.तिथे मी रोज नेमाने वाचायला जायचो. तिथे वर्तमानपत्राची पाने सुटी व्हायची. एक एक पान एक एक वाचक घ्यायचा. त्यामुळे संपूर्ण पेपर वाचायसाठी प्रतिक्षा करावी लागायची.दुसरा वाचेपर्यंत थांबून राहावे लागायचे. गोष्टीची पुस्तकेही जशी मिळेल तशी वाचून काढायचो.

     जतला उन्हाळी-दिवाळी सुट्टीला आलो की, करमायचे नाही. कारण मित्र नसायचे. गल्लीतल्या मुलांमध्ये जायला बुजायचो. मग सरळ स्टँड गाठायचो. तिथे मौला गवंडी यांचा पेपर स्टॉल आहे. त्यांच्याकडून पेपर, मासिके विकत घ्यायचो.चांदोबा असायचा. तो घ्यायचा.मी सारखा सारखा तिथे वाचनाच्या ओढीने स्टॉलवर जायचो. त्यामुळे गवंडी यांच्याशी झालेल्या ओळखीने पेपर मोफत चाळायला मिळायचे. त्यांनीही कधी फुकट का वाचतोस म्हटले नाही.त्यांनी इतरांबरोबर मलाही पेपर वाचायला मुभा दिली होती. नंतर माझ्याच वयाचा बाळासाहेब पेटकर नगरहून आपल्या बहिणीकडे राहायला आला होता. त्यांची बहीण सुषमा अक्का पेपर स्टॉलला मदत करायच्या. त्या रिक्षाही चालवायच्या.बाळूमुळे मला अधिकच पुस्तके, मासिके वाचायला मिळायची.
     वर्तमानपत्रे, त्यातल्या बातम्या, रविवारच्या पुरवण्या वाचता-वाचता मलाही आपले नाव पेपरात छापून यावे, असे वाटायचे. पण ते कसं छापून आणायचं माहित नव्हतं. पण मी दहावीला असताना माझं नाव पेपरात छापून आलं. मला आश्चर्याचा धक्का तर बसलाच, पण आनंदही खूप झाला. ती बातमी होती, होस्टेलच्या छात्रपदाधिकार्यांच्या निवडीची! होस्टेलला मुलांना काही कामे नेमून दिली होती. होस्टेल प्रमुख,वाचनमंत्री, स्वयंपाकमंत्री,स्वच्छतामंत्री वैगेरे. माझी स्वच्छतामंत्री म्हणून निवड झाली होती. ती बातमी छापून आली होती. वर्तमानपत्रात त्यावेळेला पहिल्यांदा माझे नाव छापून आले होते.
     दरम्यान दहावी झाल्यानंतर डी.एड.ला मिरजेतल्या शेठ रतिलाल गोसलिया अध्यापक विद्यालयात प्रवेश मिळाला. तिथेही मी होस्टेललाच राहत होतो. तिथे माझी देशिंगच्या दयासागर बन्नेशी ओळख झाली. आम्ही दोघेही होस्टेलला होतो.तो कविता करायचा. त्याच्या कविता वर्तमानपत्रात छापून यायच्या.मग मलाही कविता करण्याचा छंद जडला.ते वयही तसं होतं. एकदा दोन-तीन कविता मिरजेच्या अतिरेकी या वर्तमानपत्राकडे छापायला पाठवून दिल्या. आणि काय आश्चर्य त्यातली एक कविता रविवारच्या पुरवणीत छापून आली. त्यावेळचा मला झालेला आनंद अवर्णणीय होता.मग कथा,कविता लिहिण्याचा सपाटाच सुरू झाला. डी.एड.ला असताना एक कथाही लिहिली. तीदेखील दैनिक अतिरेकीमध्ये छापून आली. अतिरेकी दर रविवारी दोन पानांची साहित्यिक पुरवणी काढायची. त्याचे संपादन कवी भीमराव धुळूबूळ करायचे. सांगली-मिरज परिसरातले नवोदित लेखक,कवी त्यात लिहायचे. तो पेपर घ्यायला दर रविवारी सकाळी मिरजेच्या रेल्वेस्टेशनला जायचो. मिरजेतून जनप्रवास आणि सांगलीतून प्रभात दर्शन,राष्ट्रशक्ती,नवसंदेश,केसरी, अग्रदूत ही दैनिके प्रसिद्ध व्हायची. मग मी या दैनिकांमध्येही लिहायला लागलो.जे मनात येईल त्या विषयांबरोबरच, कथा,कविता लिहिण्याचा प्रपंच सुरूच राहिला.ते सगळे छापून येऊ लागले.
     डी.एड.झाल्यावर 1992 ला पुन्हा जतला आलो. यावेळेला पहिले काम केले ते म्हणजे जतमधल्या नगर वाचनालयाचा सभासद झालो. वाचानलायात प्रचंड पुस्तके. काय वाचू आणि काय नाही, असे झाले. पण जे वाचू वाटायचे,ते वाचून काढायचा सपाटाच लावला. कुठले पुस्तक चांगले, कुठले नाही, असा प्रकार काही केला नाही.साहित्यातले सगळे प्रकार वाचत गेलो.( आजही वाचनालयाचा सभासद आहे. पण वाचन कमी झाले आहे.)

     शाळेय जीवनापासून वर्तमानपत्राशी माझी नाळ जोडली गेली होती.त्यामुळे वाचकांच्या सदरातदेखील लिहायला लागलो.जतमधल्या काही समस्या, प्रश्न मांडत गेलो. असे करत असताना मग मला बातमीदार व्हावसं वाटायला लागलं. कथा-कविता लिहित असल्याने जनप्रवासमधील काही लोकांशी माझी ओळख झाली होती. त्यामुळे जतमधून वार्ताहरचा अर्ज केला. त्यांनी होकार दिला आणि मी वार्ताहर झालो. जनप्रवासमध्ये अनिल काळे म्हणून त्यावेळेला उपसंपादक होते. त्यांनी मला प्रोत्साहन दिले.( आजही ते जनप्रवासमध्ये त्या पदावर कार्यरत आहेत)त्यामुळे जतमध्ये वार्तांकनाचे काम करू लागलो. लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळू लागली. या कालावधीत मी तत्कालिन आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या जत येथील राजर्षी शाहू महाराज आश्रमशाळेत शिक्षक पदावर रुजू झालो होतो.नोकरी करत करत वार्ताहरचे काम करत होतो.
या कालावधी इचलकरंजी येथून प्रसिद्ध होणारे मॅचेस्टर (सध्या महासत्ता या नावाने प्रसिद्ध होत आहे) फार्मात होते.या दैनिकाबरोबरच मध्यंतरी दैनिक केसरीतही काम केले. सध्या महासत्ताशीच जोडला गेलो आहे. पण वार्ताहर म्हणून काम करीत असताना कथा-कवितांच्या लेखनाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले.(यामुळे मी स्वत:चे खूप मोठे नुकसान करून घेतले आहे, असे माझे साहित्यिक मित्र म्हणतात आणि ते योग्यही आहे.) या कालावधीत लेखन मंदावले होते. कविता लिहिण्याचा तर नादच थांबला. बालकथा, कथा असा लेखन प्रपंच सुरू राहिला. पण त्यात वेग नव्हता. 1995 च्या दरम्यान लवकुमार मुळे,महादेव बुरुटे,मी, विजय नाईक आणि शेगावमधील काही मंडळींनी मराठी साहित्य सेवा मंच स्थापन करून ग्रामीण साहित्य संमेलन घ्यायला सुरुवात केली. आज ही संस्था मोठ्या नावारुपाला आली आहे. आनंद यादव,फं.मुं.शिंदे,विठ्ठल वाघ अशी बरीचशी मोठी साहित्यिक मंडळी अध्यक्ष म्हणून लाभली आहेत.या संस्थेचा काही वर्षे अध्यक्ष म्हणूनही मी काम केले आहे.
     याच दरम्यान मी आश्रमशाळेतील नोकरी सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झालो. हा प्रवास सुरू असतानाच  शिक्षक संघटनांमध्ये काही पदावर काम करू लागलो. ऑल जर्नालिस्ट अॅन्ड फ्रेंडस सर्कल या देशव्यापी आणि राज्यव्यापी या पत्रकारांच्या संघटनेचा राज्य सरचिटणीस म्हणूनही काही वर्षे काम केले आहे. 2013 आणि 14 या कालावधीत हसत जगावे आणि जंगल एक्सप्रेस ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विविध वर्तमानपत्रात विविध विषयांवर लेखन सुरूच आहे. बालकथा किशोर मासिकासह छावा,माझा छोटू या मुलांसाठीच्या मासिकांसह सकाळ,पुढारी,संचार,गावकरी,तरुण भारत या विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. होत आहेत. सप्टेंबर 2011 पासून माझा स्वतंत्र ब्लॉग सुरू केला. चित्रपट,राजकीय, सामाजिक, पर्यावरण,सांस्कृतिक, साहित्य अशा विविध अंगाने लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. 1995 च्या दरम्यान दैनिक केसरीत चित्रपटासाठी वाहिलेली विविधा नावाची पुरवणी सुरू होती. या कालावधी चित्रपट कोडे वर्ष-दीड चालवले. दैनिक अग्रदूतमध्ये शाळांच्या उपयोगासाठी वर्षभर दिनविशेष सदर लिहिले. पुढारीतील हसत जगावे या सदरासाठी तर सातत्याने लेखन केले. वृत्तपत्रांमध्ये विविध विषय हाताळले. मात्र बरेच लेख तत्कालिन प्रश्नांवर, विषयांवर लिहिले गेले असल्याने त्यांचे आजच्या घडील मूल्य शून्य आहे. मात्र काही विषय चिरकाल वाचावेसे असेही आहेत. अशा लेखांचा संग्रह करून प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. जीवनात काही गोष्टी अशाही घडल्या.त्यामुळे काही काळ लेखनाकडे दुर्लक्षही झाले.पण वाचकांचा पत्रव्यवहार या सदरांसाठी लेखन थांबले नाही. विविध वृत्तपत्रात या सदरासाठी लिहित होतो आणि आजही लिहितो आहे. इअचलकरंजीच्या वृत्तपत्र लेखक संघाने दोनवेळा माझा उत्कृष्ट वृत्तपत्रलेखक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. हा सन्मान माझ्यासाठी फार मोठा आहे. त्याच्याने या सदरासाठी कायमचा बांधला गेलो. आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार माझ्या अगदी जवळचा, अंतस्थ भिडणारा आहे.


     सध्या समाजासाठी झटणार्या अथवा मोठ्या कष्टातून वर आलेल्या लोकांवर लिहित आहेत. त्यांच्या कामातून, त्यांच्या कष्टातून इतरांना प्रेरणा मिळावी, असा माझा उद्देश आहे. जगासह भारतभर अशी माणसे विखुरली आहेत. त्यांच्या मुलाखतीतून त्यांचे जीवन चरित्र उलगडत जाते. त्यांच्या संकलनातून त्यांच्यावर लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे अशा बर्याच लोकांचे चरित्र मराठी भाषेत उपलब्ध नाही.त्याचा मराठी लोकांना उपयोग व्हावा, प्रेरणा मिळावी,हा माझ्या लेखनामागचा प्रामाणिक उद्देश आहे. माझ्या ब्लॉगवर आपणाला अशा व्यक्ती भेटत राहतील.

16 comments:

  1. छान, लिखान चालू ठेवा सर��

    ReplyDelete
  2. मच्छिंद्र ऐनापुरे यांना जीवन गौरव पुरस्कार
    जत,(प्रतिनिधी): जत येथील 'दैनिक महासत्ता'चे पत्रकार व शिक्षक यांना शैक्षणिक कार्याबद्दल माजी आमदार व शिक्षक नेते शिवाजीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.शनिवार दि. ३० एप्रिल रोजी सांगली येथे खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षते खाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कोल्हापूर) इंद्रजित देशमुख, जी.प. अध्यक्षा श्रीमती रेश्माक्का होर्तीकर, सांगलीचे महापौर हारून शिकलगार आदींच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार दिला जाणार आहे.
    सर्वांगिण गुणवत्ता विकास कार्यक्रम , स्वच्छ व सुंदर शाळा , वृक्षारोपण, शाळेची गुणवत्ता,सजावट आदी उपक्रमांमध्ये श्री. ऐनापुरे यांनी शाळा प्रगतीपथावर आणून क्रमांकात आणल्या. शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धांमध्ये भाग घेउन बक्षिस पटकावले आहे.याशिवाय विविध वृत्तपत्रातून विविध विषयांवर लेखन करीत आहेत. सदर लेखन सुरू आहे. मुलांसाठीही त्यांनी लेखन केले आहे. 'हसत जगावे', आणि 'जंगल एक्सप्रेस ' ही दोन पुस्तकेही त्यांची प्रसिद्ध आहेत.त्यांचे मच्छिंद्र ऐनापुरे या नावाने ब्लॉग लेखनदेखील सुरू आहे. त्यांना मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.28/4/2017

    ReplyDelete
  3. पत्रकार मच्छिंद्र ऐनापुरे यांना 'समाजरत्न' पुरस्कार
    जत,(प्रतिनिधी)-
    सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल जत येथील पत्रकार,बालसाहित्यिक,स्तंभलेखक आणि शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांना 'कास्ट्राइब कर्मचारी महासंघ सांगली जिल्हा' च्यावतीने 'समाजरत्न' पुरस्कार देऊन गौरवण्यात आला.
    सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या स्नेहमेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते. श्री. ऐनापुरे यांना मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, प्रसिद्ध अभिनेते विलास रकटे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, जि.प.सदस्या स्नेहलता जाधव आदी उपस्थित होते.
    श्री. ऐनापुरे शिक्षक असून विविध दैनिकात स्तंभ लेखन करीत असून लहान मुलांसाठीही लिहीत आहेत.याशिवाय आपल्या लेखनाच्या व कामाच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकीतून समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करतात. विविध विषयांवर पुष्कळ लेखन केले आहे. वृत्तपात्रातून विविध विषयांना वाचा फोडली आहे. हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
    29/4/2018

    ReplyDelete
  4. प्राथमिक शिक्षक,साहित्यिक, ब्लॉग लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टन राधिका मेनन यांच्यावर लिहिलेल्या शौर्यकथेचा आठवी इयत्तेच्या नव्या अभ्यासक्रमात बालभारती (मराठी) च्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात समावेश होणारे जत तालुक्यातील ते पहिले लेखक आहेत.
    मच्छिंद्र ऐनापुरे यांची जंगल एक्सप्रेस (बालकथासंग्रह) व हसत जगावे (विनोदी कथासंग्रह) पुस्तके प्रकाशित आहेत. याशिवाय महाराष्ट्रातल्या आघाडीच्या विविध वर्तमानपत्रातून ते विविध विषयांवर लेखन करीत आहेत. त्यांचा स्वतंत्र ब्लॉग असून यावर सुमारे 1200 हून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बालकथा किशोर,छावा,मुलांचे मासिक यांसह विविध दैनिकांच्या पुरवण्यांमध्येही प्रसिद्ध झाल्या आहेत.
    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षक बनलेले श्री. ऐनापुरे समाजाला दिशा देणारे लेखन सातत्याने करीत आहेत. जत तालुक्यातील मराठी साहित्य सेवा मंचचे ते संस्थापक सदस्य असून या माध्यमातून साहित्य संमेलने भरवणे व नवोदित लेखक, कवींना प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून घडत आहे. त्यांना यापूर्वी अनेक संस्थांचे साहित्यिक, समाजसेवा आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन व पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

    ReplyDelete
  5. काँग्रेस सेवादलातर्फे रविवारी पुरस्कार वितरण
    नवनाथ गोरे,मच्छिंद्र ऐनापुरे: साहित्यरत्न;राही सरनोबत:क्रीडाभूषण
    जत,(प्रतिनिधी)-
    सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाच्यावतीने माजी पंतप्रधान पंडित नेहरू आणि माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.18) सेवादल पुरस्कारांचे वितरण सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आले आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे आणि दैनिक महासत्ताचे पत्रकार आणि लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांना साहित्यरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
    जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले व प्रकाश जगताप यांनी माहिती देताना सांगितले की, यावर्षी पत्रकार मधुकर भावे, प्रतापशेठ साळुंखे,खानापूर (जीवनगौरव),श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,सांगली ( आदर्श संस्था), लठ्ठे एज्युकेशन सोसायटी,सांगली ( आदर्श शैक्षणिक संस्था), सांगली जिल्हा देवदासी संघटना ( आदर्श सामाजिक संघटना), डॉ. रवी जाधव ( आदर्श धन्वंतरी), गौतम पाटील( विशेष सत्कार), सर्जेराव गायकवाड, सांगली( कलाभूषण), प्रशांत जगताप,सांगली (कलारत्न), नवनाथ गोरे, मच्छिंद्र ऐनापुरे,(जत), विजय कोष्टी,कवठेमहांकाळ (साहित्यरत्न), हणमंत मोरे,पंढरपूर,खंडेराव हेरवाडे,शिरोळ(समाजभूषण), सुनील शेडबाळे,मालगाव व उमेश पाटील,घाटनांद्रे (समाजरत्न), सौ. आरती गुरव, हरिपूर ( आदर्श उद्योजक), डॉ. मल्लिकार्जून टोणपे,सांगली , श्रीकृष्ण मोहिते,सांगलीवाडी, डॉ. संतोष माने,पलूस( आदर्श शिक्षक), अॅड्. अशोक शेलार,सांगली( आदर्श विधीसेवा), संयोगीता पाटील केंब्रीज स्कूल,मिरज (आदर्श शाळा), राही सरनोबत, हणमंत जाधव, ( क्रीडाभूषण), अतुल फासे,विटा, रवींद्र पवार,विटा, गौरव जाधव,सांगली (क्रीडारत्न) पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
    अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांच्याहस्ते वितरण होईल. प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन, प्रभारी मंगलसिंह सोळंकी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सह प्रभारी शंकरगौडा पाटील, आमदार आनंदराव पाटील, सहसचिव संग्राम तावडे, प्रदेश सचिव प्रकाश सातपुते पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार मोहनराव कदम, विश्वजीत कदम, माजी मंत्री प्रतिक पाटील, विशाल पाटील, शैलजा पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.


    ReplyDelete
    Replies
    1. खुप छान,अभिनंदन आणि शुभेच्छा

      Delete
    2. मराठी पत्रकार परिषदेचा सुभाषदादा कुलकर्णी स्मूर्ती साहित्य गौरव पुरस्कार एकुंडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे,साहित्यिक आणि लेखक श्री.मच्छिंद्र ऐनापुरे सर यांना मिळल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा*🌹🌹🌹🌹🌹

      Delete
  6. *लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा गौरव*
    अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या जत तालुका शाखेच्यावतीने जत तालुक्यातील लेखक व शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा पत्रकार परिषदेचे विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख व तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते सुभाष दादा कुलकर्णी स्मृती साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
    यावेळी श्री.ऐनापुरे यांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्हही देण्यात आले. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, डॉ. रवींद्र अरळी, बसवराज पाटील,सुरेश शिंदे, संजय कांबळे आदी उपस्थित होते. श्री.ऐनापुरे यांनी आतापर्यंत आठ विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत शिवाय त्यांनी लिहिलेले व्यक्तिचित्र "धाडसी कॅप्टन : राधिका मेनन" याचा समावेश बालभारती मराठी आठवीच्या पाठयपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत विविध दैनिकांमध्ये दीड हजारांवर विविध लेख लिहिले आहेत.

    ReplyDelete
  7. छान वाचन प्रवास!

    ReplyDelete
  8. मच्छिंद्र ऐनापुरे यांना जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार प्रदान
    जत, (प्रतिनिधी)-
    जत तालुक्यातील एकुंडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
    श्री. ऐनापुरे यांना 2021-22 सालातील सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, सभापती प्रमोद शेंडगे, समाज कल्याण सभापती श्री. कनुजे, संजय पाटील, मंगल नामद, मनीषा पाटील,भगवान वाघमारे आदी उपस्थित होते.
    श्री.ऐनापुरे जत तालुक्यातील एकुंडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी सातत्याने मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.विशेषतः मुलांचे अक्षर लेखन सुधार प्रकल्प, पुस्तक वाचन आदींवर भर दिला आहे.श्री. ऐनापुरे स्वतः लेखक असून त्यांचे बालकथासंग्रह, व्यक्तिचित्रे यांसह आठ पुस्तके प्रकाशित आहेत.इयत्ता आठवीच्या बालभारती पुस्तकात 'धाडसी कॅप्टन राधिका मेनन' हे त्यांनी लिहिलेले व्यक्तिचित्र समाविष्ट आहे. त्यांचे ब्लॉगलेखनदेखील प्रसिद्ध आहे.

    ReplyDelete
  9. शिक्षक ते पाठ्यपुस्तक लेखक

    मनमिळाऊ ,उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित असलेले मच्छिंद्र ऐनापुरे यांचा शिक्षक ते पाठ्यपुस्तक लेखक असा प्रवास थक्क करणारा आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी डी.एड.पूर्ण करून जत तालुक्यातच शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांच्या विद्यार्थी सेवेची सुरुवात जून 1995 मध्ये उंटवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतून झाली. सुंदर अक्षरांची देणगी लाभलेल्या ऐनापुरे यांनी तिथल्या शाळेच्या भिंती बोलक्या करून टाकल्या. अभ्यासक्रमाबरोबरच मुलांना गोष्टींमध्ये रमवुन त्यांना अवांतर वाचनाची गोडी लावली. त्यांचा तिथल्या रोजच्या परिपाठाचा फलक लिहिण्याचा शिरस्ता होता. क्रीडास्पर्धा,वक्तृत्व,भाषण ,सांस्कृतिक स्पर्धांमध्ये आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये अगदी जिल्हा स्तरापर्यंत मुले त्यांच्या प्रयत्नाने चमकली. त्यांच्या तिथल्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत आदर्श ग्रामीण शाळा, स्वच्छ सुंदर शाळा यासह अनेक पुरस्कार पटकावले.लोकवर्गणीतून शाळेचे बाह्यरूप बदलून टाकले.
    जत शहरातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक 3 ही शाळादेखील त्यांनी 2009 मध्ये सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत स्पर्धेत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आणून पारितोषिक खेचून आणले. शाळा परिसरात जी हिरवीगार झाडं आहेत ती श्री. ऐनापुरे यांच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. मुलांचे अक्षर लेखन सुधारावे म्हणून त्यांनी जाईल त्या शाळेत अक्षर सुधार प्रकल्प राबवला आहे. शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धांमध्ये मुले चमकावीत यासाठी त्यांचे सतत प्रयत्न राहिले आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेतही त्यांनी आपला सहभाग नोंदवून पारितोषिके पटकावली आहेत. गेल्या पंचवीस-सव्वीस वर्षात त्यांची उंटवाडी,जत क्र.3, अमृतवाडी, लमाणतांडा (निगडी बुद्रुक) येथील शाळांमध्ये सेवा झाली आहे.सध्या ते एकुंडी येथील शाळेत पात्र पदवीधर म्हणून कार्यरत आहेत.
    एकीकडे शाळांमध्ये विद्यार्थी व शाळेची गुणवत्ता वाढवण्याचा ध्यास सुरू असताना त्यांनी बालकथा व समाज सुधारणासंबंधी विविध लेखनाचा छंदही जोपासला आहे. आतापर्यंत त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर आणखी तीन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. यात व्यक्तिचित्रे,बालकथा आणि हास्यकथा, संपादकीय लेख, प्रेरणादायी लेखसंग्रह यांचा समावेश आहे. त्याचबरोबर किशोर, मुलांचे मासिक, केसरी-छावा, दैनिक दिव्यमराठीमधील किड्स कॉर्नरमध्ये त्यांचे सातत्याने लिखाण सुरू आहे. जवळपास ते वीस-पंचवीस वर्षांपासून लिखाण सुरू आहे. गेल्या बारा वर्षांपासून ते ब्लॉग लेखन करीत आहेत. त्यात सुमारे दोन हजारांहून अधिक लेख वाचकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी लिहिलेले 'धाडसी कॅप्टन:राधिका मेनन' हे व्यक्तिचित्रण बालभारती आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेशीत असून गेल्या पाच वर्षांपासून हा पाठ मुलांना अभ्यासाला उपलब्ध आहे. पाठ्यपुस्तकात समावेशीत झालेले ते जत तालुक्यातील पहिले लेखक आहेत. त्यामुळे जत तालुक्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे. मराठी साहित्य सेवा मंचच्या माध्यमातून त्यांची अन्य साहित्यिक मित्रांच्या सोबतीने जत तालुक्यात साहित्य चळवळ सुरू आहे. साहित्य संमेलने, कथा-काव्यलेखन कार्यशाळा, कवी संमेलने, पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन अशी अनेक उपक्रमे जत तालुक्यात राबवली जातात.

    ReplyDelete
  10. मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा पुरस्कार मच्छिंद्र ऐनापुरे यांना जाहीर

    जत,(प्रतिनिधी)-

    मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा पुरस्कार जत येथील साहित्यिक, शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'विचारांच्या प्रदेशात' या पुस्तकाला मिळाला आहे. वैचारिक कॅटेगिरीमध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. लवकरच पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
    ऐनापुरे यांनी अभ्यासू पत्रकार व साहित्यीक म्हणून स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. बालकथा, विनोदी कथा, व्यक्तीचित्रे व वृत्तपत्र लेख असे त्यांनी विपुल लेखन केले आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री. ऐनापुरे यांची आतापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    त्यांचे ‘जंगल एक्सप्रेस', 'मौलिक धन' , 'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' , असेही एक रहस्य, रहस्यमयी अंगठी, माकडाचा पराक्रम, हे बालकथासंग्रह, 'हसत जगावे' हा विनोदी कथासंग्रह तर 'सामान्यातील असामान्य' हा व्यक्तीचित्रसंग्रह प्रकाशित आहे. तसेच 2022 मध्ये 'विचारांच्या प्रदेशात' हा वैचारिक लेखांचा संग्रह प्रकाशीत झाला आहे. याशिवाय सर्वच आघाडीची दैनिके, साप्ताहिके, मासिकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. पंचवीस वर्षांपासून ते मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. 'जनप्रवास', 'केसरी','प्रभात', 'महासत्ता', 'संचार' या दैनिकात काम केले आहे. २०११पासून त्यांनी स्वत:चा ब्लॉग तयार केला असून त्यावर 2050 पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. याशिवाय चित्रपट, जनरल नॉलेज, आरोग्य, बालसाहित्य, हिंदी साहित्य, चित्रकला, प्रेरणादायी आदी विषयांवर त्यांचे लेखन विविध ब्लॉगवर , वर्तमानपत्रांमध्ये सुरू आहे.
    महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पूणे यांनी 2018 या वर्षांपासून इयत्ता आठवीच्या बालभारती पुस्तकात त्यांच्या लेखाची निवड केली आहे. त्यांची 'धाडसी कॅप्टन: राधिका मेनन' ही शौर्यकथा पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे. जत तालुक्याच्या साहित्य वैभवात भर टाकणारे ते लेखक म्हणून नावारूपास आले आहेत.

    ReplyDelete